Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

प्रचारातही मनसे भाईचारा..
शालिनी ठाकरे (मनसे) -

सकाळी साडेनऊची वेळ. गोरेगाव पश्चिमेला महात्मा गांधी रोडवऱील असलेल्या मिठानगर

 

महापालिका वसाहतीपासून सुरू होणाऱ्या पदयात्रेत शालिनी ठाकरे सहभागी होणार होत्या. त्यामुळे सर्वच मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. प्रचारयात्रेची वेळ जवळ येऊ लागली तसतशी कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. तरुणवर्गही मोटारसायकलवर मनसेचा झेंडा लावून सज्ज झाला होता. सव्वादहाच्या सुमारास शालिनी ठाकरेंचे मिठानगरमध्ये आगमन झाले आणि त्यानंतर ‘शालिनी ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’, ‘राज साहेबांचा- नवनिर्माण सेनेचा विजय असो’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या दमदार स्वागतानंतर जराही उसंत न घेता ठाकरे यांनी पदयात्रेला सुरूवात केली. घरोघरी जाऊन आपल्याला विजयी करण्याची विनंती त्यांनी केली तसेच वृद्धांचे आशीर्वादही घेतले. काही ठिकाणी औक्षण तर काही ठिकाणी त्यांची ओटी भरण्यात आली. पदयात्रेनंतर शालिनी ठाकरे ‘रोड शो’साठी सज्ज झाल्या. प्रचाररथावर स्वार होऊन दत्तमंदिराजवळ पोहोचल्यावर त्यांनी देवदर्शन घेतले. त्यानंतरच ठाकरे यांच्या ‘रोड शो’ला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. प्रचाररथातून ठाकरे हात उंचावून रहिवाशांना अभिवादन करीत होत्या. दत्तमंदिर परिसरानंतर ठाकरे यांचा प्रचाररथ ‘गॅलक्सी’ सोसायटी या उच्चभं्रूच्या वस्तीत दाखल झाला. आतापर्यंत मराठीत मतदानाचे आव्हान करणाऱ्या मनसे कार्यकत्यांनी या सोसायटीत मात्र हिंदूीमध्ये आवाहन केले. भाषिक बदलासोबत त्यांच्या आवाहनाच्या नाऱ्यातही बदल झाला. ‘एमएनएसने शालिनी ठाकरे के रुप में आपको एक उच्चशिक्षित-एमबीए उमेदवार दिया हैं.. आप भी इनको चुनके एक पढा लिखा उमेदवार पार्लमेंट में भेजो’ असे आवाहनाचे स्वरुप होते. गॅलक्सी सोसायटीमध्ये केवळ घरांच्या खिडक्यांतून आणि बाल्कनीतून ठाकरे यांचा ‘रोड शो’ पाहिला जात होता. त्यानंतर ठाकरे यांचा प्रचाररथ बांगूरनगर परिसरात दाखल झाला. या परिसरात मोठय़ा प्रमाणावर दक्षिण भारतीय राहत असल्याने मनसे कार्यकर्त्यांनी तेथे दाखल होताच मतदारांना समजेल अशा दाक्षिणात्य भाषेतून प्रचाराचा नारा देण्यास सुरूवात केली आणि ठाकरे यांना मत देण्याचे आवाहन केले. या परिसरातून शालिनी ठाकरे यांचा प्रचाररथ पुढे सरकत असतानाच शर्मिला ठाकरे यांचे आगमन झाले आणि त्या प्रचारयात्रेत सहभागी झाल्या. आतापर्यंत बरेच अंतर चालल्यामुळे व उन्हामुळे काहीशा मरगळलेल्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये शर्मिला ठाकरे यांच्या आगमनाने नवा जोश निर्माण केला. पुन्हा एकदा राज ठाकरे आणि शालिनी ठाकरे यांच्या नावाचा जयघोष परिसरात घुमू लागला. फटाक्यांची आतषबाजी केली गेली. बांगूरनगर परिसरातून शालिनी ठाकरे यांचा प्रचाररथ गोरेगाव स्थानकाच्या दिशेने मार्गक्रमण करून लागला. याही वेळी शालिनी यांच्यासोबत शर्मिला यांचेही औक्षण करण्यात आले. अखेर हा प्रचाररथ दुपारी एकच्या सुमारास गोरेगाव स्थानकाजवळ येऊन थांबला आणि प्रचारफेरी संपल्याची घोषणा करण्यात आली.