Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९

गुजरात दंगल: नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेची चौकशी करा
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली, २७ एप्रिल/पी.टी.आय.
गोध्रा दंगलींच्या मामल्यावरून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पुन्हा अडचणीत आले आहेत. गोध्रानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलींना मोदी, मोदी यांच्या मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी, पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ नोकरशहा हे सर्वजण जबाबदार असल्याच्या तक्रारीची विशेष चौकशी पथकाने तीन महिन्यांत चौकशी करून आपला अहवाल सादर करावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. २०१४ साली नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असा प्रचार करणाऱ्या भाजपमधील अनेक नेत्यांना सुप्रीम कोर्टाच्या या आदेशामुळे मोठी चपराक बसणार आहे.

भोकरजवळील अपघातात १० ठार
भोकर, २७ एप्रिल/वार्ताहर

भोकरहून हिमायतनगरकडे जाणारी मालमोटार व समोरून येणारी अवैध प्रवासी वाहतूक करणारी काळीपिवळी जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात १० जण जागेवरच ठार, तर सहाजण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी १०.३० वा. भोकर-हिमायतनगर रस्त्यावरील टाकराळा फाटय़ाजवळ घडली. हा अपघात इतका भीषण होता की मृतांची ओळख पटणेही अवघड झाले आहे. जखमींवर भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारार्थ नांदेडला हलविण्यात आले आहे.

फिरोज खान यांचे निधन
मुंबई, २७ एप्रिल / प्रतिनिधी

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक फिरोझ खान यांचे बंगळुरूजवळील फार्महाऊसवर आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. गेले वर्षभर ते कर्करोगाशी झुंजत होते. त्यांच्या पश्चात पुत्र फरदीन खान आणि मुलगी लैला खान असा परिवार आहे. फिरोझ खान यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. फिरोझ खान यांचा जन्म बंगलोरमध्ये १९३९ साली झाला. १९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘दीदी’ या चित्रपटाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

मुंबईतील खासदार ठरविणार झोपडपट्टीवासीय!
प्रसाद केरकर
मुंबई, २७ एप्रिल

कर भरणाऱ्या मुंबईकर मध्यमवर्गीयांनी कितीही टिमकी वाजविली तरी मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील खासदारांची ‘निवड’ करण्याचा अधिकार त्यांच्या हाती नाही. मुंबईतील झोपडपट्टीवासियांचे प्राबल्य लक्षात घेता आणि जवळजवळ प्रत्येक मतदारसंघात त्यांचा असलेला वरचष्मा विचारात घेता मुंबईतील सहाही मतदारसंघातील खासदार कोण असेल हे झोपडपट्टीवासियच ठरविणार आहेत, हे निश्चित!
मॅगासेसे पुरस्कार विजेते व नॅशनल स्लम डेव्हलपर्स फेडरेशनचे अध्यक्ष ए. जोकीम यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, मुंबईतील चार लोकसभा मतदारसंघामध्ये ५० टक्क्यांहून जास्त झोपडपट्टीवासिय आहेत.

मुलुंड येथे महिलेने मुलांसह जाळून घेतले
मुंबई, २७ एप्रिल / प्रतिनिधी

जेवण वाढण्यावरून पतीशी झालेल्या किरकोळ भांडणाचे निमित्त होऊन महिलेने पोटच्या तीन चिमुरडय़ांसह जाळून घेण्याची हृदयद्रावक घटना रविवारी मध्यरात्री मुलुंड येथे घडली. या घटनेत संबंधित महिलेसह तिच्या दोन वर्षांच्या मुलीचा १०० टक्के भाजल्याने जागीच मृत्यू झाला, तर पतीसह दोन महिन्यांचा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्यावर ऐरोली येथील रुग्णालयात उपचार असून मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या मन हेलावून सोडणाऱ्या घटनेने परिसरात शोककळा पसरली होती.

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरणे ही आता फॅशन
सोनियांचा टोला
जांगीपूर , प.बंगाल २७ एप्रिल/पीटीआय

अणुकरारावर युपीए सरकारला पाठिंबा न दिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी डाव्या पक्षांवर टीकेची झोड उठवली. काँग्रेस नेते व परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांच्या या मतदारसंघात श्रीमती सोनिया गांधी व तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी या आठ वर्षांनंतर प्रथमच एका मंचावर आल्या. सोनिया गांधी म्हणाल्या की, देशाची वाढत चाललेली ऊर्जेची गरज लक्षात घेऊन आम्ही अमेरिकेबरोबर अणुकरार केला पण डाव्या पक्षांनी त्याला विरोध केला जो करण्याची मुळीच गरज नव्हती. केंद्राची महत्वाकांक्षी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना पश्चिम बंगाल सरकारने व्यवस्थित राबवली नाही अशी टीका करून त्या म्हणाल्या की, डावे पक्ष स्वत:ला गरिबांचे मसिहा म्हणून मिरवतात पण त्यांनी गरिबांसाठी काही केले नाही, केवळ आश्वासने दिली. प.बंगालमध्ये तांदळाचे मोठे उत्पादन होते पण लोकांना मात्र भूक भागविण्याइतके अन्नही मिळत नाही हा फार मोठा विरोधाभास आहे.
केंद्रातील युपीए सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ठोस व ऐतिहासिक निर्णय घेतले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णयही त्याचाच भाग होता, असे त्या म्हणाल्या. पंतप्रधानपदासाठी आता अनेक जण इच्छुक आहेत किंबहुना या पदासाठी आपण इच्छुक आहोत हे दाखवून देणे ही आता फॅशन झाली आहे. पण काँग्रेसला मात्र देशाची व जनतेची सेवा करायची आहे अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

आज प्रचार संपणार
मुंबई, २७ एप्रिल / प्रतिनिधी

महाराष्ट्रातील तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान येत्या ३० एप्रिल रोजी होणार असून त्याच्या प्रचाराचा गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेला धडाका उद्या सायंकाळी पाच वाजता थंडावणार आहे. त्यानंतर दोन दिवस उमेदवार आणि कार्यकर्ते यांना घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर द्यावा लागणार आहे.गेल्या आठवडय़ात राज्यातील दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले. त्यानंतरच्या अखेरच्या टप्प्यात मुंबई, ठाण्यासह अनेक महत्त्वाच्या मतदारसंघातील मतदान होणार असल्याने सर्व पक्षांचे नेते मुंबई, ठाण्यात येऊन प्रचाराची राळ उडविणार हे स्पष्ट झाले होते. त्यानुसार सोनिया गांधी, शरद पवार, नरेंद्र मोदी, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग, रामविलास पासवान आदी नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी उमेदवारांच्या प्रचारार्थ बॉलीवूडमधील तारकांचेही रोड शो आयोजित करण्यात आले होते.एकीकडे दिल्लीतील बडय़ा नेत्यांच्या सभांबरोबरच शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, यांनीही आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी जाहीर सभांचे आयोजन करून एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवून दिली होती. या सभांना अलोट गर्दी झाली होती. मात्र आचारसंहितेनुसार उद्या सायंकाळी पाच वाजता प्रचाराची मुदत संपणार असल्याने त्यानंतर उमेदवार आणि कार्यकर्त्यांना घरोघरीच्या संपर्कावर भर द्यावा लागणार आहे.

पाक लष्कराच्या तालिबानविरोधी मोहिमेत ५० ठार
इस्लामाबाद, २७ एप्रिल/पी.टी.आय.
वायव्य सरहद्द प्रांतामध्ये पाकिस्तानी लष्कराने तालिबानी दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम उघडली असून लष्कराच्या हेलिकॉप्टर्सनी केलेल्या तुफानी गोळीबारात ५० तालिबानी ठार झाल्याचे वृत्त आहे. मात्र या मोहिमेमुळे संतप्त तालिबानींनी स्वात खोऱ्यामध्ये पाकिस्तानी सरकारशी चालू असलेली शांतता चर्चा तातडीने रहित केली आहे. पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रेहमान मलिक याबाबत म्हणाले की, लष्कराकडून कारवाईचा हा दुसरा दिवस असून रविवारी रात्रभरात लष्कराने ३० तालिबानींना मारले आहे. स्वात खोऱ्याच्या मैदान भागात ही जोरदार कारवाई अद्याप सुरू आहे. पाकिस्तानी लष्कराने कारवाई तेज केल्यानंतर तालिबानी समर्थकांनी त्याविरोधात आता ओरड चालू केली आहे. तेहरिक-ए-निफाज-ए-शरियाह मोहम्मदी या संघटनेचे प्रवक्ते इज्जत खान यांनी या कारवाईमुळे आतापर्यंत सरकारसमवेत चालू असलेली शांतताविषयक बोलणी निर्थक ठरली असल्याचे म्हटले आहे. जोपर्यंत लष्कराकडून ही मोहीम थांबवली जात नाही तोपर्यंत चर्चा चालू ठेवण्यात कोणताही अर्थ नाही अशीही भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. तालिबानींचा प्रवक्ता मुस्लिम खान याने मात्र आमचे सैनिक कोणत्याही परिस्थितीत शस्त्रे खाली ठेवणार नाहीत, अशी दर्पोक्ती केली आहे. तालिबानी आणि पाकिस्तान सरकार यांच्या चर्चेमध्ये मध्यस्थ म्हणून वावरणारा कट्टरपंथीय धर्मगुरू सुफी मोहम्मद याच्याशी संपर्क साधण्याचे सध्या सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

लादेन मरण पावल्याचा पाकिस्तानी गुप्तचरांचा दावा
इस्लामाबाद, २७ एप्रिल/पीटीआय
पाकिस्तानी गुप्तचरांच्या माहितीनुसार अल काईदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन हा मरण पावला आहे, पण त्याचे कुठलेही पुरावे आमच्याकडे नाहीत, असे पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी आज सांगितले. परदेशी पत्रकारांच्या एका गटाने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, अमेरिका आमच्यापेक्षा साधनसामग्रीने व तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, पण त्यांना लादेन सापडला नाही. आमच्या गुप्तचर संस्थांच्या मते तो मरण पावला आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
प्रत्येक शुक्रवारी