Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९

अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर सांगलीत सोने खरेदी करण्यासाठी सोमवारी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.

घटलेले मतदान तापदायक
दिनकर झिंब्रे, सातारा, २७ एप्रिल
लोकसभा निवडणुकीत या वेळी घटलेले मतदान सर्वच पक्षांच्या नेत्यांना तापदायक ठरले असून, त्याच्या कारणांची कसून चौकशी करण्याची वेळ आलेली आहे. मतदारांना बाहेर काढण्यात कार्यकर्त्यांना अपयश आले की ज्यांच्यावर भरवसा ठेवला ते टक्केवारी घेऊन गुमान बसले की काय, याचा उमेदवाराच्या डोक्याला ताप झाला आहे.

राज्यातील ६० हजार अंशत: अनुदानित शाळा कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतनाचे अभय
सोलापूर, २७ एप्रिल/प्रतिनिधी

राज्यातील विनाअनुदानित आणि अंशत अनुदानित शाळांमधून काम करणाऱ्या सुमारे ६० हजार कर्मचाऱ्यांना शासनाने २६ एप्रिल रोजी परिपत्रक काढून पूर्वीची सेवानिवृत्ती योजना लागू केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा कृती समितीचे प्रदेश सचिव दत्तात्रेय सावंत यांनी दिली.

कापसाच्या दरवाढीने यंत्रमाग व्यवसाय अडचणीत
दयानंद लिपारे, इचलकरंजी, २७ एप्रिल
देशभरात कापसाचे दर पुन्हा वाढू लागल्याने वस्त्रोद्योगात अस्वस्थता वाढू लागली आहे. कापूस दरवाढीमुळे सूतदरात लक्षणीय वाढ झाल्याने यंत्रमाग उद्योग अडचणीत येत आहे. देशांतर्गत दर वाढल्याने परकीय बाजारात दिमाखात जाणारा कापूस आता मात्र मागणीअभावी देशातच अडकला आहे.

बनावट नोटांचा वाईत सुळसुळाट
वाई, २७ एप्रिल/वार्ताहर
वाई शहरात पन्नास रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. या बनावट नोटांचा कागद थोडा पातळ असून, त्याच्या पांढऱ्या भागात दिसणारी महात्मा गांधींची प्रतिमा स्पष्टपणे दिसत नाही. भाजी मंडई, किरकोळ दुकाने, पेट्रोलपंपावर या नोटा खपविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून आले. काही नोटांचा सांकेतिक क्रमांक जीआरआर या सीरियलने सुरू होत आहे. याबाबत अजून वाई पोलिसांत फिर्याद दाखल झालेली नाही.

सात शिकाऱ्यांना साताऱ्यात अटक
सातारा, २७ एप्रिल/प्रतिनिधी
ठोसेघर धबधब्याजवळील पांगारे गावच्या सात शिकाऱ्यांना क्वालिस गाडी व बंदुकीसह अटक करण्यात आली आहे. वनखात्याला शिकारीला निघालेल्या लोकांची खबर मिळताच वन्यजीव रक्षक अधिकाऱ्यांनी जंगलाच्या वाटेवर दबा धरून पांगारे गावच्या सशाच्या शिकारीसाठी बाहेर पडलेल्या सात लोकांना बंदूक, सर्चलाईट व क्वॉलिस गाडी आदीसह साडेचार लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले व त्यांचा शिकारीचा प्रयत्न हाणून पाडला. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पांगारे गावचे रहिवासी गणपत जगन्नाथ जाधव (वय ३८), किरण सीताराम जाधव (वय २३), दत्तात्रय लक्ष्मण जाधव (वय ४०), श्रीरंग पांडुरंग जाधव (वय ५५), वैभव जयराम जाधव (वय २९), विष्णू धोंडिबा जाधव (वय ५९), राजेश पांडुरंग दाभाडे (रा. ठाणे) यांचा समावेश आहे. सहायक वन्यजीव रक्षक बी. एन. सकट व सातारचे वनक्षेत्रपाल तानाजी गायकवाड यांनी कारवाई केली. आरोपींना आज जामिनावर मुक्त करण्यात आले.

कराड तहसील कचेरी व नगरपालिकेत बसवेश्वर जयंती साजरी
कराड, २७ एप्रिल/वार्ताहर
कराड तहसीलदार कार्यालय व कराड नगरपरिषदेत शासकीय नियोजनाने पहिल्यांदाच महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. तहसील कचेरीत नायब तहसीलदार विवेक जाधव यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तर नगरपरिषदेत नगराध्यक्ष अल्ताब शिकलगार यांनी बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या प्रसंगी सुभाषराव पाटील, संभाजी सुर्वे, गंगाधर जाधव, रत्ना विभुते, संभाजी फल्ले या पदाधिकाऱ्यांसह वीरशैव प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या प्रसंगी प्रतिष्ठानतर्फे नगरपालिकेला बसवेश्वरांचे शासकीय मुद्रणालयातील छायाचित्र, तर येथील लिंगायत मठ संस्थेतर्फे ‘बसवेश्वर महात्म्य’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.

धनादेश न वटल्याबद्दल कारावास, दंडाची शिक्षा
इचलकरंजी, २७ एप्रिल / वार्ताहर
धनादेश न वटल्यामुळे प्रदीप सलोजीराव जाधव (रा.पट्टणकोडोली) यांना १ वर्षे कारावास व दहा लाख रूपयांचा दंड सोमवारी न्या.बावकर यांनी दिला. इचलकरंजी अर्बन को ऑप बँकेच्या हुपरी शाखेतून प्रदीप जाधव व त्यांच्या कुटुंबीयांनी कर्ज घेतले आहे. थकीत कर्जासाठी दावा केल्यानंतर प्रदीप जाधव व कुटुंबीयांनी अंशत: कर्ज फेडीसाठी १० लाख रूपयांचा धनादेश बँकेस दिला होता. धनादेश न वटता परत आल्याने बँकेने त्यांच्याविरूध्द चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम १३८ प्रमाणे फिर्याद दाखल केली होती.

देवल क्लबच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी
वर्षांची सुखदा काणेंच्या गायनाने सांगता
कोल्हापूर, २७ एप्रिल / विशेष प्रतिनिधी
कोल्हापूरच्या सांस्कृतिक जीवनाचे अविभाज्य घटक असलेल्या गायन समाज देवल क्लबच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांचा सांगता सोहळा अक्षयतृतीयेच्या पूर्वसंध्येला सुखदा काणे यांच्या गायनाने प्रातिनिधिक स्वरूपात झाला. आवाजाचा शुद्ध निकोप लगाव, रागस्वरूपाची शिस्तबद्ध मांडणी, आकर्षक बोलताना याद्वारे काणे यांनी आग्रा व जयपूर घराण्याच्या गायकीचे सुश्राव्य दर्शन घडविले. काणे यांनी दिवेलागणीच्या कातरवेळची हुरहुर लावणाऱ्या सायंगेय ‘श्री’ रागातील विलंबित त्रितालातील बंदिशीने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर जयपूर घराण्याची खासियत समजला जाणारा राग ‘डागुरी’ सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. मधुमधुरा हे नाटय़गीत व अच्युता अनंता हा भैरवीतील अभंग सादर करून दोन तासांपेक्षा अधिक काळ रंगलेल्या मैफलीचा समारोप केला. काणे यांना गिरिधर कुलकर्णी यांनी तबला, तर अण्णाबुवा बुगल यांनी हार्मोनियमसाथ केली. कार्यवाह श्रीकांत डिग्रजकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला प्रभाकर गोखले, डॉ. शुभदा वायंगणकर, सुधीर पोटे, डॉ. नंदकुमार जोशी, प्रकाश पुरोहित, सुभाष आठले, अरुण कुलकर्णी आदी उपस्थित होते.