Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मराठी वाहिन्यांचा महाराष्ट्र दिन
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ४९ वा वर्धापनदिन सोहळा जवळ आला आहे. राज्य शासनाबरोबरच विविध संस्था, संघटना महाराष्ट्र दिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. त्याचप्रमाणे मराठी वाहिन्याही महाराष्ट्र दिनाचा सोहळा नवनवीन कार्यक्रम सादर करून साजरा करणार आहेत. ई टीव्ही मराठीचा ‘गौरव महाराष्ट्राचा’ हा नव्या दमाच्या गायकांचा रिअ‍ॅलिटी शो याच दिवसापासून सुरू होणार आहे. तर ‘मी मराठी’ वाहिनीच्या दर शुक्रवारी रात्री ९.३० वाजता दाखविण्यात येणाऱ्या ‘पिकनिक रंगे ताऱ्यांसंगे’ या कार्यक्रमात महाराष्ट्र दिनानिमित्त खास भाग सादर होणार असून नेहमीचे मालिका, नाटक अथवा सिनेमातले

 

तारेतारका वगळून अलौकिक व्यक्तीसह पिकनिकला घेऊन जायचा बेत या वाहिनीने आखला आहे. आपल्या रसाळ वाणीने शिवचरित्र सांगणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबरोबर ‘पिकनिक’ काढण्यात येणार आहे. शिवनेरी किल्ल्यावर ही पिकनिक काढण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्यावरील प्रत्येक वास्तूची माहिती, इतिहास बाबासाहेब पुरंदरे प्रेक्षकांना सांगणार आहेत. अभिनेत्री मेघना एरंडे ही या कार्यक्रमाची सूत्रधार असून तीसुद्धा अनेक प्रश्न शिवशाहीरांना विचारणार आहे. महाराष्ट्रदिनी शिवशाहीरांकडून शिवचरित्र ऐकण्याचा दुग्धशर्करा योग प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
मालवणी डेज
महाराष्ट्राची राजभाषा मराठी असली तरी खान्देशी, मालवणी, वऱ्हाडी, मराठवाडी, अहिराणी अशा अनेक बोलीभाषा आहेत. प्रत्येक बोलीभाषेची अंगभूत गोडी, वैशिष्टय़े आहेत. ही बोलीभाषेची गोडी विविध व्यक्तिरेखांमधून बोलतात तेव्हा काय मजा येते त्याचे प्रत्यंतर झी मराठीच्या नवीन कार्यक्रमातून मिळणार आहे. कोकणातही अनेक ठिकाणी वेगवेगळी बोली बोलली जाते. दिवंगत अभिनेते यांनी मालवणी बोली मराठी रंगभूमीवर आणली आणि अजरामर केली. याच मालवणमध्ये राजेश देशपांडे दिग्दर्शित ‘मालवणी डेज’ ही नवीन मालिका महाराष्ट्रदिनी सुरू होत आहे. आर के नारायण यांच्या लेखणीतून साकारलेली ‘मालगुडी डेज’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या नावावरूनच प्रेरणा घेऊन आपण ‘मालवणी डेज’ हे नाव मालिकेला दिले, अशी माहिती राजेश देशपांडे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. पण नाव जरी मालवणी डेज असले तरी प्रत्येक एपिसोडमधली गोष्ट मालवणीतच असेल असे नाही असेही ते म्हणाले. आपण स्वत: मूळचे राजापूरचे असल्यामुळे अनेक वर्षांपासून आपल्या मातीतल्या गोष्टी मालिकेद्वारे लोकांपर्यंत पोहोचवाव्यात असे मनात होते. त्यातूनच ही मालिका साकारली आहे, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक गावात जशी चावडी असते तशाच प्रकारे गजालवाडी या काल्पनिक गावात मामा जठार यांचे ‘माज महाल’ नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलात गावातील इरसाल, नमुनेदार मंडळी बसून गप्पा करतात. त्यांच्या गप्पांत फक्त मालवणी नव्हे तर अनेक ठिकाणांहून येथे वास्तव्यास आलेले लोक असतात. त्यांच्या गप्पांतून आपापल्या गावाकडच्या गोष्टी उलगडतात आणि मालिका साकारते. मालवणी माणसांचे किस्से, त्यांचा मिश्किलपणाही या मालिकेत पाहायला मिळेल असे सांगून शरद पोंक्षे, निर्मिती सावंत, पंढरीनाथ कांबळे, माधवी जुवेकर, सतीश सलागरे, सुनील तावडे असे एकाहून एक सरस कलावंत यात आहेत, असेही त्यांनी सांगितले. एक मेपासून दर शुक्रवारी रात्री ९.३० वाजता ही मालिका प्रसारित होणार असून प्रत्येक एपिसोडमधून एक नवीन गोष्ट सादर केली जाईल, असेही राजेश देशपांडे म्हणाले. फक्त मालवणी नव्हे तर वेगवेगळ्या गोष्टी यात सादर केल्या जाणार असून गजालवाडी हे गाव मालवणमधील एक काल्पनिक गाव दाखवित असल्यामुळेच ‘मालवणी डेज’ हे नाव मालिकेला दिले, असेही त्यांनी सांगितले.
‘ज्योती’ मालिकेत सरवर आहुजाची एण्ट्री
झी सिनेस्टार या टॅलेण्ट हण्ट रिअ‍ॅलिटी शोमधून काही वर्षांपूर्वी विजेता ठरलेला सरवर आहुजा हा एनडीटीव्ही इमॅजिनवरील ‘ज्योती’ मालिकेत दिसणार आहे. पंकज ही व्यक्तिरेखा तो साकारणार आहे. हिंदी सिनेमातील उगवता तारा म्हणून सरवर आहुजा धडपडत असतानाच छोटय़ा पडद्यावर दिसण्याचा धोका तो पत्करणार आहे हे त्याचे वैशिष्टय़ आहे. पंकज ही व्यक्तिरेखा आव्हानात्मक वाटली म्हणून ‘मेरी पडोसन’सारखा माझा सिनेमा लवकरच पडद्यावर येत असला तरीसुद्धा आपण छोटय़ा पडद्यावर दिसण्याचे धाडस करीत आहोत, असे सरवर आहुजाने सांगितले.