Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९

काष्टीजवळ बस उलटून २० प्रवासी जखमी
श्रीगोंदे, २७ एप्रिल/वार्ताहर

दौंड-श्रीगोंदे बस काष्टीजवळ उलटून २० प्रवासी जखमी झाले. बसचालकास अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने रस्त्याच्या कडेला बस घेण्याच्या प्रयत्नात आज सकाळी ९ वाजता हा प्रकार घडला. श्रीगोंदे आगाराची बस (क्रमांक एमएच २० डी ५८५७) आज सकाळी सुमारे ३० प्रवाशांना घेऊन दौंडवरून श्रीगोंद्याकडे निघाली. बस काष्टीजवळील राजयोग मंगल कार्यालयानजीक आली असता, चालक कोंडिराम झिंजाडे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे गाडीचा वेग कमी करीत असतानाच त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. त्याही स्थितीत प्रसंगावधान दाखवित त्यांनी बस रस्त्याच्या एका बाजूला घेण्याचा प्रयत्न केला.

संवत्सर-कोकमठाण गावांमध्ये गोफण-धोंडय़ाची लढाई सुरू
कोपरगाव, २७ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील संवत्सर व कोकमठाण या दोन गावांदरम्यान आज अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर पहिल्या दिवशी लहान मुले, तरुणांनी गोफण-धोंडय़ाच्या लढाईत भाग घेतला. आज तापमापकातील पारा ४२.५ अंशांवर होता. दुपारनंतर गोदावरी नदीपात्रात योद्धे उतरले. आजच्या लढाईत कोणीही जखमी झाले नाही. गोदावरीपात्रात ‘म्हसोबाकी जय’ व ‘लक्ष्मीमाताकी जय’चा जयघोष करीत एकमेकांवर चढाई करत होते.

मुंगसा मुंगसा..
स्वामी विजयानंद या जाणत्या मित्रासमवेत आम्ही जंगलभटकंतीसाठी गर्भगिरीच्या डोंगररांगात गेलो होतो. विजयानंदांना डोंगररांगांची, तेथील कडेकपारीची, नैसर्गिक विविधतेची, पायवाटांची व जंगलातील प्राणी-वनस्पतींची खडा न खडा माहिती होती. गर्भगिरीत केवळ पावसाळ्यात दिसणाऱ्या औषधी वनस्पती पाहण्याच्या उद्देशाने आम्ही एकत्र आलो होतो. पायवाटेने चालत आम्ही एका उंच सुळक्यापाशी येऊन थांबलो. पाऊस पडून गेलेला असल्यामुळे सुळक्यावरून पाण्याचा प्रपात पडत होता. ते दृष्य मोठे नयनमनोहारी होते.

मतदारांच्या उदासीनतेला नगरसेवक जबाबदार
लोकसभेची निवडणूक झाली. ठप्प झालेली महापालिका आता सुरू व्हायला हवी. वास्तविक मनपाचा निवडणूक कामकाजात काही विशेष सहभाग नव्हता. महसूल यंत्रणेचा होता तेवढा तर नक्कीच नाही. आचारसंहिता अंमलबजावणी पथकाची जबाबदारी उपायुक्त अच्युत हांगे यांच्यावर होती. बरेच गुन्हे दाखल करून त्यांनी ती समर्थपणे पार पाडली. बाकी कोणी अधिकारी किंवा कर्मचारी फार मोठय़ा संख्येने निवडणूक यंत्रणेत गुंतले नव्हते. तरी पण काम मात्र ठप्प होते. ज्याच्या त्याच्या तोंडी कारण होते ते फक्त निवडणूक आचारसंहितेचे.

तालुकामास्तर पदाबाबतच्या आदेशास वाटाण्याच्या अक्षता
नगर, २७ एप्रिल/प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील तालुकामास्तर पदाची जबाबदारी केंद्रप्रमुखाकडे देण्याच्या ग्रामविकास खात्याच्या आदेशास येथील विभागाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. या पदाची जबाबदारी केंद्रीय मुख्याध्यापकाकडे ठेवण्याची महाराष्ट्रामध्ये कोठेही अस्तित्वात नसलेली परंपरा पुढे चालू ठेवताना जिल्हा परिषदेने ग्रामविकास खात्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याऐवजी त्याचा काथ्याकूट चालवला आहे.

कुकडीच्या आवर्तनासाठी रस्त्यावर उतरू - जगताप
श्रीगोंदे, २७ एप्रिल/वार्ताहर
कुकडीचे दुसरे आवर्तन न सोडल्यास श्रीगोंदे, पारनेर व कर्जत तालुक्यांतील उन्हाळी पिके वाया जातील. ती वाचविण्यासाठी पिंपळगाव जोगे धरणातील तांत्रिकदृष्टय़ा मृत असणारे सुमारे ४ टीएमसी पाणी तातडीने सोडावे; अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष कुंडलिकराव जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. श्री. जगताप म्हणाले की, कुकडीतून उन्हाळ्यासाठी दोन आवर्तने देण्याबाबत निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आला.

राजूर नळ पाणीपुरवठा योजनेतील अडचणी दूर
एक्स्प्रेस फिडर लाईन
राजूर, २७ एप्रिल/वार्ताहर
राजूर नळ पाणीपुरवठा योजनेतील अडचणी दूर झाल्या असून, भविष्यात वीज नाही म्हणून पाणी नाही ही सबब राहणार नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त राजूरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वीज देता आली, असे प्रतिपादन वैभव पिचड यांनी केले. राजूर नळ पाणीपुरवठा योजना विजेअभावी सतत बंद पडत असे, तर निळवंडय़ाच्या पाणीसाठय़ामुळे येथील व परिसरातील ७ गावांची वीज उपकेंद्रे पाण्यात बुडाली.

राहुरीचे तापमान ४१ अंशांवर
राहुरी, २७ एप्रिल/वार्ताहर
उष्म्याची दाहकता आणखी वाढली असून, सध्या गरम हवेमुळे जीव कासावीस होत आहे. आज येथे ४१ अंश तापमानाची नोंद कृषिविज्ञान केंद्रामध्ये झाली. गत आठवडय़ापासून उन्हाची तीव्रता वाढतेच आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे फॅन, कुलर, एअर कंडिशन्स, इनव्हर्टर आदींना मागणी वाढली आहे. बाभळेश्वर येथील कृषिविज्ञान केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दि. २१ला ४०.२ कमाल तापमानाची उच्चांकी नोंद झाली. किमान तापमानातही वाढ झाली. किमान २४.४ अंश तापमानाची नोंद झाली. वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांबरोबर प्राणी-पक्षीही त्रासले आहेत.

अंजनाबाई वराळ यांचे निधन
निघोज, २७ एप्रिल/वार्ताहर

येथील अंजनाबाई किसनराव वराळ यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्य़ाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे दहा मुले, पाच कन्या, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मच्छिंद्र वराळ, जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी रंगनाथ वराळ, मुलिकादेवी विद्यालयाचे प्राचार्य तान्हाजी वराळ यांच्या त्या मातुश्री होत. शिरूरचे माजी नगराध्यक्ष गुलाब धाडीवाल, बाजार समितीचे माजी सभापती कुंदन साखला, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. भास्कर शिरोळे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

कर्जतला बसवेश्वर जयंती साजरी
कर्जत, २७ एप्रिल/वार्ताहर

महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज येथे मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी येथील अशोकस्मृती निवासमध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी राजेंद्र फाळके, लिंगायत समाजाचे अध्यक्ष मच्छिंद्रअण्णा जेवरे, नीळकंठ स्वामी, जंगम, दत्तात्रेय विभुते, रमेश जेवरे, सूर्यकांत जेवरे, विलास जेवरे, धनवटे, उमेश जेवरे, प्रसाद जेवरे, अनिल जेवरे, प्रा. गजभारकर, स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.