Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मुलुंड येथे महिलेने मुलांसह जाळून घेतले
मुंबई, २७ एप्रिल / प्रतिनिधी

 

जेवण वाढण्यावरून पतीशी झालेल्या किरकोळ भांडणाचे निमित्त होऊन महिलेने पोटच्या तीन चिमुरडय़ांसह जाळून घेण्याची हृदयद्रावक घटना रविवारी मध्यरात्री मुलुंड येथे घडली. या घटनेत संबंधित महिलेसह तिच्या दोन वर्षांच्या मुलीचा १०० टक्के भाजल्याने जागीच मृत्यू झाला, तर पतीसह दोन महिन्यांचा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्यावर ऐरोली येथील रुग्णालयात उपचार असून मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या मन हेलावून सोडणाऱ्या घटनेने परिसरात शोककळा पसरली होती. ज्योती कोरडे (२४) असे या महिलेचे नाव असून तिने सिद्धी (२), निशा (५) आणि सुर्वेश (दोन महिने) या तीन मुलांसह रविवारी रात्री जाळून घेतले. यात तिचा आणि सिद्धी या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर पती दिलीपसह निशा आणि सुर्वेश ही दोन मुले जखमी झाली. त्यांना सुरूवातीला मुलुंड जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना ऐरोली येथे हलविण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंलुंड येथील एस. एन. मार्गावरील स्थानू सोसायटीमध्ये पती आणि तीन मुलांसह राहणाऱ्या ज्योतीचे रविवारी रात्री अकराच्या सुमारास दिलीपसोबत जेवण वाढण्यावरून किरकोळ भांडण झाले. हे भांडण विकोपाला गेल्यामुळे शेजाऱ्यांनी हस्तक्षेप करून भांडण मिटवले. भांडणानंतर ज्योती तीन मुलांसह स्वयंपाकघरात गेली व तिने आतून दार लावून घेतले. रात्री अकाराच्या सुमारास संतापलेल्या ज्योतीने स्वत:सह तिन्ही मुलांच्या अंगावर केरोसिन ओतून जाळून घेतले. त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या दिलीपलाही आगींच्या ज्वाळांनी घेरले. त्यांचा आरडाओरड ऐकून शेजारी जागे झाले आणि त्यांनी कोरडे यांच्याकडे धाव घेऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र शेजाऱ्यांची मदत मिळेपर्यंत ज्योती आणि दोन वर्षांच्या सिद्धीचा १०० टक्के भाजल्यामुळे मृत्यू झाला. तर दिलीप, निशा आणि सुर्वेश जखमी झाले. दिलीप आणि निशा २० टक्के भाजले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र अवघ्या दोन महिन्यांचा सुर्वेश ४० टक्के भाजल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.