Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आवाज कुणाचा..
गजानन कीर्तिकर (शिवसेना) -

‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो,’ अशा घोषणेत अंधेरी पश्चिम येथील

 

मनीषनगरजवळच्या डॉ. केरकर इस्पितळाकडून शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांची प्रचारफेरी निघाली तेव्हा अवघे वातारण भगवे झाले होते. सकाळी साडेनऊपासूनच या प्रचारफेरीसाठी स्थानिक शाखाप्रमुख संजय पवार राबत होते. हळूहळू शिवसैनिक भगव्या टोप्या, उपरणे घेऊन सामील होत होते. काही महिलांनी तर भगव्या
साडय़ा नेसल्या होत्या. विशेष म्हणजे स्थानिक व्यापारी, नागरिकही मोठय़ा संख्येने जमा झाले होते. दहाच्या सुमारास कीर्तिकर आले आणि प्रचारफेरीला सुरुवात झाली. मनीषनगर रेसीडेन्टस् फेडरेशनतर्फे सुरुवातीलाच कीर्तिकरांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. मला निवडून देऊन तर बघा. मी तुम्हाला निराश करणार नाही, असे त्यांनी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले आणि प्रचारफेरी पुढे सरकली.
मनीषनगरमधील प्रचारयात्रा पुढे सरकत होती. प्रत्येक इमारतीच्या प्रवेशद्वारावर लोकांची झुंबड होती. कीर्तिकर शक्यतो प्रत्येकाला हात दाखवून अभिवादन करीत होते, मध्येच पुष्पगुच्छ, हाराचा स्वीकार करीत होते. ‘ताई-माई-अक्का, धनुष्यबाणावर मारा शिक्का’ अशी जुनीपुरानी झालेली घोषणा मध्येच दुमदुमली. प्रचारयात्रा राधाकृष्ण मंदिराजवळ पोहोचली आणि भर उन्हात वाट पाहत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी कीर्तिकरांचे जोरदार स्वागत केले. याबाजुलाच फेडरेशनचे कार्यालय आहे. शिवसेनेचे उपशाखाप्रमुख व फेडरेशनचे सहसचिव असलेल्या सुधीर शिंदे यांनी कीर्तिकरांना पुष्पगुच्छ दिला. मनीषनगर, ताज क्वाटर्स या परिसरातून प्रचारयात्रा इंदिरानगर येथे आली. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमुळे सध्या इंदिरानगर परिसरात रहिवाशांची फारशी वर्दळ नाही. मात्र तेथील व्यापाऱ्यांनी कीर्तिकरांचे हार घालून स्वागत केले. शिवसेना शाखा क्र. ६० च्या इंदिरा नगर शाखेजवळ प्रचारयात्रा येताच शाखाप्रमुख संजय पवार यांनी मोठा हार घालून कीर्तिकरांना शाखेत नेले. तेथून एलआयजी, मधुबन कॉलनीतही वाट पाहत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करताना, ‘शिवसेना-भाजप युतीचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. डी. एन. नगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला नारायण राणे यांच्या बंडानंतर काँग्रेसकडे गेल्याचा दावा केला जात होता. तरीही कीर्तिकरांच्या प्रचारयात्रेला डी. एन. नगर, गणेशचौकात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसत होते. त्याआधी न्यू डी. एन. नगर या परिसरातही प्रचारयात्रेचे तेथील नागरिकांनी स्वागत केले. कीर्तिकरांचा वचनानामा ध्वनिमुद्रित संचावरून सुरूच होता. काही महिला ध्वनिक्षेपकावरून कीर्तिकरांना मत देण्याचे आवाहन करीत होत्या. साधारणत: हजार ते दीड हजार शिवसैनिक या फेरीत सामील झाले होते. डी. एन. नगरात १ ते ५ क्रमांकाच्या इमारतीजवळ तसेच १५ व १६ क्रमांकाच्या इमारतीजवळ कीर्तिकरांना महिलांनी औक्षण केले. तेथून एमआयजी कॉलनी, सितलादेवी, अपनाबाजार परिसरात प्रचारयात्रा आली, तेव्हा दुपारचे साडेबारा वाजले होते. भर उन्हातही शिवसैनिकांचा जोर कमी झाल्याचे दिसत नव्हते. फक्त गळ्यातील भगवे मफलर्स डोक्यावर आले होते. जयप्रकाश रोड अशी दरमजल करीत सुरू असलेली प्रचारयात्रेचा राजकुमारजवळ समारोप झाला. विकासक विजय मल्ल्या,माजी नगरसेवक सुनील गणाचार्य यांनी कीर्तिकरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सर्वांचा निरोप घेऊन ते दिंडोशी परिसरात होणाऱ्या पुढील प्रचारयात्रेसाठी निघून गेले..