Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९

कॅम्पसवर ‘फ्रेम्स’ अनेक असतात, पण त्या ‘क्लिक’ करणं फार थोडय़ांना जमतं. आपमे हैं वह बात? तर मग उचला कॅमेरा आणि तुम्ही काढलेले फोटोज् campusmood@gmail.com वर पाठवा. अट एकच. फोटो कॉलेजशी, कॉलेज जीवनातील ‘हट के प्रसंगांशी आणि एकंदरीतच ‘कॅम्पसच्या मूड’शी मॅच होणारे हवेत. सवरेत्कृष्ट फोटोला ‘कॅम्पस मूड’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. आणि हो! फोटोला शीर्षक तसेच फोटोबरोबर तुमचे नाव, कॉलेज व फोन नंबर पाठवण्यास विसरू नका.

राजकारण It's now my cup of
हाय मित्रांनो! गुरुवार, २३ एप्रिलला सुरू झालेल्या ‘लोकसत्ता- कॅम्पस मूड कॅम्पेन’चा समारोप शनिवार २५ एप्रिलला ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजमध्ये दणक्यात पार पडला. साठय़े महाविद्यालय, एमईटी, वेलिंगकर इन्स्टिटय़ूट, पेंढरकर महाविद्यालय आणि ज्ञानसाधना महाविद्यालय या सर्वच ठिकाणी तरुणांनी अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. एकामागोमाग येणारे उत्स्फूर्त प्रश्न, अतुल कुलकर्णीची समर्पक उत्तरं, त्यातून पुन्हा घडणारी चर्चा या पद्धतीने अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झालेला ‘संवाद’ उत्तरोत्तर रंगतदार होत गेला. तरुणांच्या भरघोस प्रतिसादासह सर्वच वयोगटातील प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय होता.
एक गोष्ट प्रकर्षांने जाणवत होती, ती म्हणजे आजचे राजकारण, उमेदवाराची निवड, मतदानाचा हक्क अशा वेगवेगळ्या बाबतीत तरुणांना उत्सुकता आहे, कुतूहल आहे. त्यांच्या मनात अनेक प्रश्न खदखदत आहेत. त्यांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ते धडपड करताहेत. तरुणांच्या मनात असंतोष आहे. त्यांना बदल घडायला हवाय याचे प्रतिबिंब पाचही कार्यक्रमांमध्ये तरुणांच्या प्रश्नांतून दिसलं. ‘राजकारणात निवृत्तीची अट का नसावी’, ‘उमेदवार आणि मतदारांसाठी शैक्षणिक पात्रता असावी का’, ‘धर्म-जातीच्या राजकारणात आपला उमेदवार कसा ठरवायचा’ असे अनेक प्रश्न अतुल कुलकर्णी यांना विचारले गेले. अतुल कुलकर्णी यांनीही अगदी रोजच्या आयुष्यातले दाखले देत, हसत-खेळत शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला.
एम.ई.टी. आणि वेलिंगकर इन्स्टिटय़ूटमध्ये इंग्लिश-मराठी अशा मिश्र भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधत अतुलजींनी त्यांना आपलंसं करून घेतलं. कडक फॉर्मल्स, लॅपटॉप्स आणि बोर्डरूमच्या औपचारिक वातावरणात जीन्स-टीशर्ट घालून चक्क टेबलवर मांडी ठोकून हसत-खेळत गप्पा मारणारा अतुल विद्यार्थ्यांना आवडून गेलाच, पण त्याची राजकीय विचारसरणीही मुलांना विचार करण्यास भाग पाडणारी होती. ‘वेलिंगकर’मधल्या कार्यक्रमाला रुईया महाविद्यालयातल्या अंध विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
‘मतदान करा, लोकशाही जगवा’ ही चळवळ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवताना अतुलजी सांगत होते, ‘सगळी व्यवस्था एकदम बदलून टाकण्याच्या गोष्टी करण्यापेक्षा अगदी खालच्या पातळीवरून आपण काम सुरू करूया. स्वत:ला राजकीयदृष्टय़ा प्रगल्भ करूया. भ्रष्टाचार ही शेवटी वृत्ती आहे. ५० रुपयांचा भ्रष्टाचार करणारा सामान्य माणूस आणि ५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणारा राजकारणी यांची मेंटेलिटी सारखीच असते. ही वृत्ती बदलण्यासाठी मी स्वत:ला बदलणं गरजेचं आहे. एक सामान्य नागरिक म्हणून मला या क्षणी काय करणे शक्य आहे. आणि सर्वात आवश्यक आहे, तर ते म्हणजे मतदान. माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे, असा नैराश्यवादी विचार आपण सर्वानीच आता झटकून टाकायला हवा. हाच आशावाद आता सर्वानी आपल्या मनात जागृत करण्याची गरज आहे.’
डोंबिवली येथे पेंढरकर कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमात अजिंक्य नवरे व स्वप्निल घैसास

 

यांच्या ‘संक्रमण’ ग्रुपने केलेली मतदानविषयक जागृतीची शॉर्टफिल्म सर्वाचीच दाद मिळवून गेली. तरुणाई वेळ आली, की आपली जबाबदारी ओळखून आपल्या परीने किती महत्त्वाचं काम करते, हेच यातून सिद्ध झालं. प्रथमेश पेंढारकर या तरुणाची या कार्यक्रमाबद्दलची प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती. तो म्हणाला, ‘आतापर्यंत मीही अशाच मताचा होतो, की वाईट उमेदवाराला मतदान करून माझे मत वाया घालवण्यापेक्षा मी मतदानच करणार नाही. या सगळ्या प्रक्रियेविषयी मी निरीच्छ बनलो होतो. पण आता मात्र मी नक्की मतदान करणार आहेच; पण माझे मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांनीही मतदान करावं, जागरूक व्हावं यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन.
या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन स्पृहा जोशी हिने केलं. ‘लोकसत्ता’चे महानगर संपादक विनायक परब यांनी या कॅम्पेनमागची भूमिका सर्वाना समजावून सांगितली. तर साठय़े महाविद्यालय येथील उद्घाटन व ज्ञानसाधना महाविद्यालय येथील समारोपाच्या कार्यक्रमास ‘लोकसत्ता’चे संपादक व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी उपस्थित राहून सर्वाना मार्गदर्शन केलं.
कार्यक्रमाच्या संयोजनात ‘कॅम्पस मूड’ टीमने महत्त्वाचा वाटा उचलला होता. वरद लघाटे यांच्या नेतृत्वाखालील कॅम्पस मूड टीमने हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले.
लोकसत्ता-कॅम्पस मूड कॅम्पेन आणि अर्थात अतुल कुलकर्णी यांनी तरुणाईला एक वेगळी दिशा दाखवली आणि त्यांच्या मनात राजकारणाविषयी नवी जागरुकता निर्माण केली. कार्यक्रम झाल्यावर ‘आपण आज खूप काही शिकलो’ हे समाधान प्रत्येक तरुणाच्या चेहऱ्यावर दिसत होतं, आणि हीच ‘लोकसत्ता-कॅम्पस मूड कॅम्पेन’ यशस्वी झाल्याची पावती होती.
कॅम्पस मूड प्रतिनिधी
Campusmood@gmail.com

अतुल कुलकर्णी म्हणतात..
लोकसत्ता कॅम्पस मूड कॅम्पेनमधून असे लक्षात आले की सगळ्यांच्याच मनात प्रश्न आहेत. सर्वानाच बोलायचे आहे, काही सांगायचे आहे. त्यामुळेच यानिमित्ताने आपले मत मांडायला तरूणांची मते ऐकायला खूप मजा आली. सर्वच महाविद्यालयांमधून हा उपक्रम सुरू राहिला तर त्याची नक्कीच उपयोग होईल. या संपूर्ण कॅम्पेनमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच प्राचार्य आणि प्राध्यापकांनीही उत्साहाने भाग घेतला.

प्राचार्य म्हणतात..
‘लोकसत्ता-कॅम्पस मूड’च्या ‘पहिले ते राजकारण’ या कॅम्पेनअंतर्गत विविध महाविद्यालयांतील तरूणांशी अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी मनमोकळा संवाद साधला. या कॅम्पेनच्या निमित्ताने सर्वाना राजकारणावर बोलण्याची आणि शंकांचे निरसन करण्याची संधी मिळाली. त्यापैकीच या काही बोलक्या प्रतिक्रिया..

आयुष गटानी - वेलिंगकर इन्स्टिटय़ूट
‘लोकसत्ता कॅम्पस मूड कॅम्पेन’मुळे तरुणांमध्ये राजकारणाविषयी असलेला गैरसमज आशयपूर्णरीत्या दूर करण्यात आला आहे. या कॅम्पेनमुळे मी स्वत: खूप काही शिकलो आहे आणि ३० एप्रिलला मी योग्य उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

मीनल व्यास - वेलिंगकर इन्स्टिटय़ूट
तरुणांमध्ये राजकारणाविषयी उत्सुकता आणि विचार करायला लावणारं कॅम्पेन करून लोकसत्ता आणि अतुल कुलकर्णी यांनी खूप मोलाची कामगिरी केली आहे. तरुणांना उपदेश न देता त्यांच्याशी थेट संवाद साधला याचं विशेष कौतुक वाटलं. हा उपक्रम पुढेही चालू ठेवावा.

अपूर्वा वरवडेकर - व्ही. जे. वझे कॉलेज
लोकसत्तातर्फे आयोजित केलेलं हे कॅम्पेन मला मनापासून आवडलं. कॅम्पेनमध्ये उपस्थित केलेल्या सगळ्या मुद्दय़ांशी मी पूर्णपणे सहमत आहे आणि या कॅम्पेनमुळे निश्चित तरुणवर्गामध्ये राजकारणाविषयी महत्त्व निर्माण होऊन ते स्वत:हून मतदान करतील याविषयी खात्री वाटते. मीही या उपक्रमात सहभागी व्हायला तयार आहे. ‘लोकसत्ता’ने सुरू केलेलं हे कॅम्पेन अतिशय वाखाणण्याजोगं आहे; पण अशा प्रकारचे प्रयोग गावागावांमधूून झाले पाहिजेत असं मला मनापासून वाटतं. अतुल कुलकर्णी अभिनेता म्हणून माहीत होते, पण राजकारणासारख्या विषयातही त्यांना रस आहे आणि त्याविषयी ते ज्या कळकळीने बोलत होते ते ऐकून आता नक्कीच बदल घडेल असं जाणवत आहे.

अजिंक्य देवधर - रामनारायण रुईया महाविद्यालय
अतुल कुलकर्णी यांनी टाकलेलं पाऊल खूपच दिलासा देणारं व आशादायक चित्र उभं करणारं आहे. ज्या राजकीय प्रगल्भतेबद्दल अतुल कुलकर्णी बोलत होते ती आजच्या तरुणांमध्येही आहे. फक्त त्याला एक दिशा मिळण्याची गरज आहे आणि लोकसत्ता कॅम्पस मूड कॅम्पेनने ती दिली आहे असं मला वाटतं. त्यामुळे उपक्रमात मलाही सामील व्हायला आवडेल.

सलोनी सुलाखे - (एसवायजेसी, सायन्स, साठय़े कॉलेज)
कार्यक्रम फारच छान होता. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांशी संवाद साधला गेला व लोकांची मतं ऐकायला मिळाली. खरेतर यामध्ये जास्तीतजास्त तरुणांनी सहभागी होण्याची गरज आहे. मला अशा उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल.

यशवंत चंदनशिवे - (एम.ए., मुंबई विद्यापीठ)
तुम्ही हा राजकारणाबद्दलचा कार्यक्रम राबवून तरुण पिढीला घडवत आहात. यामुळे पुढील काही काळात, स्थिर सरकार येईल. कारण त्याची बीजे तुम्ही आतापासूनच रोवत आहात. त्याबद्दल तुमचे अभिनंदन.


सदया मयेकर - (प्रथम वर्ष, एलएलबी, फग्र्युसन महाविद्यालय, पुणे)
ग्राऊंड लेव्हलवर जागृती करण्यासाठी हा चांगला प्रयत्न आहे. या कार्यक्रमामुळे राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा असावा, मतदानाच्या वेळी कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे ते कळले.

संदीप विचारे - (जेबीआयएमएस)
मतदारांमध्ये वाढत चाललेली उदासीनता कमी करण्यासाठी फार चांगला उपक्रम राबवल्याबद्दल ‘लोकसत्ता’ आणि अतुल कुलकर्णी यांचे आभार. राजकीय प्रगल्भता, जाणीव आणि मुलभूत शिक्षण यांच्या दिशेने जाणारी ही चळवळ स्तुत्य आहे. निरनिराळ्या स्तरांवर होणाऱ्य निवडणूका डोळ्यापुढे ठेवून यापुढेही हा उपक्रम सुरु ठेवल्यास त्याचा परिणाम समाजमनावर नक्कीच चांगला होईल.

योगिता गटकळ - (पेंढरकर कॉलेज)
लोकसत्ता-कॅम्पस मूड कॅम्पेनचा हा उपक्रम स्तुत्य आहे. या कार्यक्रमामुळे राजकारणाविषयी माझ्या मनात असलेल्या अनेक शंकांचे निरसन झाले. यावेळी माझी मतदानासाठी नोंदणी झालेली नसली तरी पुढल्या वेळेस मी नक्की मतदान करेन. आता ज्यांची नोंदणी झाली आहे, त्यांना मी मतदान करण्याची विनंती करेन.

संदेश पडवळ - (स्वामी विवेकानंद नाईट कॉलेज, डोंबिवली)
‘लोकसत्ता’तर्फे आयोजित केलेला हा कार्यक्रम फारच उल्लेखनीय होता. मी या कार्यक्रमाला अतुल कुलकर्णी आहेत म्हणून आलो होतो. पण इथे आल्यावर मला जाणवले की ‘रंग दे बसंती’मध्ये अतुलने जी भूमिका केली आहे, तसेच ते खऱ्या आयुष्यातही आहेत. त्यांनी सांगितल्या प्रमाणे वाईट आणि अतिवाईट असे दोन पर्याय आपल्यासमोर आहेत, आणि त्याबद्दलचा निर्णय आपण घेतला पाहिजे. या कार्यक्रमामुळे तरुणांमध्ये निश्चितच जागरुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे परिस्थिती बदलेल याची मी खात्री बाळगतो.

जे.जी. इराणी - (संचालक, मारकॉम, एमईटी, वांद्रे)
‘लोकसत्ता-कॅम्पस मूड कॅम्पेन’ च्या निमित्ताने ‘लोकसत्ता’, ‘अतुल कुलकर्णी’ आणि ‘एमईटी’ हे तीन ब्रॅण्ड्स एकत्र आले ही खूप छान गोष्ट आहे. या तिघांचीही विचारसरणी जुळते. हा कार्यक्रम ‘आय ओपनर’ होता. ‘मतदान करा’ हे सांगण्यापेक्षा ‘मतदान का करा’ हे त्यांचे सांगणे पटले, उमेदवारांना कसे ओळखावे ते कळले. तरुणांमध्ये आणि एकूणच समाजात जागृती करण्यासाठी ही फार चांगली सुरुवात आहे. ही मोहिम मोठय़ा प्रमाणावर राबवली गेल्यास त्याचा चांगला परिणाम नक्कीच दिसून येईल.

डॉ. उदय साळुंखे - (समूह संचालक, वेलिंगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च, माटुंगा)
राजकीय जागृती असणं आवश्यक आहे. फक्त भारतीय नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारण समजून घेण्याची प्रगल्भता आपल्यात हवी, कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय राजकारणाचे आणि समाजकारणाचे प्रतिबिंब दिसून येते.

प्राचार्या डॉ. मंगला सिन्नरकर - (पेंढरकर महाविद्यालय, डोंबिवली)
‘लोकसत्ता-कॅम्पस मूड’ कॅम्पेन अतिशय सुंदर झाले. हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल लोकसत्ताचे अभिनंदन. कुठल्याही पक्षाचा अभिनिवेश न बाळगता राजकारणाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी या कार्यक्रमाने दिली. निवडणूकीबद्दल तरुण मतदारांमध्ये निकोप राजकीय राजकीय मत निर्माण करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद होता. नवीन पिढीमध्ये नवचैतन्य निर्माण करणारं हे जागरुकता अभियान निश्चितच कौतुकास्पद होतं.

प्राचार्य डॉ. गणेश विशे - (ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे)
या कार्यक्रमामुळे तरुणांमध्ये जागरुकता वाढण्यास निश्चितच मदत झाली आहे. ‘लोकसत्ता’ने पुढाकार घेऊन ही अतिशय अतिशय चांगली मोहीम सुरू केली आहे. अतुल कुलकर्णी सारखे कलाकार राजकारणाविषयी जागरुकता निर्माण करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. तरुणांशी तरुणांच्याच भाषेत, त्यांच्याच देहबोलीनुसार अतुल कुलकर्णी बोलले हे फार उत्तम झाले.

दिल से..
प्रिय सावनी,
उद्या रात्री आठला माझी दिल्लीहून फ्लाईट आहे. मी मतदानासाठी मुंबईला येतोय. मला फार मजा वाटतेय, एकतर मी खास मतदानासाठी मुंबईत येतोय आणि तब्बल नऊ महिन्यानंतर माझी मुंबई व्हिजिट होत आहे. तुला भेटायचीही उत्सुकता आहेच. काहीही कारण न देता तू मला receive करायला airport ला येशील. तुला बऱ्याच दिवसांनी प्रत्यक्ष बघायला मी फार उत्सुक आहे. खूप काही सांगायचंय, धमाल करायचेय. मी आठवडाभर मुंबईत आहे. त्यामुळे तू तुझे सर्व प्लान्स रद्द करून माझ्याबरोबर संपूर्ण वेळ घालवणार आहेस आणि ही request नाही हा आदेश आहे.
तू सॉलिड आहे यार, तुझं ते काय बालप्रेम आहे ते मस्त आहे. मला आठवतंय तू मला जबरदस्तीने एका लहान मुलांच्या कॅम्पला घेऊन गेली होतीस आणि त्या पोरांनी माझा जो काय पुरता मामा करून सोडला होता तो मी विसरूच शकत नाही. पण तू सर्व ते छान एन्जॉय करतेस आणि सुट्टीतला वेळ सत्कारणी लावतेस.
मी जसं वर तुला म्हणालो, मी फार excited आहे या वेळी मतदानाबद्दल. मतदानाची एकूणच टक्केवारी मुंबईत सॉलिड असेल असं चित्र सध्यातरी असलं तरी नक्की काय ते ३० एप्रिललाच कळेल. उमेदवारांबद्दल बोलायचं झालं तर पूर्ण धमालच आहे. मी मागच्या आठवडय़ातच आमच्या मतदारसंघातून उभ्या राहणाऱ्या उमेदवारांच्या प्रोफाईल्स चेक केल्या होत्या, पण अध्र्याहून अधिक उमेदवारांनी कोणत्या पदासाठी apply केलंय याची त्यांना सुतराम कल्पनादेखील दिसत नाहीये, इतकी वाईट परिस्थिती आहे. पण शेवटी वाईटातला कमी वाईट आज घडीला तरी आपल्याला निवडायचा आहे आणि मुळात कुठलंही कारण न देता मतदान हे सर्वानी compulsory करायचंच आहे तरंच ही लोकशाहीची प्रक्रिया टिकून राहणार आहे.
बाकी प्रत्यक्ष भेटल्यावर बोलूच. मी तुझ्यासाठी मस्त गिफ्ट खरेदी केलं आहे, आता ते काय ते आल्यावर कळेलच. तुझी उद्या वाट बघतोय airport वर, नक्की ये. काळजी घे.
Love you
मिहीर