Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९

जालना वनखात्याच्या जमिनीवर बांधकाम करण्यास कोर्टाची मनाई
औरंगाबाद, २७ एप्रिल/खास प्रतिनिधी

जालना येथील गट नंबर २७६ च्या ३४ हेक्टर ९० गुंठे जमिनीवर कुठल्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एन. व्ही. दाभोळकर व न्या. ए. व्ही. पोतदार यांनी मनाई हुकूम दिला आहे. या जमिनीच्या ताबेदार असलेल्या प्रतिवादींनी या जमिनीत इतर कोणाचेही हितसंबंध निर्माण करायचे नाहीत असेही आदेशात म्हटले आहे.

अक्षयतृतीयेनिमित्त मोटारसायकल, कार तसेच सोने खरेदीचा धडाका!
औरंगाबाद, २७ एप्रिल/प्रतिनिधी

जागतिक मंदी, जागतिक मंदी म्हणत बसणाऱ्यांना अक्षय्यतृतीयेच्या दिवशी बाजारपेठेत झालेल्या तुफान उलाढालीने झटका बसला असेल. सोन्याचा भाव १५ हजारांवर असतानाही आजच्या दिवशी मोठय़ा प्रमाणावर खरेदीचा धडाका लावल्याचे दिसले. एवढेच नव्हे तर महाग असतानाही आंबा सुद्धा चाखण्याचा मोहही आवरता आला नाही. साडेतीन मुहूर्तापैकी एक अशा अक्षयातृतीयेनिमित्त सोमवारी बाजारात मोठा उत्साह बघण्यास मिळाला. फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याच्या रसाला आजपासून घराघरात सुरुवात होते. पूजा करून आजपासून आंब्यांचा स्वाद घेण्याची रीत आहे.

नांदेडमध्ये पोलिसांची ‘कायद्या’ऐवजी ‘काठी’ची दहशत?
नांदेड, २७ एप्रिल/वार्ताहर

जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागांत चोरी, घरफोडी, लुटमारसारख्या गंभीर गुन्ह्य़ांत वाढ होत असताना त्यावर अंकुश लावून सर्वसामान्यांना दिलासा देण्याऐवजी नांदेड पोलीस दलातील अधिकारी अपयश झाकण्यासाठीच कायद्याऐवजी काठीची दहशत निर्माण करीत असल्याचे चित्र दिसत आहे. नांदेड जिल्ह्य़ात गेल्या १५ दिवसांत चोरी, घरफोडी, लुटमार, दरोडय़ासारख्या गंभीर घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. शहरातल्या भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरटे सर्रास धुमाकूळ घालीत आहेत.

आणि रक्त पेटलेले?
स्वातंत्र्य फार फुकटात मिळालं आमच्या पिढीला! या जगात येताना डोळे उघडले तेच मुळी स्वातंत्र्य वयात आल्यानंतर. म्हणजे पिढीजात श्रीमंतांची मुलं तोंडात सोन्याचा चमचा वगैरे घेऊन जन्माला येतात तसं आम्ही जन्माला येताना स्वातंत्र्याचा चमचा घेऊन जन्माला आलो. पुढे आमच्या गुरुजन मंडळींनी यथोचित संस्कार वगैरेपण आमच्यावर मन लावून केले. कुठं काही कमी म्हणून पडू दिलं नाही- म्हणजे सुसंस्कारांच्या बाबतीत.

नवजात अर्भकाला मृत घोषित केले शासकीय रुग्णालयाचे प्रतापवर प्रताप
औरंगाबाद, २७ एप्रिल/प्रतिनिधी

जन्मानंतर अवघ्या काही मिनिटांतच जिवंत असलेल्या नवजात अर्भकाला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले आणि लगेच प्रमाणपत्रही दिले. हा खळबळजनक प्रकार आज सकाळी येथील शासकीय रुग्णालयात घडला. काही महिन्यांपूर्वी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अशाच पद्धतीने एका रुग्णाला मृत घोषित केले होते आणि त्याला उत्तरीय तपासणीसाठी शवागारातही नेण्यात आले होते.

संजय जोशी यांना प्रभाग सभापतिपदाची उमेदवारी!
औरंगाबाद, २७ एप्रिल/प्रतिनिधी

गेल्या वर्षी स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय जोशी यांना पुन्हा एकदा संधी दिली जाईल, अशी घोषणा पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र पक्षाने हे आश्वासन पाळले नाही. जोशी यांच्यावर श्रेष्ठींकडून झालेला अन्याय दूर करण्याचा प्रयत्न या वेळी करण्यात आला असून प्रभाग समितीच्या सभापतिपदासाठी जोशी यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

गुगळे अ‍ॅग्रो बायोटेकला सहा लाखांचा दंड
परभणी, २७ एप्रिल/वार्ताहर

शेतकऱ्यास केळीचे उती संवर्धीत रोपांऐवजी साधे रोप देऊन फसवणूक केल्याप्रकरणी एच. यू. गुगळे अ‍ॅग्रो बायोटेक कंपनीस सहा लाख रुपयांचा दंड जिल्हा ग्राहक मंचाने ठोठावला. परभणी तालुक्यातील वांगी येथील गुलाबराव रंगनाथराव शिंदे यांनी गुगळे अ‍ॅग्रो बायोटेक कंपनीच्या पाथरी येथील डेपोतून २५ सप्टेंबर २००७ ला ग्रॅण्ड-९ या जातीची केळीची ३०० रोपे विकत घेतली.

सौंदाळा नर्मदा स्टोन क्रशरचा नागरिकांना धोका
प्रदूषण नियत्रंण मंडळाला अहवाल सादर करण्याचे आदेश
औरंगाबाद, २७ एप्रिल/खास प्रतिनिधी
नेवासा (जि. नगर) तालुक्यातील सौंदाळा गावानजीक असलेल्या नर्मदा स्टोन क्रशरमुळे नजीकच्या वस्त्यांना त्रास होतो आणि नागरिकांच्या आरोग्यास होणाऱ्या धोक्याबाबत नाशिकच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी सहा आठवडय़ांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. आर. किनगावकर यांनी दिले आहेत.

स्वखर्चातून ८५ हजारांची पाईपलाईन
सरपंच सरसावले गावाच्या मदतीला
सिल्लोड, २७ एप्रिल/वार्ताहर
शासकीय मदतीवर अवलंबून राहण्यापेक्षा गावकऱ्यांसाठी स्वत: काहीतरी केले पाहिजे. ही भावना मनी बाळगून तांडाबाजारचे (ता. सिल्लोड) युवा सरपंच आरेफ मुलतानी यांनी गावकऱ्यांची पाण्यासाठी होणारी परवड थांबविण्यासाठी ८५ हजार रुपये खर्च करून सव्वादोन कि.मी. पाईपलाईनद्वारे गावासाठी पाणी आणले.

हॉटेल व्यावसायिकाला झालेल्या मारहाणीची चौकशी करण्याची ग्वाही
नांदेड, २७ एप्रिल/वार्ताहर

शहरातील हॉटेल व्यावसायिक दिलीप आघाव यांना झालेल्या मारहाणीची चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शारदाप्रसाद यादव यांनी दिली. झंकार हॉटेलचे मालक दिलीप आघाव यांना शनिवारी झालेल्या मारहाणीनंतर हॉटेल व्यावसायिकांच्या एका शिष्टमंडळाने आज विशेष पोलीस महानिरीक्षक शारदाप्रसाद यादव यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी ही ग्वाही दिली. दिलीप आघाव यांनी पोलीस कॉन्स्टेबलवर हात उगारल्याने त्यांना मारहाण झाल्याची आपल्याकडे माहिती आहे. याबाबतची चौकशी करण्यात येईल व चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.

गॅस्ट्रोमुळे आणखी एक बालक दगावला
लोहा, २७ एप्रिल/वार्ताहर
शेवडी येथील लक्ष्मण विनायक राठोड (वय ६) या बालकाचा मृत्यू दूषित पाण्यामुळे झाला, पण तांडय़ावरील बालकाने पेप्सी खाल्ल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला, अशी सारवासारव तालुका प्रशासनाने केली आहे. शेवडी व शेवडी तांडय़ावरील सहा बालकांवर सोनखेड-पेनूर येथे उपचार केले जात आहेत. या गावात वैद्यकीय पथक तळ ठोकून आहेत, अशी माहिती गट विकास अधिकारी संजय केंद्रे यांनी दिली.शेवडी व शेवडी तांडा येथे गॅस्ट्रोने दोन बालके दगावली तर ३६ जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याची माहिती कळताच आरोग्य खाते खडबडून जागे झाले. आज गट विकास अधिकारी संजय केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रोडे, डॉ. एन. एम. बोराडे, डॉय मेकाळे, तालुका अधिकारी एन. एम. बोरडे यांनी गावात जाऊन रुग्णांची पाहणी केली व माहिती घेतली.उघडय़ावर टरबूज, पेप्सी, गारेगार कुल्फीवाला, आईस्क्रीम या फेरीवाल्यांना सक्त ताकीद देण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली.

बीडमध्ये पाच केंद्रांवर फेरमतदान
बीड, २७ एप्रिल/वार्ताहर
लोकसभेच्या पाच मतदानकेंद्रावर सोमवारी घेण्यात आलेल्या फेरमतदानात ६५.२५ टक्के मतदान झाले. कडक पोलीस बंदोबस्तात पाचही मतदानकेंद्रावर शांततेत मतदान झाले. लोकसभेच्या बीड मतदारसंघात २३ एप्रिलला मतदान झाल्यानंतर निवडणूक निरीक्षकांच्या अहवालावरून राज्य निवडणूक आयोगाने विधानसभेच्या बीड मतदारसंघातील नांदूरघाट येथील चार व बीड तालुक्यातील डोईफोडवाडी येथील एक अशा पाच मतदानकेंद्रावर फेर मतदान घेण्याचे आदेश बजावले होते. त्यानुसार जिल्हा निवडणूक यंत्रणेने सोमवारी (२७ एप्रिल) या पाचही मतदानकेंद्रावर सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान घेतले. फेरमतदानाच्या पाश्र्वभूमीवर कुठलाही व्यत्यय येऊ नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागरिकांनीही शांततेत मतदान केले. पाच मतदान केंद्रावर सरासरी ६५.२५ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले.

जिल्ह्य़ातून पाचशे कर्मचारी निवडणूक बंदोबस्तासाठी ठाण्याला रवाना
औरंगाबाद, २७ एप्रिल/प्रतिनिधी
येत्या ३० एप्रिलला लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. यासाठी औरंगाबाद जिल्ह्य़ातून पाचशे पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे सातशे जवान ठाण्याला रवाना झाले आहेत. शहर पोलीस आयुक्तालयातून तीनशे तर ग्रामीण जिल्ह्य़ातून दोनशे कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे प्रत्येकी साडेतीनशे जवान बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठीही जिल्ह्य़ातून पोलीस पाठविण्यात आले होते तसेच येथील मतदानासाठीही बाहेरचे बळ मागविण्यात आले होते.

रेल्वे इंजिनखाली सापडून एकाचा मृत्यू
औरंगाबाद, २७ एप्रिल/प्रतिनिधी
रेल्वे रुळाच्या बाजूला काम करत असलेल्या एकाच्या अंगावर रेल्वेचे इंजिन गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मुकुंदवाडी भागात घडली. गणेश बसपुरे असे मृत्यूमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. आवाज न आल्यामुळे रेल्वे इंजिन अंगावर येईपर्यंत त्यांना दिसले नाही. बरोबरच्या अन्य नातेवाईकांना आवाज दिला तोपर्यंत उशीर झाला होता.

संस्था-संघटनांद्वारे मतदारांच्या जागृतीसाठी हालचाली?
तुळजापूर, २७ एप्रिल/वार्ताहर

लोकसभा व तत्सम निवडणुकांमध्ये विविध पक्षांचा सहभाग, वाढती स्पर्धा व चुरस आणि लाखो रुपयांच्या खर्चामुळे लोकशाही परिपक्व होत असल्याचा आभास निर्माण होत आहे. मात्र मतदानाच्या घटत्या टक्केवारीची नोंद घेऊन आता पुन्हा समाजप्रबोधन करून मतदारांना मताचे महत्त्व पटवून देणे, जागरुक करण्याची गरज विविध संस्था व संघटनांकडून व्यक्त होत आहे. ग्रामीण परिसरात लोकसभा निवडणुकीच्या दिनी मतदारांमधील उदासीनतेची दखल घेऊन अनेक संस्था व संघटना कार्यक्रम आयोजनासाठी पुढाकार घेणार आहेत. युवा स्पंदनचे महेंद्र कावरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. शेख आदी मंडळींनी लवकरच युवकवर्गासाठी शिबिर आयोजनाच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. निवडणूक प्रचार काळातच राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. मात्र निरक्षर मतदारांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे तसेच मतदान करण्याकामी, त्यांना प्रोत्साहन देण्याकामी राजकीय पक्ष व नेतेमंडळी फारशी जागरूक नसल्याची खंतही अनेक सुज्ञ मंडळी व सारस्वतांना अस्वस्थ करते आहे.

दिलीप आघाव यांना मारहाणीच्या निषेधार्थ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड, २७ एप्रिल/वार्ताहर
शहरातल्या श्रीनगर परिसरातील हॉटेल झंकारचे मालक दिलीप आघाव यांना पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या बार बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शनिवारी रात्री ११ वाजता अतिरिक्त पोलीसप्रमुख शहाजी उमाप, पोलीस उपअधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल झंकारचे मालक दिलीप आघाव यांना एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे अमानुष मारहाण केली होती.दिलीप आघाव यांच्यावर सध्या नांदेडच्या गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या मानेला तसेच शरीराच्या बहुतांश भागावर गंभीर दुखापत झाली आहे. आघाव यांना पोलिसांनी निष्कारण मारहाण केली व आपल्यातील रानटी वृत्तीचे प्रदर्शन घडविले, असा आरोप करत बारचालक संघटनेने करून आज बंदचे आयोजन केले होते. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्वच बार तसेच दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली.

लातूरमध्ये नवा पेट्रोलपंप सुरू
लातूर, २७ एप्रिल/वार्ताहर
अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर इंडियन ऑईल कंपनीच्या प्रमोद पेट्रोलियम या नवीन पेट्रोलपंपाचा शुभारंभ चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते व आयडीबीआयचे शाखाधिकारी विजय शेजवलकर यांच्या उपस्थितीत पार पडला. दाते कुटुंबीयांना प्रमोद गॅस एजन्सीचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांची कन्या गौरी राजेंद्र गाडगीळ (दाते) यांनी बार्शी रस्त्यावरील बिडवे इंजिनीअरिंग कॉलेजजवळ पेट्रोलपंप सुरू केला आहे. सकाळी १० वा. शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत या पंपाचा शुभारंभ झाला. सचोटी, सातत्य, प्रामाणिकपणा, चांगली सेवा याचा एकत्रित परिणाम म्हणजे पेट्रोलपंपाचा शुभारंभ असल्याचे मत चैतन्य महाराज देगलूरकर यांनी व्यक्त केले. व्यवहारात चोख असणाऱ्या दाते कुटुंबीयांचा पाठिंबा गौरी गाडगीळ यांना असल्यामुळे हा पंपही निश्चित चांगल्या पद्धतीने चालेल, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. विजय शेजवलकर यांनी मनोगत व्यक्त केले. अभय करंदीकर यांच्या गणेशवंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. गौरी गाडगीळ यांनी प्रास्ताविक केले. अतुल ठोंबरे व पेट्रोलपंपाच्या उभारणीत योगदान देणाऱ्यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ मगे यांनी केले, तर आभार सदाशिव दाते यांनी मानले.

गावरान आंबा नामशेष होण्याच्या मार्गावर
धारूर, २७ एप्रिल/वार्ताहर

फळांचा राजा अंबा बाजारात दिसेनासा झाला असून काही प्रमाणात हापूस, लालबाग, पायरी या जातीची आंबे व्यापाऱ्यांनी विक्रीला आणले असून, गावरान आंबा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गावरान आंबा म्हटले की प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो; परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे व आंबा झाडाच्या बेसुमार तोडीमुळे आंबराई कमी होऊन गावरान आंबा दुर्मिळ झाला आहे. तालुक्यातील आंबेवडगाव, चोरआंबा, जहांगीरमोहा, चारदरी, सोनीमोहा, तांदुळवाडी, घागरवाडा ही गावे गावरान आंब्यासाठी प्रसिद्ध होती. येथील गावरान आंब्याला धारूर, माजलगाव, बीड, परभणी, सोनपेठ अशा बाजारपेठेच्या ठिकाणी मागणी होती. काही गावांमध्ये आजही आंबराई आहे. काही प्रमाणात आंबेही आले होते. परंतु अवकाळी पावसामुळे यावर परिणाम झाला आहे. उन्हाळ्यामध्ये गावरान कच्च्या आंब्यापासून लोणचे बनविण्यात येते मात्र कच्चे आंब्याचे भावही ५० ते ६० रुपये किलो असल्याने ते गरिबांना घेणे परवडत नाही. बाजारपेठेत गावरान आंबा नसला तरी संकरित जातीचे आंबे व्यापाऱ्यांनी विक्रीस आणले आहेत. ४० ते ५० रुपये किलो भावाने हे आंबे मिळतात. मात्र गावरान आंबा दुर्मिळ झाला आहे.

मोटारीच्या काचा फोडून दोन सीडी प्लेअर पळवले
उस्मानाबाद, २७ एप्रिल/वार्ताहर
घरासमोर लावलेल्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडून अज्ञात चोरटय़ांनी १५ हजारांचा ऐवज लंपास केला. उस्मानाबाद शहरातील श्रीकृष्णनगरात रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. यात वाहनमालकाचे एकूण ४२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शहरातील श्रीकृष्णनगरात कल्याण कुळकर्णी यांचे निवासस्थान आहे. रविवारी सायंकाळी आपली दोन्ही चारचाकी वाहने त्यांनी घरासमोर लावली होती. अज्ञात चोरटय़ांनी मध्यरात्री या दोन्ही वाहनांच्या काचा फोडल्या व पेनडाऊन आणि पाओनिअर कंपनीचे दोन सीडी प्लेअर पळविले. त्या दोन्हींची किंमत १५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. कल्याण कुळकर्णी यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आंबटवाड करीत आहेत.