Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
लोकमानस

भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल

 

शेखर देशमुख यांच्या, ‘या भकास, उजाड आणि मागास भारताचे करायचे काय’ (१९ एप्रिल) या लेखातील निराशावादी सूर आणि अशोक राणे यांचे २२ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेले पत्र वाचल्यानंतर मध्यमवर्गीय नकारात्मक मानसिकतेचा प्रत्यय येत राहिला.
जे कार्यकर्ते किंवा नेते प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन कार्य करतात, त्यांना लोकांच्या समस्यांची खरीखुरी जाणीव असते. त्यातूनच इंदिरा गांधी यांची ‘गरिबी हटाव’ ही घोषणा जन्माला आली. देशबांधवांमध्ये ईष्र्या जागृत करण्याचा त्यांचा मनसुबा यशस्वी झाला. याच राजकीय नेतृत्वाच्या कळकळीतून महाराष्ट्रात रोजगार हमीसारखी योजना उदयाला आली आहे. त्यामुळे सरसकट राजकारणी लोकांना दोष देऊन सुटका होणार नाही. देशाच्या समस्यांचे गांभीर्य आपल्यालाच समजते आणि राजकीय पक्षांना ते समजत नाही, अशा वृत्तीमधून देशमुख यांनी भारतातील परिस्थितीचे वर्णन केले आहे. ५० वर्षे आपले राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि शासन यंत्रणा सतत काम करीत असल्यामुळेच आज भारताचे चित्र थोडेफार बदललेले आहे. अर्थात या परिवर्तनाचा समान लाभ प्रत्येक वर्गाला, प्रत्येक स्तराला, प्रत्येक व्यक्तीला व्हावा, असे म्हणणे म्हणजे कल्पनेतील रामराज्य स्थापन करण्याची इच्छा. ती प्रत्यक्षात येणे अशक्य.
एके काळी ज्या देशात सर्रास भूकबळी होत असत, त्या भारतात २५ वर्षांत असे दुर्दैवी मृत्यू झाल्याचे उदाहरण नाही. पोलिओचे समूळ उच्चाटन झाले आहे. देवीचा रुग्ण आता शोधूनही सापडत नाही. महाराष्ट्रात शासकीय दूध योजनेत कार्ड मिळविणे एके काळी कर्मकठीण होते आणि प्रतिष्ठेचे लक्षण होते. आज महाराष्ट्र दूध उत्पादनाच्या बाबतीत देशात सर्वप्रथम आहे. फळ उत्पादनाच्या बाबतीतही महाराष्ट्राची प्रगती लक्षणीय आहे. सर्वाधिक नागरी सहकारी बँका आज महाराष्ट्रात आहेत. शिक्षणाचे प्रमाणही समाधानकारक आहे. या सर्व गोष्टी कोणी तरी प्रयत्न केल्याशिवाय घडलेल्या नाहीत. अर्थातच जे आहे ते पुरेसे आहे, असे नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत. रोजगार हमी योजना राबविल्यामुळे राज्याच्या ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतर कमी झाले. अशा योजना देशभर असत्या तर आज महानगरांचे स्वरूप वेगळे दिसले असते. आज मुंबईत परप्रांतीय अधिक दिसतात कारण राणे यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या प्रांतात त्यांना नुसते जगणेही जातीपातीच्या कारणावरून दुष्कर असते. रोजगार हमी योजनेत अनेक गैरप्रकार होतात. तथापि, तीन दशके दरवर्षी लाखो लोकांना दोन वेळचे अन्न देणाऱ्या या योजनेचे महत्त्व कमी लेखता येणार नाही.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पुरोगामी आघाडी शासनाच्या कामगिरीचे परीक्षण केल्यास असे दिसून येईल की, औद्योगिकीकरणाच्या आणि प्रगतीच्या स्पर्धेतून या आघाडीने महाराष्ट्राला बाजूला फेकले आहे. ऑक्टोबर १९९९ मध्ये आघाडीचे शासन आले तेव्हा महाराष्ट्रातील विजेचा प्रश्न आजच्यासारखा गंभीर नव्हता. एन्रॉन प्रकल्प नुकताच सुरू झाला होता. मात्र विलासराव देशमुख यांनी सनदी सेवक माधव गोडबोले यांच्या अहवालाचा आधार घेऊन महाराष्ट्राला जादा विजेची गरज नसल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात केले. एन्रॉन प्रकल्पाच्या मार्गात इतर अनेक अडचणीही आणण्यात आल्या. याच सुमारास एन्रॉनच्या अमेरिकेतील कारभाराचे दिवाळे वाजले आणि येथील एन्रॉन विरोधकांना हाती कोलीत मिळाले. एन्रॉन प्रकल्प महाराष्ट्रात नको, असे सांगणारे एन. डी. पाटील, मेधा पाटकर, प्रद्मुम्न कौल आणि अनेक तथाकथित विचारवंत पुढे सरसावले. कृष्णा खोरे प्रकल्प अर्धवट पडल्यामुळे ३० हजार कोटी रु. दिले तरी तो पूर्णत्वास येण्याची शक्यता नाही. दिवाळखोर नेतृत्वामुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले. शिवसेनेचा हिंसाचार, काँग्रेस-राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार, भाजपचा पत्रकाचार व तिसऱ्या आघाडीचा बेतालपणा यांच्यामुळे महाराष्ट्र निर्नायकी बनला आहे; परंतु ही अवस्था कायम राहील, असे समजण्याचे कारण नाही.
अशोक शिंदे, संपादक,अर्थनीती, मुंबई

खेडेगावात पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करणे गरजेचे
लगीनसराईच्या सध्याच्या काळात खेडेगावांमध्ये बरीच धामधूम असते. साखरपुडा, हळद, लग्नांच्या निमित्ताने माझेही गावांत जेवणावळींना हजर राहणे घडले. त्या वेळी आढळून आलेली विशेष बाब म्हणजे, पूर्वी अशा जेवणावळींसाठी पारंपरिक पत्रावळी वापरीत असत. त्या झाडांच्या पानांपासून बनविलेल्या असत. मात्र आता त्यांची जागा थर्माकोलपासून बनविलेल्या प्लेट्स्नी घेतलेली दिसली. ग्लासही वापरा आणि फेका तत्त्वावरचे, प्लास्टिकचे असतात.
प्लास्टिक व थर्माकोल या पदार्थाचे विघटन होत नसल्यामुळे त्यांचा प्रचंड कचरा गावागावांत वाढत चालला आहे. यामुळे तेथील पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे. सध्या खेडय़ांचील नदीनाले, उकिरडे, खाडीकिनारे अशा सर्वच ठिकाणी हा कचरा साठलेला दिसतो.
याला वेळीच आवर घालायला हवा आणि त्याकरिता तेथील लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करून त्यांना थर्माकोल व प्लास्टिक यांपासून परावृत्त करायला हवे. प्रसंगी थर्माकोल वापरावर बंदी घालण्याचे पाऊलही उचलावे. थर्माकोल वापरावर नियंत्रण आले तर झाडांच्या पानांपासून पत्रावळी बनवणाऱ्यांना पुन्हा एकदा रोजगार मिळेल, ते वेगळेच.
सदानंद पाटील सारडेकर, रायगड

मतिमंदांसाठीच्या ‘फॅमिली पेन्शन’ प्रस्तावाचे काय झाले?
दक्षिण मुंबईतील दोन विद्यमान खासदारांच्या मुलाखतीद्वारे त्यांचा कार्यवृत्तान्त प्रसिद्ध केल्याबद्दल (७ एप्रिल) धन्यवाद. यातून कोण उजवा व कोण डावा याचे यथार्थ दर्शन मतदारांना घडले. गिरणी कामगार, बी.डी.डी. व बी.आय.टी. चाळी, कोळी बांधव यांच्यासाठी शिवसेनेने काहीही केले नाही, असे खासदार मिलिंद देवरा यांनी रोखठोकपणे सांगत असतानाच संबंधित मतदारांचे प्रश्न गत पाच वर्षांत कसे सोडविले याची यादीच प्रसिद्ध झाली आहे. उलट सलग पाच वेळा निवडून गेलो असे उद्गार काढणाऱ्या खा. मोहन रावले यांनी खासदार देवरा यांनी केलेल्या कामासाठीच प्रयत्नशील आहे अशी थाप मारली. रावले म्हणतात की, मतदारसंघातील अनेकांशी मी सातत्याने संपर्क ठेवून आहे; परंतु माझ्यासारख्या वयोवृद्ध मतदाराने स्थानिक सेना प्रतिनिधीमार्फत पाठविलेल्या तक्रारी-सूचनांची रावले यांनी साधी दखल घेतली नाही. सरकारी कर्मचाऱ्यांच्या अपत्यांमध्ये मानसिक दुर्बलता किंवा शारीरिक विकलांगता असल्यास अशा मुलांना उपजीविका करणे शक्य नसते, हे जाणून त्यांना शासन हयातभर पेन्शन देते; परंतु बिगरसरकारी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी वा कुटुंब निवृत्तीवेतन नियमात वरीलप्रमाणे तरतूद नसल्याने अशा कर्मचाऱ्यांच्या अपंग वारसांना हयातभर पेन्शन मिळत नाही. त्यासाठी खासदारांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित कुटुंब निवृत्तीवेतन नियमात दुरुस्ती सुचवावी म्हणून गेली २० वर्षे वृत्तपत्रातून वाचा फोडली. मी सदर वृत्तपत्रीय कात्रणांसह रावले यांच्याकडे अनेक निवेदने पाठवली; परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आतापर्यंत त्याबाबत काय हालचाली झाल्या ते कळेल काय?
दत्ता घाडीगावकर, लालबाग, मुंबई

मेहनती शिक्षक रा. वि. जगदाळे
रा. वि. जगदाळे यांच्यावरील ‘व्यक्तिवेध’ (१० एप्रिल) वाचला. रा. वि. जगदाळे हे माटुंगा हिंदी नाइट स्कूलमध्ये सहाय्यक शिक्षक असल्याने रात्रशाळेच्या कामांसाठी ते मला भेटत. मी रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघाचा सचिव होतो. ते सहकार नाइट हायस्कूलच्या कमिटीवरही होते. शिक्षकांच्या प्रश्नांतून कसा मार्ग काढावयाचा याची आम्ही चर्चा करीत असू. ते अभ्यासू होते. दुसऱ्याचे म्हणणे ते ऐकून घेत असत.
सहकार नाइट हायस्कूलचे देसाईसर यांच्या मते जगदाळे म्हणजे एक अमूल्य ठेवा होता! माटुंगा हिंदी नाइट हायस्कूलचा रिझल्ट नेहमी चांगला लागतो, हे त्यांचेच संस्कार! या सव्यसाची शिक्षकाच्या निधनाने रात्रशाळांनी एक चांगला मार्गदर्शक गमावला आहे. त्यांना मुख्याध्यापक संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
व्ही. व्ही. चिकोडीकर, विलेपार्ले, मुंबई (माजी अध्यक्ष, रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघ)