Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

ज्ञानसाधनामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद..
प्रतिनिधी
पाल्र्यातील साठय़े महाविद्यालय, वांद्रे येथील एमईटी इन्स्टिटय़ूट, माटुंग्यातील वेलिंगकर इन्स्टिटय़ूट, डोंबिवलीतील पेंढरकर महाविद्यालय या ठिकाणी ‘मतदान करा, लोकशाही

 

जगवा’ असे आवाहन तरुणांना केल्यानंतर ‘लोकसत्ता-कॅम्पस मूड कॅम्पेन’ची सांगता ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयात झाली. पंतप्रधानपदासाठी वयोमर्यादा हवी का? राजकारण्यांसाठी बुद्धिमत्ता चाचणी ठेवावी का? लोकशाहीबद्दल उदासीनता निर्माण करण्यात राजकारण्यांचा काही वाटा नाही का? सर्वसामान्यांना राजकारणात प्रवेश करायची इच्छा असली तरी घराणेशाहीमुळे ते शक्य होत नाही. सामान्य नागरिकांच्या मनात खदखदत असलेले प्रश्न या ठिकाणीही विचारले गेले व अतुल कुलकर्णी यांनी तितक्याच समर्पकपणे त्यांना उत्तरे दिली..
लोकशाहीबाबत उदासीनता निर्माण करण्यास राजकारणी जबाबदार नाहीत का, यावर बोलताना कुलकर्णी म्हणाले की, आपल्याला इतरांना नावे ठेवण्याची खूप सवय लागली आहे. हा मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांनी दूरचित्रवाणी मालिका आणि वृत्तवाहिन्यांचे उदाहरण दिले. खूप लोक वर्षांनुवर्षे सुरु असलेल्या मालिका, त्यातील मेलोड्रामा यांना नावे ठेवतात. पण तरीही त्याच मालिका बघतात. वृत्तवाहिन्यांनाही आपण सर्रास नावे ठेवतो. मात्र वृत्तवाहिन्या बघणे हे एक तंत्र आहे. ते आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न का नाही करत? रिमोट कंट्रोल असतो ना आपल्या हातात, मग टी.व्ही. बंद का नाही करत? आपण जर हा ताबा आपल्यावर ठेवू शकत नसू तर त्यांना दोष का द्यायचा? कृष्णमूर्ती मेश्राम यांनी राजकारण्यांसाठी आयक्यू टेस्ट असावी, असा मुद्दा उपस्थित केला. त्यावर अतुल कुलकर्णी उत्तरले की, केवळ बुद्धिमत्ता किंवा चांगला माणूस असणे ही राजकारणाची गरज नाही. राजकारण हा एक व्यवसाय आहे. तो ‘प्रोफेशनली’च हाताळता आला पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीकडे संघटन कौशल्य हवे, संसदीय कायद्यांचे भान हवे, नोकरशाहीला कसे हाताळायचे ते कळायला हवे. अशा अनेक गोष्टी राजकारणी होण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. केवळ चांगला माणूस आहे, पण त्याच्याकडे काहीच कौशल्य नाही, असा माणूस राजकारण करु शकेल काय याचाही विचार करणे गरजेचे आहे.
राजकारणाबद्दल जागरुक रहायचे म्हणजे सक्रिय राजकारणात उतरायचे असा समज बऱ्याच जणांचा झाल्याचे या तीन दिवसांच्या चर्चेतून आढळले. त्याबद्दल बोलताना अतुल कुलकर्णी म्हणाले की, राजकीयदृष्टय़ा जागरुक होणे म्हणजे सक्रिय राजकारणात उतरणे असा अर्थ होत नाही. पण एक नागरिक म्हणून आपल्या भोवती काय घडते आहे, याची जाणीव आपल्याला हवी.
‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर व उपनिवासी संपादक चंद्रशेखर कुलकर्णी हेही व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कुमार केतकर म्हणाले की, आपल्याकडे असलेल्या गोष्टींची आपल्याला किंमत नसते. भारतात हुकूमशाही पाहिजे, दंडुकेशाही पाहिजे अशी मागणी सुशिक्षितांकडूनच होते. भारताच्या शेजारी असणाऱ्या देशांकडे नजर टाकली असता, लोकशाही नसल्याने त्या देशांत कोणत्या प्रकारचे वातावरण आहे हे लक्षात येईल. भारत आज इतकी वर्ष लोकशाही टिकवू शकला आहे, याचा हेवा इतर देशांना वाटतो. मतदान सक्तीचे करावे असे अनेकांना वाटते, पण अशा प्रकारे सक्ती करणे हे लोकशाहीचे लक्षण नाही. निवडणूक ही एकदाच होते. लोकशाही मात्र आपल्याला कायम टिकवायची आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘लोकसत्ता’चे महानगर संपादक विनायक परब यांनी ‘लोकसत्ता-कॅम्पस मूड’ मोहीम सुरू करण्यामागची भूमिका सांगितली. आपण राजकारण, आपला इतिहास याबद्दल किती अनभिज्ञ असतो, हे सांगण्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिले. ‘लोकसत्ता’चे दिवंगत संपादक माधव गडकरी हे एकदा पानिपतला गेले होते. पानिपतच्या युद्धामुळे सगळा इतिहास बदलून गेला. त्यामुळे त्या जागेबद्दल त्यांना साहजिकच उत्सुकता होती. या पानिपतच्या युद्धाबद्दल त्यांनी एका स्थानिकाला विचारले. तो गोंधळला आणि म्हणाला ‘नहीं साहब कल-परसौ तो यहा पे कुछ नही हुआ’. मग माधव गडकरीनी त्याला सांगितले की आम्ही काल परवाची गोष्ट करत नाही आहोत. आम्ही इतिहासाबद्दल विचारतो आहोत. त्यावर तो माणूस उत्तरला, ‘नाही साहब में उस वक्त नही था’. विनायक परब यांनी हे उदाहरण देताच सभागृहात हशा पिकला. हे उदाहरण देण्यामागचा आपला उद्देश सांगताना विनायक परब म्हणाले की, आता आपण जे हसतो आहोत, ते स्वत:लाच हसतो आहोत. कारण आपणही आपल्या परिसरात काय चालले आहे, याबद्दल फारसे जागरुक नसतो.
देशाच्या राजकारणात ज्यांना काडीचाही रस नाही असे बोलले जाते, ते तरुण आज या मोहिमेला प्रतिसाद देत आहेत, असे प्रतिपादन चंद्रशेखर कुलकर्णी यांनी केले. आपल्या मताला किती किंमत आहे, हे जर तपासून बघितले तर ते या मोहिमेचे यश असेल. ही प्रक्रिया निरंतर सुरु रहावी अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. मतदानाबद्दल बोलताना ते म्हणाले की, मतदानाचा अधिकार भारतीयांना ‘पॉकेटमनी’ मिळावा इतका सहज मिळाला. त्यामुळे त्याची किंमत आपल्याला कळलीच नाही. अमेरिकेत कृष्णवर्णीयांना, इंग्लंडमध्ये महिलांना खूप मोठय़ा झगडय़ानंतर मतदानाचा अधिकार मिळाला हे आपण लक्षात घेतले पाहिजे. यानंतर राजतकारणासारख्या एका ज्वलंत विषयाला हात घातल्याबद्दल ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य जी. बी. विशे यांनी ‘लोकसत्ता’चे आभार मानले. पहिल्या सार्वत्रिक निवडणूका व त्यानंतर बदलत गेलेली परिस्थिती याचा त्यांनी आढावा घेतला. या मोहिमेत उत्स्र्फूतपणे सहभागी झाल्याबद्दल त्यांनी अभिनेते अतुल कुलकर्णी यांचे आभार मानले.