Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

भोकरजवळील अपघातात १० ठार
भोकर, २७ एप्रिल/वार्ताहर

 

भोकरहून हिमायतनगरकडे जाणारी मालमोटार व समोरून येणारी अवैध प्रवासी वाहतूक करणारी काळीपिवळी जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात १० जण जागेवरच ठार, तर सहाजण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी १०.३० वा. भोकर-हिमायतनगर रस्त्यावरील टाकराळा फाटय़ाजवळ घडली. हा अपघात इतका भीषण होता की मृतांची ओळख पटणेही अवघड झाले आहे. जखमींवर भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारार्थ नांदेडला हलविण्यात आले आहे.
भोकर-हिमायतनगरमार्गे चंद्रपूरकडे सिमेन्ट आणण्यासाठी जात असलेली मालमोटार (क्र. एमएच-२६-एच-६११३) व समोरून भरधाव वेगाने किनवट येथून अवैध प्रवासी घेऊन नांदेडकडे जाणारी काळीपिवळी जीप (क्र. एमएच-२६-बी-८२४१) या दोन वाहनांत समोरासमोर टक्कर झाली. अपघातात जीपचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून, जीपचालक माधव जाधव (रा. सोनखेड), बाबासाहेब नारायण देशमुख (वय ४५, रा. पोटा, ता. हिमायतनगर), नंदकुमार शंकरराव गुंडेराव (वय २७, रा. अशोकनगर, भोकर), पिराजी नागोराव धोत्रे (रा. गंगानगर, किनवट), भाऊसाहेब आनंद देशमुख (वय ४५, रा. पोटा, हिमायतनगर) यांच्यासह अन्य पाचजणांचा मृतांमध्ये समावेश आहे. त्यांची ओळख अद्यापि पटलेली नाही. सुमन सुरेश सिंगने (वय ३०), सुरेश दिगंबर सिंगने (वय ३५) (दोघे रा. भिसी, ता. किनवट), बाबुराव संभाजी खारटे (वय ३२, कोल्हारी, ता. किनवट), परमेश्वर गंगाराम खुपसे (वय २६, पोटा, ता. हिमायतनगर), नितीन सुभाष काळे (वय २४, इस्लापूर), प्रभेकुमार भाऊराव देहदौडे (वय २५, रा. पोहरादेवी, ता. दिग्रस) आदी सहाजण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. जीवने पावडे, डॉ. साईनाथ वाघमारे यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अपघाताची बातमी कळताच भोकरचे पोलीस निरीक्षक शिवशंकर मुंडे, माधवराव जवळगावकर, भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाशराव भोसीकर, संचालक रामचंद्र मुसळे, पत्रकार विठ्ठल फुलारी, जमादार जाधव, तामसाचे सहायक पोलीस निरीक्षक गाडे यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी जाऊन जखमींना भोकरला हलवले आणि मृतांना भोकरच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले. अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात मालमोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालमोटारचालक अपघात होताचक्षणी फरार झाला आहे.
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपमुळे अपघात वाढले अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळीपिवळी जीप अतिशय सुसाट वेगाने निष्काळजीपणे चालवून, यापूर्वीही अनेकवेळा अपघात झाल्याच्या घटना येथे घडल्या. परंतु त्यांच्या वेगावर कोणीही निर्बंध घालू शकलेले नाही. काळीपिवळी जीपचालक समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देखील देत नसून सरळ अंगावर येतात, अशा अनेक वाहनधारकांच्या तक्रारी आहेत.