Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आम आदमी के साथ..
गुरुदास कामत (काँग्रेस)-

अंधेरी पश्चिम येथील लिंक रोडवरील बनाना ट्रीज समोर दुपारी चार वाजल्यापासूनच काँग्रेस-

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते जमू लागले होते. उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार बलदेव खोसा यांच्यासह सरचिटणीस नंदकिशोर मसूरकर हे सर्व व्यवस्था पाहत होते. काँग्रेसचे उमेदवार गुरुदास कामत यांची प्रचारफेरी येथून सुरू होणार होती. काही वेळातच कामत तेथे आले आणि थेट प्रचाररथावर गेले. काँग्रेसचे झेंडे, सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांची चित्रे असलेले फलक हातात मिरवित ‘गुरुदास कामत आगे बढो हम तुम्हारे साथ है’ च्या जयघोषात पदयात्रेला सुरूवात झाली. ‘काँग्रेस का हाथ आम आदमी के साथ’, ‘सोनिया गांधी जिंदाबाद’, ‘चारित्र्यवान नेता, गुरुदास कामत’ आदी घोषणांनी दीड-दोन हजारांचा जमाव पुढे सरकत होता. सेवा दलाच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे प्रचारफेरीला वेगळेच परिमाण लाभले होते. मध्येच फटाक्यांची जोरदार आतषबाजी होत होती, ढोल-ताशे वाजत होते. तोपर्यंत कामत यांच्या प्रचारफेरीची संपूर्ण रचना करणारे मुंबई गृहनिर्माण मंडळाचे सभापती अमरजितसिंग मनहास, धर्मेश व्यास, महेश मल्लिक तसेच नगरसेवक इक्बाल काझी हेही या पदयात्रेत सामील झाले होते.
लिंक रोडवरून सरळ निघालेली रथयात्रा बॉन बॉन येथून डावीकडे वळली आणि ती अंधेरीतील सर्वात मोठय़ा असलेल्या इमारतीजवळ - अविनाश अपार्टमेंटजवळ आली. तेथे कामत यांचे सुवासिनींनी ओवाळून स्वागत केले. तेथून सातबंगला बस स्थानकाच्या मागील रस्त्यावरून मॉडेल टाऊन येथून चाचा नेहरू उद्यानाजवळ आली. तेथे राजेश ढेरे यांनी कामत यांचे जंगी स्वागत केले. तेथून पुढे सरकलेल्या सरदार पटेल नगर म्हाडा वसाहतीत प्रचारयात्रेला चांगलाच प्रतिसाद मिळाला. आमच्या वसाहतींमध्ये पाणी आणि रस्त्याची समस्या असल्याचे काहींनी कामतांच्या कानावर घातले.
निवडून द्या अगर देऊ नका. पण तुमचे काम नक्की करीन, असे आश्वासन देत कामतांची प्रचारयात्रा पुढे आलिशान लोखंडवाला संकुलात शिरली. स्वामी समर्थ नगराच्या कोपऱ्यावरच अनेक व्यापारी त्यांची वाट पाहत होते. कामत येताच एकच जल्लोष करीत या व्यापाऱ्यांनी त्यांना फुलाचा गुच्छ दिला. स्वामी समर्थांच्या मठाजवळून प्रचारयात्रा गेली तेव्हा ज्या प्रमाणे अनेकांचे हात जोडले गेले त्याप्रमाणे कामत यांनीही वाकून नमस्कार करून आशीर्वाद मागितला.
प्रचारफेरीतील सहभागी कार्यकर्त्यांची संख्या वाढतच होती. ओशिवरा पुलावरून मार्गक्रमण करीत मिल्लत नगरात शिरलेल्या प्रचारफेरीला जंगी प्रतिसाद मिळाला. रस्त्याच्या दुतर्फा झोपडीवासीयांनी चांगलीच गर्दी केली होती. शक्य तेवढय़ा प्रत्येकाला अभिवादन करण्याचा कामत यांचा प्रयत्न होता. काही मुस्लिम युवकही या ठिकाणी प्रचारफेरीत सहभागी झाले होते. याच ठिकाणी प्रचारफेरीची सांगता झाली तेव्हाही साधारणत: दीड-दोन हजारांचा जमाव होता. प्रचारफेरीच्या वेळी पाय घसरून पडल्याने जखमी झालेले बलदेव खोसा त्याही अवस्थेत शेवटपर्यंत पायी चालत सहभागी झाले होते. सर्वांना अभिवादन करून कामत जाहीर सभेसाठी निघून गेले..