Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
नवनीत

जी व न द र्श न
बाप्तिस्मा

पश्चात्ताप करा आणि पापांची क्षमा मिळावी म्हणून तुम्ही माझ्या नावे बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला दैवी आत्म्याचे दान मिळेल (नवा करार, प्रेषितांचे कार्य २:२,६) असा आदेश प्रभू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दिला. येशूचा अनुयायी होणाऱ्यांना बाप्तिस्माची दीक्षा घ्यावी लागते. बाप्तिझेईन या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे ‘पाण्यात बुडवून वर काढणे’. सुरुवातीच्या काळी नवदीक्षितांना वाहत्या नदीच्या पात्रात बुचकळून वर काढण्यात येत असे. पापी जीवनाला दिलेली ती जलसमाधी होती. बाप्तिस्मा घेण्यासाठी साधकाला साधना करावी लागते. ख्रिस्ती धर्माच्या शिकवणीचा अभ्यासक्रम पुरा करावा लागतो. त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांनाच ही दीक्षा दिली जाते. पंडिता रमाबाई, रेव्ह. नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक आदींनी बायबलचा सांगोपांग अभ्यास करून बाप्तिस्मा स्वीकारला. प्रख्यात आंग्ल लेखक माल्कम मगरीज यांनी वयाच्या ८० व्या वर्षी बाप्तिस्मा घेतला. कॅथलिक चर्चची लैंगिक नीतिविषयक (म्हणजे गर्भपात, विवाहपूर्व, विवाहबाह्य़ संबंध, घटस्फोट इ.) शिकवण अतिशय कठीण आहे. तरीही टोनी ब्लेअरने दोन वर्षांपूर्वी कॅथलिक पंथाची दीक्षा घेतली. प्रेमाच्या बाबतीत कुणावर सक्ती करता येणार नाही. तीच गोष्ट श्रद्धा जीवनाला लागू आहे. बळजबरी करून, आमिष दाखवून किंवा बळाचा वापर करून धर्मदीक्षा देणे हा धर्मद्रोह आहे. बाप्तिस्मा हे ख्रिस्ती धर्माचे प्रवेशद्वार आहे. या विधीमुळे साधक ख्रिस्ती समाजाचा एक अविभाज्य घटक बनतो. त्याच्यासाठी ख्रिस्ती अध्यात्माचे दार खुले होते. सुरुवातीच्या काळात प्रौढांचा बाप्तिस्मा होत असे. आता आई-वडिलांच्या शिफारसीवरून बालकांना बाप्तिस्मा दिला जातो. आई-वडील आणि धर्मआई-वडील (गॉडफादर, गॉडमदर) बाळाला घेऊन चर्चमध्ये येतात. यदाकदाचित बाळावर अनाथ होण्याची पाळी आली तर त्याची काळजी घेण्याची जबाबदारी धर्मआई- वडिलांनी स्वीकारायची असते. धर्मगुरू बाळाच्या कपाळाला आणि छातीला तेलाने अभ्यंग करतात. त्यानंतर बाळाच्या डोक्यावर पाणी ओतत म्हणतात,‘‘मी तुला पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देतो.’’ त्यानंतर बाळाचे नाव चर्चच्या रजिस्टरमध्ये नोंदवले जाते.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
francisd43@gmail.com

कु तू ह ल
दक्षिणायन व उत्तरायण
दक्षिणायन आणि उत्तरायण म्हणजे काय? त्यांचे ऋतूंच्या दृष्टीने महत्त्व काय आहे?

२२ डिसेंबर रोजी तुम्ही सूर्योदय पाहाल तर सूर्य जास्तीतजास्त दक्षिणेकडे उगवला आहे असे आपणास दिसेल. तीच गोष्ट सूर्यास्ताची. विषववृत्तावरील निरीक्षकाला सूर्य त्या दिवशी खऱ्या पूर्व दिशेच्या २३ १/२ अंश दक्षिणेला सूर्योदय दिसेल. यानंतर मात्र सूर्य उत्तरेकडे उगवू लागतो. म्हणजेच २२ डिसेंबर हा उत्तरायणाचा दिवस आहे. तीन महिन्यांनंतर विषुववृत्त ओलांडून सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो व २२ जून रोजी जास्तीतजास्त उत्तरेकडे जाण्याची मर्यादा गाठतो. त्या दिवशी विषुववृत्तावरील निरीक्षकाच्या दृष्टीने सूर्य जास्तीतजास्त २३ १/२ अंश उत्तरेकडे उगवतो आणि मावळतो. त्यानंतर मात्र तो पुन्हा दक्षिणेकडे वळतो म्हणून यास दक्षिणायन म्हणतात. अशा तऱ्हेने २२ जून ते २२ डिसेंबर दक्षिणायन आणि २२ डिसेंबर ते २२ जून उत्तरायण असते. म्हणजे ‘अयने’ ही वर्षांची दोन सत्रे आहेत. ऋतूंच्या दृष्टीने त्यांचे निश्चितच महत्त्व असते. २२ जून रोजी उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो तर दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. २२ डिसेंबर रोजी उलट स्थिती असते. तेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा आणि उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. गोलार्धानुसार विशिष्ठ ठिकाणाच्या सापेक्ष सूर्याची स्थिती बदलल्यामुळे ऋतूचक्र निर्माण होते. उन्हाळ्यात सूर्याचा क्षितिजसापेक्ष मार्ग खूप उंच असतो त्यामुळे उष्णता वाढते. हिवाळ्यात माध्यान्ही सूर्य खूप उंच येत नाही. त्यामुळे किरण तिरकस पडतात व उष्णता कमी होते. उष्णतेच्या कमी-जास्तपणामुळे तापमानावर परिणाम होतो. ऋतू होण्यामध्ये या घटकाचा खूप मोठा वाटा आहे. सूर्याप्रमाणेच चंद्राचेही उत्तरायण, दक्षिणायन होते. हे आवर्तन एका महिन्यात पूर्ण होते. पण याचा ऋतूशी संबंध नाही.
हेमंत मोने
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
रामानुजाचार्य
मध्ययुगात भारतात सर्वत्र कर्मकांडाचे स्तोम माजून धर्माच्या नावाने अधर्म माजला होता. अशावेळेस बहुजन समाजाला भक्तिमार्गाने मुक्तिमार्ग दाखविणारे भक्ती चळवळीचे आद्य प्रवर्तक, वैष्णव धर्माचे पुरस्कर्ते संत रामानुजाचार्य यांचा जन्म इ.स. १०१७ मध्ये तामिळनाडूतील श्रीपरेंबदूर या गावी केशव भट्ट यांच्या घरी झाला. कांजीवरम येथे यादवप्रकाश यांच्याकडे त्यांनी अध्ययन केले. पुढे यामुनाजाचार्य यांचे शिष्यत्व त्यांनी पत्करले. यामुनाजाचार्याच्या मृत्यूनंतर ब्रह्मसूत्रांवर भाष्य, द्रविड वेदांचा म्हणजे अळवारांच्या वाङ्मयाचा प्रसार आणि भक्ती मार्गाची चळवळ वैष्णव संप्रदायाच्या माध्यमातून सर्वसामान्यांमध्ये रुजवणे हा एकच ध्यास त्यांनी घेतला. रामानुजांनी पददलितांना मंदिर प्रवेश देण्यासाठी धडपड केली. प्रसंगी शंकराचार्याशी वाद घातला. सामान्यांना धर्माचा अर्थ कळावा म्हणून पुराणातील कथेवर गीते आणि नाटय़े रचली. तथापि, त्यांचे हे वर्तन सनातनी कर्मठ लोकांना आवडले नाही. त्यात ते पडले वैष्णव पंथाचे. तेव्हा शैव परंपरेचा अभिमान असणारा चोळ राजा कुलत्तुंगाने रामानुज व त्यांच्या अनुयायांचा छळ करायला सुरुवात केली. त्यांच्यावर विषप्रयोगही झाला. अखेर होयसळ घराण्यातही वैष्णवपंथीय राजा विट्टीदेव यांनी त्यांना आश्रय दिला. अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेल्या रामानुजांचा वेदांत सूत्रावरील ‘भाष्य’ हा प्रमुख ग्रंथ होय. ह्य़ाशिवाय ‘वेदांतसार’, ‘वेदांतदीप’, ‘गीताभाष्य’ आदी ग्रंथ त्यांनी लिहिले. साऱ्या भारतात फिरून त्यांनी आपल्या विचारांचा प्रचार केला. त्या काळात जात, पात न पाळता आपल्या शिष्यपरिवारात त्यांनी सर्वाचा समावेश केला. स्त्रियांबाबत त्यांचा दृष्टिकोन उदार होता. संन्यासी असलेल्या रामानुजांना दीर्घायुष्य लाभले. वयाच्या १२०व्या वर्षी शके १०५९, वैशाख शु.६, म्हणजे २८ एप्रिल ११३७ रोजी ते समाधीस्थ झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
लकी डे
स्नेहल, नितीश, तन्वी, अपेक्षा, शंतनू गप्पा मारत बसले होते. अचानक स्नेहल म्हणाली,‘‘आज मला खूप दिवस हवा असणारा आयपॉड बाबांनी माझ्यासाठी आणला. माझा आजचा लकी डे आहे. भलतीच खूष आहे मी.’’ तन्वी विचार करायला लागली. ‘माझा लकी डे कोणता’? प्रत्येकाच्या मनात त्याच वेळी हा विचार आला. शंतनू म्हणाला,‘‘आपला प्रत्येकाचाच असा लकी डे येतो. मी माझा सांगू का?, मला मोपेड घेतली तो माझा सगळ्यात लकी डे.’’ तन्वी आणि अपेक्षाच्या कुटुंबाच्या एकत्र सहली जायच्या. या वेळी सगळे मिळून सिंगापूर, हाँगकाँग, बँकॉकची सहल करणार होते. तन्वी आणि अपेक्षाच्या ‘शॉपिंग लिस्ट’मध्ये रोज नव्या गोष्टींची भर पडत होती. ‘काय रे नित्या, तू गप्प का? काहीच बोलत नाहीस?’ शंतनू म्हणाला. ‘नाही, मी आपला ऐकतोय तुमचे लकी डे. मी काय बोलणार? मला आयपॉड, मोपेड, खरेदी या कशातच रस नाही बाबा. मी काय सांगणार?’, नितीश थोडेसे हसून म्हणाला. ‘ए काय भाव खातोस रे, जो कोणता दिवस तुला लकी वाटत असेल तो सांग’, स्नेहल म्हणाली. ‘हो! प्रत्येकाला कुठली ना कुठली गोष्ट करायला अगदी प्रचंड आवड असतेच हं’, तन्वी थोडी चिडून म्हणाली. तिला ग्रुपमध्ये असं शिष्ठासारखं कुणी वागलेलं मुळीच आवडायचं नाही. ‘नाहीतरी हा नेहमीच इतरांपेक्षा स्वतला वेगळा समजतो’, ती कुरकुरली. ‘अगं तसं नाही. अशी रागावू नकोस’. गेल्या रविवारी मी सायकल घेऊन पक्ष्यांचे आवाज ऐकत पहाटे बाहेर पडलो. सभोवताली झाडझाडोरा, डोक्यावर निळंशार आभाळ, बरोबर पाण्याची बाटली आणि खाण्याचा डबा घेतला होता. ऊन लागू नये म्हणून डोक्यावर टोपी होती. स्केचपॅड, पेन, पेन्सिल घेतली. शिवाय दुर्बिण घेतली पक्षी बघायला आणि त्याबरोबर डॉ. सलीम अलींचं ‘इंडियन बर्ड्स’ हे पुस्तकही घेतलं. हिरवळीतले नाना कीटक मला भेटले. सरपुडे, टोळ, गवळणी, नाकतोडे. त्यांची मी चित्रं काढली. पुरुषोत्तम जोशींचं ‘कीटक निरीक्षकांचा सोबती’ पुस्तक माझ्या पोतडीत होतं. कितीतरी वेगवेगळे कीटक नावानिशी मला ठाऊक झाले. सायकल झाडाच्या बुंध्याला टेकवून डबा खाऊन पायी भटकलो. मी वारुळं शोधली, मधमाश्यांची पोळी पाहिली, पिसं गोळा केली, पक्षी पाहिले, त्यांचे आवाज ऐकले. भूक लागली तसं दुपारी जेवून पाणी पिऊन झोप काढली. पुन्हा संध्याकाळ होईपर्यंत मनसोक्त भटकलो. निसर्गाचे नाना रंग डोळ्यात भरून घेतले. फुला-पानांशी, पक्ष्यांशी, वृक्षांशी, फुलपाखरांशी जडलेलं नातं जपत तिन्हीसांजेला आनंदात घरी परतलो. तो माझा ‘लकी डे’ होता. सगळेच डोळे विस्फारून ऐकताना वेगळ्या सृष्टीत गेले होते. भानावर येत ते ओरडले, ‘ए पुढच्या वेळी आम्ही तुझ्याबरोबर नक्की येणार हं’. निसर्गातून मिळणारा निर्भेळ आनंद कुठल्याच कृत्रिम, निर्जिव गोष्टींमधून आपल्याला मिळत नाही. आपल्याला भरभरून आनंद देणारा निसर्ग उद्ध्वस्त होतो आहे, याची जाणीव आपल्याला हवी. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपण झाडे लावू शकतो. वन्यप्राणी, पक्षी यांचे संवर्धन करू शकतो. हवा प्रदूषित होऊ नये म्हणून स्वच्छता ठेवू शकतो. पाणी शुद्ध राखू शकतो, पाण्याचा अपव्यय टाळू शकतो.
आजचा संकल्प- मी निसर्गावर प्रेम करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com