Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

राजकारणाच्या गप्पांत विरून गेली रिझल्टची चिंता
प्रतिनिधी

‘मतदान करू नये असेच माझे मत होते. ‘लोकसत्ता’च्या या मोहिमेबद्दलची बातमी वाचून

 

उत्सुकतेपोटी अतुल कुलकर्णी यांची मते जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. येथे आल्यानंतर मतदान का करायचं? या माझ्या प्रश्नाला उत्तर मिळाले त्यामुळे आता मी मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.’- प्रथमेश तांबे.
‘मी पेंढरकर कॉलेजची माजी विद्यार्थीनी. आमच्या वेळी असे उपक्रम होत नव्हते. आज एवढा चांगला उपक्रम माझ्या कॉलेजमध्ये होतोय याचा मला खूप आनंद आहे.’- ॠतुजा जोशी
डोंबिवलीतील पेंढरकर महाविद्यालयात शनिवारी आयोजित ‘लोकसत्ता-कॅम्पस मूड’ कॅम्पेनमध्ये सहभागी तरूणांपैकी या दोन प्रातिनिधिक प्रतिक्रिया. पेंढरकर महविद्यालयात खरेतर त्या दिवशी विद्यार्थ्यांचा रिझल्ट होता, पण तरीही महाविद्यालयाचे विद्यार्थी व त्याचप्रमाणे इतर उत्सुक डोंबिवलीकर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. सकाळी महाविद्यालयात प्रवेश केल्यावर प्रवेशद्वारासमोरच एका फळ्यावर या मोहिमेबद्दलची माहिती देण्यात आली होती, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या उत्सुकतेत आणखीनच भर पडत होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच राजकारणासारखा गंभीर विषय असूनही अतुल कुलकर्णीनी हसत -खेळत विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांना त्या तीन तासांसाठी रिझल्टची चिंता विसरायला भाग पाडले. आणीबाणीच्या काळात आपण राजकरणात रस घ्यायला लागलो. त्यानंतरची मनावर खोलवर परिणाम करणारी घटना म्हणजे मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी झालेला दहशतवादी हल्ला. असे अतुल कुलकर्णी यांनी म्हणताच. सभागृहाला त्या हल्ल्याची परत एकदा आठवण झाल्याचे जाणवले. शिक्षणाबद्दल बोलताना, चांगले शिक्षण म्हणजे चांगली डिग्री असा अर्थ होत नाही. आपण फक्त चांगली डिग्री मिळवण्यासाठी धडपड करतो, पण ज्ञान मिळवण्यासाठी मात्र तेवढेसे प्रयत्नशील नसतो. विद्यार्थी पाठांतर करतात. महान नेत्यांच्या जन्म तारखा, मृत्युदिन, त्यांनी उच्चारलेले एखादे प्रसिद्ध वाक्य. एवढीच आपल्याला माहिती असते. ही माहिती आपण घेतो, कारण आपल्याला त्यातून मार्क मिळवायचे असतात. मात्र त्यापलीकडे जाऊन ज्ञान मिळवण्याचा मात्र आपण प्रयत्न करीत नाही. या अतुल कुलकर्णीच्या मुद्यावर, माना डोलवून, हसून हा मुद्दा मनापासून पटल्याचे उपस्थितांनी दर्शवले. तीस मिनिटे हा एकतर्फी संवाद साधल्यानंतर दुतर्फी संवादासाठीचा प्रत्येक क्षण प्रश्न आणि उत्तरांनी जागवला.
निवडणुकांच्या वेळी राजकीय पक्ष वेगवेगळी आश्वासने देतात. ती पूर्ण करत नाहीत. प्रादेशिक पक्ष अनेकदा जवळचे वाटतात. मग त्याच पक्षाला मत का द्यायचे नाही? राजकारणी सत्तेवर येऊन भ्रष्टाचारच करतात. मग त्यांना निवडून देणे म्हणजे भ्रष्टाचार करण्याचा परवानाच देणे असा अर्थ होत नाही का? या प्रश्नांवर बोलताना अतुल कुलकर्णी म्हणाले की, भारतासारख्या महाकाय देशाने गेली साठ वर्षे सातत्याने लोकशाही टिकवून ठेवली आहे. ती राजकारण्यांमुळेच आपण टिकवू शकलो आहोत. एवढय़ा मोठय़ा देशांत लोकशाही यशस्वीपणे टिकवणे ही सोपी गोष्ट नाही. आज आपण या ठिकाणी बसून राजकारण्यांना बोलतो आहोत, दोष देत आहोत. आपल्यासाठी ही सोपी गोष्ट आहे. पण इतर देशांत ही गोष्ट शक्य नाही. आपल्या शेजारील सर्व देशांत कोणत्या प्रकारे अनागोंदी माजली आहे, ते आपण बघतोच आहोत. राजकारण्यांना नावे ठेवण्याचे थांबवून आपण सामान्य नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडतो आहोत का हेही आपण पाहिले पाहिजे, कारण आपली लायकी असलेलेच सरकार आपल्याला मिळते. या त्यांच्या बोलण्यावर सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. ३० एप्रिलला मतदान करा आणि त्यानंतर १६ मे या दिवशी टीव्हीवर आवर्जून मतमोजणी पहा असे आवाहन अतुल कुलकर्णी यांनी या चर्चेच्या शेवटी केले.
या कार्यक्रमाला ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक सुधीर जोगळेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या मोहिमेमागची ‘लोकसत्ता’ची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, ‘लोकसत्ता’ हे राजकीय व्यासपीठ नाही, तर लोकप्रबोधनाचे व्यासपीठ आहे. त्याच भूमिकेतून आम्ही ही मोहीमही सुरू केली. निवडणूक हा गंभीरपणे पाहण्याचा विषय आहे. मतदान हे केलंच पाहिजे. त्याबद्दल तरुणांमध्ये जागरुकता पसरण्याची खूप गरज आहे. ‘लोकसत्ता’ कधीच कोणत्या एका पक्षाची बाजू घेत नाही. भाजपवर या वृत्तपत्रातून जेवढी टीका केली जाते तेवढीच टीका कम्युनिस्ट पक्षावरही केली जाते. म्हणूनच ‘लोकसत्ता’च्या संपादकांनी कम्युनिस्टांचं वकीलपत्र घेतले आहे काय अशी टीका केली जात असतानाच, अणुकराराच्या मुद्यावर सहा अग्रलेख लिहून संपादकांनी डाव्यांवरही टीका केली होती.
कार्यक्रमाच्या शेवटी हा उपक्रम सुरु केल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार मानून पेंढरकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंगला सिन्नरकर म्हणाल्या की, अतुल कुलकर्णीसारखा विचारी अभिनेता आमच्या महाविद्यालयात आला आणि त्यांनी आज एक विचारप्रक्रिया सुरु केली आहे, ‘लोकसत्ता’ आणि कुलकर्णी यांनी हाती घेतलेली ही मोहीम अभिनंदनीय आहे. राजकारण म्हणजे वाईटच हा विद्यार्थ्यांच्या मनात असलेला गैरसमज यामुळे दूर झाला, याबद्दल मला समाधान आहे. राजकारण हे आपल्यासाठी आणि चांगला समाज घडविण्यासाठी आवश्यक आहे, हे प्रत्येकाने ध्यानात ठेवले पाहिजे. राजकारणात जाण्याची इच्छा असेल तर पालक विरोध करतात. असा प्रश्न संवादाच्या वेळी एका मुलीने विचारला होता. त्याबद्दल बोलताना मंगला सिन्नरकर म्हणाल्या की, सैन्यात जाणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच राजकारणात जाणं ही महत्त्वाचं आहे. लोकसत्ताने सुरु केलेल्या या अभियानामुळे तरुण मुलं-मुली आता या गोष्टीकडे डोळसपणाने पहायला लागतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

डोंबिवलीच्या स्वप्निल घैसास आणि अजिंक्य नवरे या दोन तरुणांनी मतदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी तयार केलेला एक लघुपट दाखवण्यात आला. एक छोटी मुलगी. ‘ नेलपॉलीश ’ लावण्याबद्दल खूप उत्सुक असते. आपली आई , शाळेतील शिक्षक या सगळ्यांना ती ‘ नेलपॉलीश ’ लावले का असे विचारत , पण कोणीच तिला प्रतिसाद देत नाही म्हणून ती हिरमुसली होते. मग एकदा रात्री तिची आई तिला म्हणते की उद्या आपण जाऊ नेलपॉलिश लावायला. आणि दुसऱ्या दिवशी आपल्या आईबरोबर ती मुलगीही मतदान केंद्रात जाते. त्या छोटय़ाशा मुलीला मतदानाबद्दल एवढी उत्सुकता आहे , तर जाणत्या व्यक्तींना का नसावी असा संदेश या लघुपटातून देण्यात आला आहे.

मुलुंड येथे केळकर महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकत असलेली मधुरा सप्रे ही मुलगी मनात एक निरागस प्रश्न घेऊन या कार्यक्रमाला आली होती. मधुराला १८ वर्षे पूर्ण नसल्याने मतदान करता येणार नाही. पण तिची मनापासून इच्छा होती , की तिच्या आजीने मतदान करावं. तिच्या आजीला मात्र या मतदानाचा काही फायदा नाही असे वाटत होते. मग मी माझ्या आजीला कसं समजावू , असा प्रश्न तिने अतुल कुलकर्णीना विचारला. कार्यक्रमाच्या शेवटी अतुल कुलकर्णी यांनी आपली स्वाक्षरी करून ‘ मतदान करा ’ असा संदेश मधुराच्या आजीला लिहून दिला.