Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९

रबाळे रेल्वे अपघात;
तिघा अल्पवयीन मुलांना अटक

नवी मुंबई/प्रतिनिधी - रबाळे येथे रेल्वेमार्गावर सिमेंटची झाकणे टाकल्यामुळे झालेल्या अपघातप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाने रविवारी तीन बालगुन्हेगारांना अटक केली. गटारावरील सिमेंटची झाकणे चोरून त्यातील लोखंड वेगळे करायचे व भंगारात त्याची विक्री करायची, असे उद्योग हे त्रिकूट करीत असे. गेल्या शुक्रवारी अशीच सिमेंटची झाकणे चोरून ते पळून जात होते. रबाळेनजीक रेल्वेमार्ग ओलांडत असताना ठाणे-नेरुळ लोकल येताना दिसल्याने हे झाकण रेल्वे मार्गावरच टाकून ते पळून गेले. या झाकणामुळे लोकल सुमारे २०० मीटर घसरत गेली. मोटरमनने प्रसंगावधान राखून गाडीचा वेग कमी केल्याने जीवितहानी टळली. रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त एस.सी. पाढी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए.के. शर्मा, उपनिरीक्षक संदीप ओंबासे, हरिमोहन निरंजन यांनी तपास सुरू केला. खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे रविवारी आकाश कोळवणकर, अर्जुन काशिनाथ शिंदे व आकाशकुमार ऊर्फ भोलू योंगेद्रप्रसाद या तीन बालगुन्हेगारांना अटक करण्यात आली. नंतर त्यांची भिवंडी सुधारगृहात रवानगी करण्यात आली. रेल्वे प्रवासात बाधा निर्माण करणे, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे ओंबासे म्हणाले.

नवीन पनवेलमध्ये सिंधुमहोत्सव
पनवेल - येथील सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघातर्फे सिडको खुला प्लॉट, सेक्टर दोन, नवीन पनवेल येथे मंगळवार, २८ एप्रिल ते गुरुवार ७ मे या कालावधीत सिंधुमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गावाकडील बचत गट, सर्वसाधारण व घरगुती उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, पनवेल शहरातील जनतेला कोकणातील घरगुती उत्पादने उपलब्ध करणे, या हेतूने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अधिकाधिक नागरिकांनी या महोत्सवाची लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

फलक नासधूसप्रकरणी कामोठे बंद
पनवेल/प्रतिनिधी - कळंबोलीतील कामोठे येथे रविवारी रात्री काही समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या फलकाची नासधूस करण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ सोमवारी ‘कामोठे बंद’ पाळण्यात आला. नालंदा बुद्धविहार समितीतर्फे सेक्टर-६ ए मधील त्रिमूर्ती कॉम्प्लेक्ससमोर हा फलक लावण्यात आला होता. हा फलक खाली खेचून चार-पाच जणांचा जमाव त्याची नासधूस करण्याच्या प्रयत्नात असताना समितीचे कार्यकर्ते तेथे दाखल झाले आणि त्यांनी या समाजकंटकांपैकी एकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी कामोठे बंदची हाक देण्यात आली. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. येथील बहुतांश दुकाने बंद होती. आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या घटनेतील मुख्य आरोपींना त्वरित अटक न केल्यास पनवेल तालुक्यात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.