Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

रुंदावणारी क्षितिजे..
केंब्रिजमधील अनेक प्राध्यापक डार्विनकडे सपशेल दुर्लक्ष करीत, पण तेथील दोन प्राध्यापक मात्र डार्विनच्या विज्ञानातील रुचीमुळे प्रभावित होऊन त्याचे मित्र बनले.. एक होते वनस्पतिशास्त्रज्ञ प्रा. जॉन हेन्स्लो.. त्यांनी डार्विनची निसर्ग निरीक्षणातील गती अचूक हेरली व त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत केली.. प्रा. हेन्स्लो चार्ल्सला स्वत:सोबत वनस्पतींचे नमुने गोळा करण्यास घेऊन जात.. डार्विनकडून त्यांनी प्रसिद्ध जर्मन निसर्गशास्त्रज्ञ अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्टची पुस्तके वाचून घेतली.. दुसरे होते भूगर्भशास्त्रज्ञ प्रा. अ‍ॅडॅम सेजविक.. त्यांच्याबरोबर चार्ल्स वेल्स परगण्याच्या पदभ्रमण मोहिमेवर रवाना झाला.. प्रस्तर जडणघडणीचा अभ्यास करण्यासाठी अन् जीवाश्मांचा शोध घेण्यासाठी..
१८३१ साली ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस डार्विन जेव्हा केंब्रिजहून अभ्यासक्रम पूर्ण करून श्रुसबरी येथे आपल्या घरी परतला.. अन् पाहतो तो काय त्याच्या नावावर एक पत्र येऊन पडले होते.. याच पत्राने डार्विनचे जीवन पालटून टाकले.. प्रत्यक्षात एक नाही तर दोन पत्रं आली होती.. एक होते प्रा. जॉन हेन्स्लोंचे तर दुसरे पत्र होते केंब्रिज येथील शास्त्रज्ञ जॉर्ज पिकॉक यांचे.. दोन्ही पत्रांत एक आश्चर्यकारक आमंत्रण होते.. जग प्रवासाचे.. ब्रिटिश सरकार दक्षिण अमेरिकेचा किनारा आणि पॅसिफिक महासागरातील काही बेटांचे जीवशास्त्रीय सर्वेक्षण करणार असल्याचा मजकूर जॉन पिकॉक यांच्या पत्रात होता.. सर्वेक्षण जहाज जिथे-जिथे जाईल तिथल्या विशेष महत्त्वाच्या बाबींचे निरीक्षण, नोंदी करून त्यांचे नमुने गोळा करण्यासाठी ब्रिटिश सरकारद्वारे जॉर्ज पिकॉक यांना या सफरीसाठी योग्य निसर्ग शास्त्रज्ञांचे नाव सुचविण्याची विनंती केली.. जॉर्ज पिकॉक यांनी अशा निसर्गशास्त्रज्ञाचे नाव सुचवावे, अशी विनंती प्रा. जॉन हेन्स्लोंना केली.. क्षणाचाही विलंब न लावता प्रा. हेन्स्लोंच्या डोळ्यांपुढे नाव आले चार्ल्स डार्विनचे..
सर्वेक्षण जहाज बीगल काही दिवसांतच सफरीवर निघणार होते.. असे काही स्वप्नांतही घडेल यावर चार्ल्सचा विश्वासच बसत नव्हता.. डार्विनच्या उरात धडकी भरली.. खरंच डार्विन या सफरीवर जाऊ शकणार होता?..
आपल्या नशिबावर खूश असलेला डार्विन प्रा. हेन्स्लोंना होकार देणार.. दरम्यान, आताच कुठे कसेबसे शिक्षण पूर्ण केलेल्या आपल्या चिरंजीवांसाठी योग्य तो व्यवसाय शोधण्यासाठी डार्विनचे वडील धडपडत होते. बीगलच्या या सफरीमुळे त्यांच्या योजनेला खीळ बसणार होती.. अन् चार्ल्सचा काय नेम?.. तो या सफरीवर तरी नीट काम करेल याची हमी कोण देणार?.. डॉ. डार्विन कडाडले की.. बेटा या सफरीवर जाण्याचा सल्ला देणारा एकतरी सुजाण माणूस माझ्या पुढय़ात आण.. चार्ल्सला वडिलांचा प्रचंड धाक होता.. बरं, बंड करून उठावं तर चार्ल्सकडे तेवढी हिंमतही नव्हती.. तसा बंडाचा विचारही त्याच्या मनात कधीच आला नव्हता.. निमूटपणे पण अत्यंत दु:खाने चार्ल्सने प्रा. हेन्स्लोंना आपला नकार कळविला.. अन् चार्ल्स रवाना झाला आपला मामा जोशिया वेजवुडकडे.. तितर पक्ष्यांच्या शिकारीसाठी..
मामाकडे पोहोचताच जोशिया मामाला चार्ल्सने सारी इत्थंभूत कहाणी सांगितली.. अन् आश्चर्य म्हणजे जोशिया मामाची प्रतिक्रिया त्याच्या वडिलांपेक्षा सर्वस्वी वेगळी होती.. मामा म्हणाला, अरे वेडा की काय तू.. ही सफर आहे एक सुवर्णसंधी अगदी डोळे मिटून बेधडक घेण्यासारखी.. तितरांच्या शिकारीऐवजी जोशिया मामाने तडक चार्ल्सला एका गाडीत घातले अन् भरधाव वेगात घेऊन आला सरळ चार्ल्सच्या वडिलांकडे..
चार्ल्सबरोबर आलेला आपला मेव्हणा पाहताच जोशियाच्या तर्कसंगत सुजाण युक्तिवादापुढे चार्ल्सच्या वडिलांचा विरोध मावळला.. अन् त्यांनी चार्ल्सला परवानगी दिली.. जगप्रवासासाठी सफरीवर जाण्याची..
अन् खऱ्या अर्थाने डार्विनच्या आयुष्याची क्षितिजं रुंदावण्यास सुरुवात झाली..
‘बीगलची सफर ही माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे. या सफरीमुळे माझ्या जीवनाची दिशा ठरविली.’
- चार्ल्स डार्विन