Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

झोपडपट्टीवासीयच ठरविणार मुंबईतील खासदार !
प्रसाद केरकर
मुंबई, २७ एप्रिल

 

कर भरणाऱ्या मुंबईकर मध्यमवर्गीयांनी कितीही टिमकी वाजविली तरी मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील खासदारांची ‘निवड’ करण्याचा अधिकार त्यांच्या हाती नाही. मुंबईतील झोपडपट्टीवासीयांचे प्राबल्य लक्षात घेता आणि जवळजवळ प्रत्येक मतदारसंघात त्यांचा असलेला वरचष्मा विचारात घेता मुंबईतील सहाही मतदारसंघातील खासदार कोण असेल हे झोपडपट्टीवासियच ठरविणार आहेत, हे निश्चित!
मॅगासेसे पुरस्कार विजेते व नॅशनल स्लम डेव्हलपर्स फेडरेशनचे अध्यक्ष ए. जोकीम यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, मुंबईतील चार लोकसभा मतदारसंघामध्ये ५० टक्क्यांहून जास्त झोपडपट्टीवासिय आहेत. अन्य दोन मतदारसंघात एक तृतियांश मतदार झोपडपट्टीतील रहिवासी आहेत. त्यामुळे सहाही लोकसभा मतदारसंघांमध्ये झोपडपट्टीवासियांचे निर्विवाद प्राबल्य आहे. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष झोपडपट्टीवासियांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मुंबईतील उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये ७४ टक्के, उत्तर-पूर्व मतदारसंघात ६९.४ टक्के, दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात ६२ टक्के मतदार हे झोपडपट्टीत राहणारे आहेत. ताज्या जनगणनेतील आकडेवारीचा हवाला देऊन ए. जोकीम म्हणाले की, मुंबईतील एक कोटी १९ लाख लोकसंख्येपैकी ६४ लाख म्हणजे ५४.०६ टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. एवढी मोठी झोपडपट्टीवासियांची लोकसंख्या लक्षात घेता मुंबईतील खासदार कोण असेल हे ठरविण्याचा अधिकार झोपडपट्टीतील रहिवाशांकडेच असेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे झोपडपट्टीवासीय मोठय़ा संख्येने मतदानाचा आपला अधिकार बजावतात आणि मध्यमवर्गीय मत न देता घरीच राहून सुट्टी ‘एन्जॉय’ करणे पसंत करतात.
झोपडपट्टीवासियांची मुंबईतली एवढी मोठी संख्या लक्षात घेता त्यांच्या समस्या सोडविण्याच्यादृष्टीने प्रत्येक राजकीय पक्षाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज ए. जोकीम यांनी व्यक्त केली. निवडणुकीत अनेक आश्वासने दिली जातात, मात्र नंतर त्याची पूर्तता केली जात नाही, अशी झोपडपट्टीवासियांची तक्रार आहे.