Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

भ्रूणहत्येवर सगुण-निर्गुण चर्चा..
आपल्या लेखणीतून समाजातील दंभ आणि सामाजिक व्यवहारांमधील अर्थहीनता वेशीवर टांगणाऱ्या नाटककार विजय तेंडुलकर ऊर्फ ‘तें’ यांचे ‘शांतता, कोर्ट चालू आहे’ हे नाटक रंगायन या संस्थेने १९६८ साली रंगभूमीवर आणले. अरविंद देशपांडे दिग्दर्शित या नाटकात कु. लीला बेणारे यांची मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुलभा देशपांडे, सतीश दुभाषी, नारायण पै, श्रीकांत लागू यांच्या भूमिका कमालीच्या गाजल्या होत्या. या नाटकांची भाषांतरेही अनेक झाली आणि देश-विदेशामध्येही या नाटकाने विजय तेंडुलकर यांना समर्थ लेखणी असणारा नाटककार म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली. अर्थात हा प्रवास त्यांच्या सर्वाधिक गाजलेल्या आणि

 

वादग्रस्त घाशीराम कोतवाल या नाटकाच्या आधीचा आहे. घाशीराम कोतवाल या नाटकाला ऐतिहासिक पाश्र्वभूमी असली तरी विजय तेंडुलकर यांची इतर गिधाडे, कमला, सखाराम बाईंडर आणि श्रीमंत ही नाटके १९ व्या शतकापासून २० व्या शतकापर्यंत चालत आलेल्या सामाजिक व्यवहारांवरील भाष्येच होती. सामाजिक व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या साहित्यिकांची एक खोड असते. ते भयानक परिस्थिती त्यांच्या हाताशी असलेल्या कथानकावरून विशद करतात, पण त्या समस्येचे उत्तर काय किंवा त्याचे निराकरण कसे करावे यावर मौन बाळगतात. प्रेक्षकांनी आपापल्या वैचारिक कुवतीप्रमाणे त्यावर निर्णय घ्यावा आणि आपल्या जीवनात तसे बदल घडवून आणावे अशी त्यांची एक धारणा असते. अर्थात हे वैचारिकदृष्टय़ा मनाला कितीही पटत असले तरी वास्तवात असेच घडत नाही. म्हणून तर भारतीय समाजाला एक सुस्त पडलेला अजगर म्हणून गेली वर्षांनुवर्षे हिणवले जाते. तशी टीका कम्युनिस्ट, समाजवाद्यांनी जशी केली आहे तशीच ती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्याही मुखात आढळतेच.
तेंडुलकर यांच्या शांतता, कोर्ट चालू आहे.. या नाटकाची व्हीसीडी एव्हरेस्ट कंपनीने तयार केली असून त्यात कु. लीला बेणारेची भूमिका रेणुका शहाणे यांनी साकारली आहे. अर्थात ज्यांनी मूळ नाटक बघितलेले आहे आणि सुलभा देशपांडे यांची मुख्य भूमिकेतील सर्व भावनाविवशता पाहिली आहे त्यांना या व्हीसीडीतील रेणुका शहाणे यांची भूमिका बघून ‘बात, कुछ जमीं नही’..असेच म्हणावे लागेल. चंद्रकांत कुलकर्णी या नव्या जमान्यातल्या प्रतिभावंत दिग्दर्शकाने हे नाटक दिग्दर्शित केले आहे, तरीही असे म्हणावेच लागते. नाटकातील वकील सुखात्मे यांची भूमिका व्हीसीडीमध्ये संदीप कुलकर्णी यांनी साकारली आहे, तर न्यायाधीश काशीकर झाले आहेत ते निवास भिसे. अनाहूत साक्षीदार रघू सामंत यांची भूमिका विघ्नेश जोशी यांनी साकारली आहे. अभिरुप न्यायालयाचे गावागावात प्रयोग करणारे काही समाज कार्याची हौस असणारे नाटय़वेडे आयत्यावेळी एका स्त्रीवर खोटा-खोटा खटला चालवतात, ही नाटकाची मुख्य संकल्पना आहे. ती महिला म्हणजे जी एका शाळेत शिक्षिका आहे त्या कु. लीला बेणारे हिच्यावर तिने भ्रूणहत्या म्हणजे आपल्या गर्भाचा जीव घेतल्याचा तिच्यावर आरोप ठेवला जातो. या नाटक मंडळींमधले एक पात्र प्रो. दामले हे आहे आणि ते त्यावेळी अनुपस्थित आहे. दामले आणि कु. लीला बेणारे यांच्यातील कथित संबंधांवरून खोटय़ाच साक्षी नोंदवल्या जातात आणि समाजात उशीराही लग्न न झालेल्या व कुमारी राहिलेल्या तरुणींचा प्रश्न चर्चेला येतो. बेणारे यांनी असे करणे हे सामाजिक आरोग्याला घातक ठरणार की नाही, असा प्रश्न शेवटपर्यंत चर्चिला जातो. वास्तविक हे अभिरुप न्यायालय जरी खोटे असले व साक्षी-पुरावे तद्दन भिकार असले तरी खटल्याच्या दरम्यान कु. बेणारे यांचे मानसिकदृष्टय़ा उद्ध्वस्त होणे, तिने आक्रोश करणे यांमधून लेखक तेंडुलकर बरेच काही ‘सत्य’ सांगून जातात. नायिका बेणारे हिचे वयाच्या १४ व्या वर्षी तिच्या सख्ख्या मामाबरोबर चाललेले प्रेमप्रकरण हा देखील लेखकाचाच कल्पनाविलास आहे आणि खटल्याच्या शेवटी आपले भाष्य साकारताना ती या संबंधांविषयीही मनमोकळेपणे बोलते. शेवटी खरे काय आणि खोटे काय यावर काहीही भाष्य न करता तेंडुलकरांनी सर्वसामान्य प्रेक्षकाला सुन्न करून सोडण्याचे काम केले आहे आणि जो काही निर्णय घ्यायचा तो प्रेक्षकानेच घ्यावा असा त्यांच्या लेखनाचा एकूणच खाक्या आहे. एव्हरेस्ट कंपनीने सादर केलेली ही व्हीसीडी तशी चांगलीच झाली आहे आणि ती प्रत्येकाने या नाटकाची गुणवत्ता पाहून आपल्या संग्रही बाळगावी, अशीच आहे.
धुक्यात हरवली वाट
प्रतिभावंत लेखक शं. ना. नवरे यांच्या लेखणीतून साकार झालेले हे नाटक द्विभार्या या नाजूक सामाजिक समस्येवर त्यांच्या अंदाजाने पूर्ण होणारे असून या नाटकाची व्हीसीडी शेमारू कंपनीने सादर केली आहे. नाटकात साहेब ही ५०-५५ या वयाच्या घरात असलेली मुख्य व्यक्तिरेखा असून त्याला नाईलाजाने दोन बायकांशी विवाह करणे क्रमप्राप्त ठरते. गायत्री ही मुलगी घर सोडून मुंबईला निघते व प्रवासात तिची या साहेबांशी गाठ पडते. साहेब तिला आसरा देतात आणि मित्राकरवी एक नोकरीही मिळवून देतात. त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेली गायत्री त्यांच्यावरच तिच्या नकळत प्रेम करू लागते व ती त्यांना लग्नाचा प्रस्ताव देते. त्या आधी पहिल्या पत्नीपासून आपल्याला तीन मुले आहेत व पहिल्या पत्नीला आपण प्राण गेले तरी सोडू शकत नाही, याची कल्पना साहेब तिला देतातच, पण आपल्या पहिल्या पत्नीला ते या संबंधांबाबत काही सांगत नाहीत. एका निनावी दूरध्वनीमुळे ही बाब पहिल्या पत्नीला कळते आणि ती या समस्येची कशी उकल करते हे शन्नांनी आपल्या लेखणीतून समाजाला समजावले आहे. अविनाश खर्शीकर यांनी या नाटकाची व्हीसीडीची निर्मिती केली असून यातील सुबोध भावे, शूजा प्रभुदेसाई, विनोद कुलकर्णी, मंदा देसाई आणि रवी पटवर्धन या कलाकारांनी सर्व भूमिका समजून-उमजून केल्या आहेत. बुजूर्ग अभिनेते जयंत सावरकर यांचे दिग्दर्शन आहे व नाटकातील खारूताईची एक किस्सेवजा गोष्ट खरेच मनाला चटका लावून जाणारी आहे. ही व्हीसीडीही जरूर पाहण्याजोगी.
टिचभर पोटासाठी
झपाटा कंपनीचे प्रमुख वसंत खेर हे नव्या नव्या संकल्पना समाजासमोर आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात आणि गाजलेल्या गाण्यांचे विडंबन करून चालू घडामोडींवर भाष्य करण्याचे धाडस त्यांनी यात केले आहे. गाजलेल्या गाण्यांचे विडंबन करून सध्याचे दाहक सामाजिक वास्तव मांडण्याचा हा प्रयत्न खरोखरच स्तुत्य आहे. खेळताना रंग बाई होळीचा, तुटला गं बांबू माझ्या चाळीचा, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, टीचभर पोटासाठी काम आम्हा मिळू दे, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नावाचा बाजार अशी विडंबनपर गाण्यांमधून वसंत खेर आजच्या परिस्थितीचे भयानक वास्तव रेखाटतात. मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्या, स्वत:च्या सुखाला चटावलेले पुढारी-सेज आणून परदेशी कंपन्याशी शेज करणारे पुढारी असे त्यांचे वर्णन कवी परीश ठाकूर व वसंत खेर यांनी केले आहे. परप्रांतीयांची घुसखोरी, मराठी पारंपरिक मध्यमवर्गीय आदर्शभूत संस्कृतीला लागलेली मरगळ असे सर्व विषय केवळ विडंबनपर गाण्यांच्या माध्यमातून या दुकलीने हाताळलेले आहेत. पंकज गवळी यांचेही बहुमोल सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे. हे जळजळीत भाष्यही मराठी जनाने जरूर ऐकण्याजोगे आहे.
बाईंच एका, गाडीभर पैका
शेमारू कंपनीने आणलेली ही व्हीसीडी सध्याच्या ग्रामीण राजकारणावर भाष्य करणारे आहे. सुरेखा कुडची व अन्य कलाकारांच्या तमाशाची जोड असल्याने याच मनोरंजनाचा मामला ठासून भरला आहे.
सुरेखा कुडची या अभिनेत्रीने मकरंद अनासपुरेबरोबर त्याच्या ‘अरे देवा’ या चित्रपटामध्ये उत्तम भूमिका साकारली होती. ‘भरत, आला परत’ या विजय गोखले दिग्दर्शित चित्रपटातही ती दिसली होती. या नाटकातील तिचे कामही ठसक्यात झाले आहे. ही व्हीसीडीही जरूर पाहण्याजोगी झाली आहे.
satpat2007@rediffmail.com