Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
प्रादेशिक

बाळासाहेबांच्या ‘व्हीसीडी’ने घेतला ठाणेकरांच्या मनांचा ठाव!
ठाणे, २७ एप्रिल / प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाणेकरांचे ४० वर्षांचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या भावनिक आवाहनाची किंमत ठाणेकरांच्या दृष्टीने मोठी आहे. याच भावनिक नात्याचा धागा पकडून आज सेंट्रल मैदानावर सभा उद्धव यांची असली तरी सेनाप्रमुखांनी ठाणेकरांना केलेल्या आवाहनाची व्हीसीडी उपस्थितांच्या हृदयाचा ठाव घेऊन गेली. वृद्धापकाळाने थकलेल्या बाळासाहेबांनी काही वर्षांपूर्वी याच मैदानात व्यासपीठावरून घातलेल्या साष्टांग दंडवताची आठवण ताजी करून देणाऱ्या अवघ्या १० मिनिटांच्या घणाघाती भाषणात त्यांनी केंद्र, राज्य सरकारबरोबरच राज ठाकरे यांच्या मराठी मुद्दय़ाचा समाचार घेत मला मराठीचा अभिमान शिकविता काय, असा सवाल करून मराठी माझा श्वास व हिंदुत्व माझा आत्मा असल्याचे ठणकावले!

संजीव नाईक यांच्यामागे ‘डॉक्टर’ उपाधीचे शुक्लकाष्ट निवडणुकीनंतरही राहणार
मुंबई, २७ एप्रिल/प्रतिनिधी
ठाणे लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजीव गणेश नाईक यांच्या मतपत्रिकेवर छापायच्या नावामागे ‘डॉक्टर’ ही उपाधी जोडण्यावरून उच्च न्यायालयात उपस्थित केला गेलेला वाद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही कायम राहणार आहे. संजीव नाईक यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात आपले शिक्षण ‘इयत्ता १२ वी’ असे दिले होते.

राजकीय भवितव्याचा निर्णय विलासरावांनी सोपविला सोनियांवर !
मुंबई, २७ एप्रिल / खास प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाने आपल्याला भरपूर काही दिले. त्यामुळे यापुढे केंद्र वा राज्यात काम करायचे याचा निर्णय काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर सोपविला असल्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आज सांगून आपले राजकीय भवितव्य सोनियांवर अवलंबून असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात सर्वाधिक सभा घेतलेल्या देशमुख यांनी, निवडणुकीत आघाडीला ३० ते ३२ जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. आघाडीत सर्वाधिक जागा काँग्रेस की राष्ट्रवादी यापैकी कोणाला मिळतील याबाबत भाष्य करण्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत टाळले.

संसदेवर हल्ला झाला तेव्हा सोनिया आणि राहुल कुठे होते - राज ठाकरे
मुंबई, २७ एप्रिल / प्रतिनिधी

मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला तेव्हा राज ठाकरे कोठे होते, असा सवाल करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर राज ठाकरे यांनी आज तुफान हल्ला चढविला. संसदेवर हल्ला झाला त्यावेळी राहुल गांधी गोटय़ा खेळत होते का आणि सोनिया गांधी कोठे होत्या, असा जळजळीत सवालही त्यांनी या वेळी केला. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा दिल्लीतील उत्तर भारतीय नेत्यांचा डाव असून तो उधळून लावा, असे आवाहनही त्यांनी केले.

वांद्रे शासकीय वसाहतीतील रहिवासी मतदानावर बहिष्कार टाकणार !
पुनर्विकासाच्या प्रस्तावाचा निषेध
मुंबई, २७ एप्रिल / खास प्रतिनिधी
वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत रहिवाशांतर्फे सातत्याने सुरु असलेल्या आंदोलनांचाच एक भाग म्हणून सुमारे पंचवीस हजार रहिवासी लोकसभा निवडणुकांच्या मतदानावर बहिष्कार घालणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या पुनर्विकासाच्या प्रस्तावात कर्मचाऱ्यांच्या मालकी हक्काच्या घराचा विचार नसल्याने या प्रस्तावाचा निषेध मतदानावर बहिष्कार टाकून करण्यात येणार आहे.

‘मस्कार्ड’ बँक कर्मचाऱ्यांना थकित ‘डीए’ ३६ हप्त्यांत

मुंबई, २७ एप्रिल/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सहकारी कृषि, ग्रामीण व बहुद्देशीय विकास बँकेने (मस्कार्ड बँक) त्यांच्या सुमारे २५० कर्मचाऱ्यांना वाढीव महागाईभत्त्याची (इन्डेक्स डीए) १ एप्रिल २००२ पासूनची थकलेली सुमारे १५.४० कोटी रुपयांची रक्कम ३६ समान मासिक हप्त्यांत द्यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी दिला. वाढीव ‘डीए’चे हे हप्ते देणे येत्या जुलैपासून सुरु केले जावे आणि याखेरीज कर्मचाऱ्यांचा महिन्याचा पगारही नियमित दिला जावा, असेही न्यायालयाने सांगितले आहे.

राबोडीत सीआरपीएफ तैनात
बोगस रेशनकार्ड तपासणीसाठी पथक
ठाणे, २७ एप्रिल /प्रतिनिधी
जातीय दंगलीच्या पाश्र्वभूमीवर राबोडीतील नऊ मतदान केंद्रांसह पालघर आणि ठाण्यातील ३३ संवेदनशील मतदान केंद्रांवर सीआरपीएफची कंपनी तैनात करून सूक्ष्म निरीक्षण आणि मतदानाचे चित्रीकरण केले जाणार आहे. तसेच विधानसभानिहाय मतदान केंद्रात मतदानाची रंगीत तालीम होऊन बोगस रेशनकार्ड तपासणी पथकांची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांनी दिली.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी ठाणेकरांचा ‘रोड शो’
ठाणे, २७ एप्रिल /प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून सेलिब्रेटींच्या आणि बडय़ा नेत्यांच्या ‘रोड शो’चे आयोजन केले जात आहे. परंतु मतदारराजा जागा हो, मतदानाचा हक्क बजाव, असे आवाहन करणारा आणि कोणताही राजकीय रंग नसलेल्या ‘रोड शो’चे रविवारी ठाण्यात आयोजन करण्यात आले होते. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. मतदारांनी मतदान का व कशासाठी करावे, याबाबत कोणताच पक्ष जनजागृती करताना दिसत नाही. परिणामी मतदारांमध्ये असलेल्या निरुत्साहाचा मतदानावर परिणाम होतो.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याला लकाकी दागिन्यांपेक्षा सुवर्ण-गुंतवणुकीकडे कल
मुंबई, २७ एप्रिल/ व्यापार प्रतिनिधी
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पारंपरिकपणे सोनेखरेदीला जोम चढला पण तो दागिन्यांच्या खरेदीपेक्षा, बँका व वित्तीय संस्थांच्या विविध सुवर्ण गुंतवणूक योजनांकडे अधिक असल्याकडे सराफ बाजाराचा एकंदर कल स्पष्ट करतो. सध्याच्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात भविष्याच्या दृष्टीने सुरक्षित गुंतवणूक सोन्याकडे पाहण्याचा जनसामान्यांच्या बदललेल्या दृष्टिकोनाचा हा प्रत्यय असल्याचे जाणकार सांगत आहेत. आज झालेल्या व्यवहारात मागणी वाढल्याने स्टँडर्ड सोन्याने १० ग्रॅममागे १३५ रुपयांची वाढ दर्शविली आणि गेले काही दिवस सुरू असलेल्या भावातील पडझडीला विराम दिला.

बसपा मुंबईत दोन जागांवर प्रभावी ठरण्याची शक्यता
मुंबई, २७ एप्रिल / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना -भाजपा युतीला मनसे फॅक्टर चकवा देण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात असताना बहेनजी मायावती यांचा बसपा मुंबई दक्षिण आणि मुंबई उत्तर - मध्य या दोन ठिकाणी प्रभावी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बसपाने मुंबईत सहाही ठिकाणी आपले उमेदवार उभे केले असले तरी मुंबई दक्षिणमध्ये महंमद अली आणि मुंबई उत्तर मध्य मध्ये हाजी शेख इस्माईल ऊर्फ भाईजान या दोन उमेदवारांमुळे लढती चौरंगी ठरल्या आहेत.

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी ३० एप्रिलला पहाटेच्या वेळी प.रे.च्या विशेष लोकल
मुंबई, २७ एप्रिल / प्रतिनिधी

निवडणूक डय़ुटीवरील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने गुरुवारी पहाटेच्या वेळेस चार विशेष लोकल चालविण्याची घोषणा केली आहे. या सर्व लोकल बारा डब्यांच्या असतील. निवडणुकीच्या दिवशी निवडणूक डय़ुटीवरील कर्मचाऱ्यांना सकाळी लवकर कामावर हजर रहावे लागते. मात्र सकाळी लोकल उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांना वेळेवर डय़ुटीवर हजर होणे शक्य नाही. या पाश्र्वभूमीवर ३० एप्रिल रोजी या विशेष लोकल चालविण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. चर्चगेट-बोरिवली आणि चर्चगेट-विरारदरम्यान या लोकल चालविल्या जातील. चर्चगेटहून विरार आणि बोरिवलीकरिता अनुक्रमे पहाटे ३.०० आणि ३.३० वाजता विशेष लोकल सुटतील. त्याचवेळी विरार आणि बोरिवलीहूनही विशेष लोकल चर्चगेटकडे रवाना होतील. या सर्व लोकल पहाटे ४.४० वाजण्याच्या सुमारास गंतव्यस्थळी पोहोचतील. या लोकल सर्व स्थानकांत थांबतील.

काँग्रेसने आम आदमीसाठी काय केले ? - जोशी
मुंबई, २७ एप्रिल / प्रतिनिधी

लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत काँग्रेसने आम आदमीचा नारा देऊन या देशातील गोरगरिबांना विकासाचे स्वप्न दाखविले. मात्र गरिबांसाठी काँग्रेसने काहीच केले नाही. आम आदमीचा नारा देणाऱ्या काँग्रेसने आम आदमीसाठी काहीच केले नाही, असा आरोप शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केला. डोंबिवली येथील फडके चौक येथे कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जोशी बोलत होते. काँग्रेसने गरिबांचा विकास तर केला नाहीच, परंतु महागाईमुळे एका वेळचे अन्नही मिळणे मुश्किल झाले आहे. कर्ज फेडू शकत नसल्याने गरीब शेतकरी आत्महत्या करीत आहे. कुपोषणामुळे लहान मुलेही मृत्युमुखी पडत आहेत, याला काँग्रेसच जबाबदार आहे, असेही जोशी म्हणाले.काँग्रेस ही लाचारांची परंपरा आहे. काँग्रेसला महाराष्ट्र किंवा देशाचा अभिमान नाही. लोकसभेत काँग्रेसचे मराठी खासदार असूनही पन्नास वर्षांत छत्रपतींचा पुतळा लोकसभेच्या प्रांगणात उभारला नाही, यांना कसला आहे महाराष्ट्राचा अभिमान, असा सवालही जोशी यांनी केला.

कुर्ला स्थानकात बॉम्बची अफवा
मुंबई, २७ एप्रिल / प्रतिनिधी

कुर्ला स्थानकातील पादचारी पुलावर आज दुपारी बेवारस बॅग आढळून आल्याने काही काळाकरिता स्थानकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र तपासणी केल्यानंतर ही निव्वळ अफवा असल्याचे निष्पन्न झाल्यावर परिस्थिती पूर्ववत झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी अडीचच्या सुमारास कुर्ला स्थानकातील पादचारी पुलावर एक बेवारस बॅग आढळून आली. बॅगेत बॉम्ब असल्याचा प्रवाशांचा समज होऊन परिसरात एकच खळबळ उडाली आणि घबराटीचे वातावरण पसरले. त्यानंतर तात्काळ रेल्वे पोलीस आणि बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. बॅगेची तपासणी केल्यानंतर ही केवळ बॉम्बची अफवा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर परिस्थिती पूर्ववत झाली.

वीजकेंद्रांच्या देखभालीत कुचराई केल्याचा ठपका
‘महानिर्मिती’च्या संचालकांना सक्तीची रजा!
मुंबई, २७ एप्रिल / प्रतिनिधी

वीजनिर्मिती केंद्रांच्या देखभालीच्या कामात कुचराई झाल्याचा ठपका ठेवून महानिर्मिती कंपनीचे संचालक मधुकर शेलार यांना आज सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. महानिर्मितीचे कार्यकारी संचालक सी. थोटवे यांच्याकडे संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. संचलकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची ही पहिलीच वेळ आहे. वीजनिर्मिती संच पूर्ण क्षमतेने चालविणे आणि कोळशाचा पुरवठा पुरेशा प्रमाणात आहे का, याची खात्री करणे ही संचालकांची जबाबदारी आहे. मात्र त्याच कामात त्यांनी कुचराई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, कोळशाची स्थिती चिंताजनक असून निर्मिती संचांच्या नादुरुस्तीचे प्रमाण वाढले आहे. चंद्रपूर येथील ५०० मेगाव्ॉटचा, खापरखेडा येथील प्रत्येकी २१० मेगाव्ॉचटचे दोन संच, परळी येथील २१० मेगाव्ॉटचा एक संच नादुरुस्त अथवा बंद पडल्याने १३४० मेगाव्ॉटची निर्मिती ठप्प झाली आहे. तथापि, भारनियमनात वाढ करण्यात आली नसल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे.