Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कमळ, हात की शिट्टी.. त्यात आचारसंहितेला बुट्टी!
सोपान बोंगाणे

लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने पालघर

 

मतदारसंघातील प्रचारही आता शिगेला पोहोचला आहे. फेररचनेनंतर भिवंडी, वाडा, शहापूर आणि इगतपुरी हे चार विधानसभा क्षेत्र वगळून त्यात समाविष्ट झालेल्या बोईसर, नालासोपारा, पालघर आणि वसई या नव्या विधानसभा क्षेत्रातील सुमारे सात लाख मतदार यावेळी काय भूमिका बजावतात त्यावरच विजयाचे गणित अवलंबून असल्याचे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात चित्र आहे. त्यामुळे साहजिकच सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या परिसरावरच आपले लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. गेल्या १५ वर्षांत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या भागात निर्माण केलेल्या राजकीय दबदब्यापुढे सर्वच राजकीय पक्ष नि:ष्प्रभ झाल्याचे चित्र या प्रचारातून पुढे आले आहे. या परिसरातून गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व ठाकूर यांच्या वसई विकास मंडळाने गोविंदा यांना तब्बल ४५ हजाराचे मताधिक्य मिळवून दिल्याने येथे वसई विकास आघाडीचा मोठा प्रभाव आहे हे सिद्धच झाले आहे. एवढेच काय वसई, नालासोपारा, नवघर-माणिकपूर व विरार या चार नगरपालिकांतील एकूण १५३ नगरसेवकांपैकी तब्बल १३० नगरसेवकांची फौज त्यांनी निवडून आणली आहे. हे सर्व नगरसेवक व नगरपालिकांच्या माध्यमातून ठाकूर यांनी उभी केलेली ठेकेदार, बिल्डर व इतर व्यावसायिकांची मोठी ताकद बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांच्यामागे उभी आहे. त्यामुळे या भागातील किमान सव्वा दोन लाख मते त्यांना मिळतील, असा त्यांचा दावा आहे. प्रचाराच्या प्रारंभापासूनच ठाकूरांनी काँग्रेस व इतर पक्षांपुढे उभे केलेले आव्हान अखेपर्यंत टिकून असल्याचे चित्र आहे. संपूर्ण टप्प्यात दिवसामागे जाधवांसाठी किमान १०० ते १२५ ठिकाणी प्रचारफे ऱ्या, चौकसभा, मिरवणुका काढून प्रचाराची धमाल सुरू आहे. सर्वत्र पिवळे झेंडे लावलेली वाहने, पिवळ्या टोप्या घालून शिट्टय़ांचा गजर करीत फिरणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांच्या गर्दीशिवाय या भागात काहीच दिवस नाही. ठाकूर व जाधव यांच्या बॅनर्स, होर्डिंग्स पुढे आचारसंहिता फिकी पडल्याचे चित्र आहे. अशाही परिस्थितीत भाजपचे अ‍ॅड. चिंतामण वनगा, काँग्रेसचे दामू शिंगडा, माकपचे लहानू कोम व बसपाचे भास्कर दळवी आपापल्या पद्धतीने प्रचार करीत आहेत. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात झालेल्या सोनिया गांधी, नरेंद्र मोदी, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विनोद तावडे यांच्या सभांचे फड रंगत आहेत. मोदी यांच्या नालासोपारा येथील सभेने युतीच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.
बहुजन विकास आघाडीचा वसई ते पालघर पट्टय़ात जोर, तर अ‍ॅड. वनगा यांना जव्हार, विक्रमगड, डहाणू भागातून मताधिक्य मिळेल, असे चित्र आहे. गेली २५ वर्षे आदिवासींच्या सुख-दु:खाशी समरस झालेली श्रमजिवी संघटना आणि ‘कॅडर बेस’ असलेली शिवसेना वनगा यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करीत असल्याचे दिसून येते. विवेक पंडित यांनी वसई भागातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यात त्यांना तब्बल ९४ हजार मते मिळाली. पंडित यांनीही हा परिसर पिंजून काढला असून, ते ठाकूरांना ‘टफ’ देऊ शकतील, असे शिवसेना नेत्यांना वाटते आहे. वनगा, पंडित, मनीषा निमकर, उदय बंधू पाटील आणि काही कुणबी समाजातील प्रमुख कार्यकर्ते दिवसरात्र वनगा यांच्या प्रचारासाठी पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. बहुजन विकास आघाडीने आयत्या वेळी निवडणूक रिंगणात शड्डू ठोकल्याने प्रारंभीच्या टप्प्यात हबकून गेलेल्या काँग्रेस पक्षाच्या प्रचारात सोनिया गांधींनी घेतलेल्या सभेमुळे ‘जान’ आली आहे. आतापर्यंत राजाच्या इतर मतदारसंघात अडकलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांनी या मतदारसंघावर आता लक्ष केंद्रित केल्याने कार्यकर्त्यांतील मरगळ दूर झाल्याचे दिसून आले. वसई, विरार पट्टय़ातील कॅथलिक, मुस्लिम, दलित व इतर मिळून सुमारे एक लाख पारंपरिक मते असल्याने काँग्रेसने या मतदारांसाठी वेगवेगळ्या मार्गाने ‘फिल्डिंग’ लावल्याचे दिसते. चर्चेस व मशिदींच्या माध्यमातून मतदारांना ‘फतवे’ काढले जात आहेत. वि.आ. तर्फे विकासाचे स्थानिक मुद्दे मांडले जात असून, ही निवडणूक राष्ट्रीय प्रश्नांशी संबंधित असल्याने मतदारांनी काँग्रेस मागे उभे राहावे, असे आवाहन करीत वसईतील काँग्रेसचे नेते घरोघरी प्रचार राबवित आहेत. वनगा यांनीही प्रचारात जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न घेऊन त्यांची केंद्र सरकारशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी नगरपालिका व जिल्हा परिषदा काम करीत असताना तेच प्रश्न घेऊन या निवडणुकीत उतरलेल्या बाविआच्या उमेदवाराला पराभूत करा, असा प्रचार वनगा व शिंगडा यांचे कार्यकर्ते करीत आहेत. प्रचार अंतिम टप्प्यात आला असला, तरी शहरी व ग्रामीण भागातील मतदारांत मात्र निरुत्साहाचेच वातावरण आहे. अशा मतदारांना रणरणत्या उन्हात मतदान केंद्रापर्यंत पोचविण्याचे अवघड काम कसे पार पाडावे याची चिंता उमेदवारांना वाटते.
ठाणे जिल्ह्यात तलासरी, जव्हार परिसरात अतिसंवेदनशील असलेली १४ मतदान केंद्रे आहेत. कम्युनिस्ट व भाजपच्या कार्यकर्त्यांत हाणामारीचे प्रसंग यापूर्वी अनेकवेळा घडले आहेत. त्यात यावेळी कम्युनिस्टांतच फूट पडल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. त्यास तोंड देण्याची जय्यत तयारी पोलीस यंत्रणेने केली आहे.