Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९

मंदीतही ग्राहकांनी साधली
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताची संधी

प्रतिनिधी / नाशिक

अक्षय्य तृतीया म्हटल्यावर आंबे आणि सोने यांची आठवण येणे अपरिहार्यच. यंदाही या दोन्हीच्या बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसून आली असली तरी मंदी, महागाई यामुळे त्यात एरवीसारखा उत्साह नव्हता. अर्थात, मंदीमुळे तुलनेने कमी प्रमाणात का होईना, पण अनेकांनी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त सोने खरेदीसाठी साधला. त्यामुळे विविध सराफी पेढय़ांवर ग्राहकांची लगबग सुरू असल्याचे पहावयास मिळाले. तथापि, जळगाव या सोन्याच्या प्रमुख बाजारपेठेसह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक प्रमाणेच इतर शहरांमध्ये नेहमीसारखा जोश मात्र जाणवला नाही. सोन्याचे वधारलेले भाव व आर्थिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर ग्राहकांनी सोन्याची खरेदी केली, पण नेहमीच्या तुलनेत त्याचे प्रमाण अतिशय अल्प राहिल्याचे व्यवसायिकांचे मत आहे. त्यातही या ग्राहकांमध्ये लग्नसराईची खरेदी करणाऱ्यांचा अधिक समावेश होता. वाहन खरेदी अथवा इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या बाजारातही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. टिव्ही, फ्रिज अथवा तत्सम वस्तूंच्या खरेदीत ग्राहकांनी फारसा रस दाखविला नाही.

नाशिकमध्ये ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात
प्रतिनिधी / नाशिक

अक्षय्य तृतीयेचे औचित्य साधून बच्चूमल केवलराम आलठक्कर आणि श्री लालसाई सिंधी सेवा मंडळ यांच्यातर्फे आयोजित सामुदायिक सोहळ्यात सोमवारी विविध जाती धर्मातील ४३ तर नाशिक माहेश्वरी समाजातर्फे आयोजित सोहळ्यात आठ जोडप्यांचे विवाह उत्साहाच्या वातावरणात झाले. याप्रसंगी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, ज्येष्ठ समाजसेवक पां. भा. करंजकर, तुकाराम दिघोळे, मुद्रांक जिल्हाधिकारी बी. जी. मनगटे आदी उपस्थित होते.

नात्यांतील अत्यंत नाजूक गुंफण!
मुलांचे भावविश्व

आपल्या मुलांच्या वर्तनाविषयी पालक हल्ली अधिक जागरूक होत आहेत. पण, गतिमान जीवनशैलीमुळे अनेकदा इच्छा असूनही त्यांना मुलांशी मोकळेपणाने संवाद साधता येत नाही. त्यामुळे मुलांबाबत केवळ जागरूक राहण्यापेक्षा त्यांचे मित्र बनून मुलांना ‘सकारात्मक’ बनविण्याची खरी गरज आहे. त्या अनुषंगाने, बालरोगतज्ज्ञ व बाल-आहारतज्ज्ञ या नात्याने गेली अनेक वर्षे मुले आणि त्यांचे पालक यांच्या सततच्या संपर्कात असणाऱ्या डॉ. शामा कुलकर्णी ‘नाशिक वृत्तान्त’च्या माध्यमातून दर मंगळवारी मुलांच्या भावविश्वाचा वेध प्रस्तुत मालिकेतून घेत आहेत..

वसंतोत्सवातंर्गत ‘श्रीरंग’ नृत्याविष्कार
नाशिक / प्रतिनिधी

नृत्यांगण संस्थेतर्फे येथे ‘वसंतोत्सव’ चे आयोजन करण्यात आले असून संगीतकार श्रीधर फडके यांच्या निवडक रचनांवर आधारित ‘श्रीरंग’ या नृत्याविष्काराने ३० एप्रिल रोजी या उत्सवाचे उद्घाटन होणार आहे. परशुराम साईखेडकर नाटय़मंदिरात सायंकाळी सातला हा कार्यक्रम होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून नाटय़लेखक तथा दिग्दर्शक देवेंद्र पेम आणि झी मराठीवरील एकापेक्षा एक कार्यक्रमातील महाविजेता मयुरेश पेम हे उपस्थित राहणार आहेत. पार्ले येथे या कार्यक्रमाचे याआधी सादरीकरण झाले आहे. नृत्याविष्काराचे नृत्यदिग्दर्शन कीर्ती भवाळकर, सायली मोहाडकर, सुखदा देशपांडे यांनी केले आहे. त्यांच्या समवेत नृत्यांगणच्या ३० नवोदित नृत्यांगना त्यांचे कलागुण सादर करणार आहे. प्रकाश योजना अरविंद भवाळकर तर रंगभूषा माणिक कानडे यांची आहे. निवेदन मुग्धा जोशी करणार आहेत. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका २६ एप्रिलपासून नाटय़गृहावर उपलब्ध झाल्या आहेत. वसंतोत्सवानिमित्त नृत्याचे अध्ययन आणि आविष्काराचा आनंद रसिकांना मिळणार आहे. ज्येष्ठ नृत्यांगना व गुरू डॉ. मंजिरी देव यांची कथकनृत्य मार्गदर्शन कार्यशाळा एक ते तीन मे या कालावधीत संस्थेच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आली आहे. नृत्याविष्कार कार्यक्रमास रसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

व्यापाऱ्याच्या हत्येच्या निषेधार्थ आज पिंपळगाव बंद
प्रतिनिधी / नाशिक

पिंपळगाव बसवंत येथील व्यापारी प्रदीप छाजेड यांच्या हत्या प्रकरणातील संशयितांचा शोध घेऊन त्यांना कठोर शासन करावे या मागणीसाठी स्थानिक व्यापारी संघटनेने उद्या, मंगळवारी पिंपळगाव शहर बंदचे आयोजन केले आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी व्यापाऱ्यांच्यावतीने पोलीस ठाण्यावर मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे. प्रसिद्ध व्यापारी प्रदीप छाजेड यांच्या हत्या प्रकरणातील कुठलेही धागेदोरे अद्याप पोलीस यंत्रणेच्या हाती लागू शकलेले नाहीत. या घटनेमुळे व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सर्वसामान्यांना रिव्हॉल्व्हरचा परवाना देण्याची मागणी
नाशिक / प्रतिनिधी

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि स्वतच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी व्यावसायिक, शेतकरी व सर्वसामान्यांना रिव्हॉल्व्हरचे परवाने देण्याची मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी सुरेंद्रनाथ बुरड यांनी केली आहे.

ओमप्रकाश एम्पाल महापारेषणचे नवीन कार्यकारी संचालक
नाशिक / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ओमप्रकाश एम्पाल यांची थेट निवड प्रक्रियेतून महापारेषणच्या कार्यकारी संचालकपदी (संचालन) नियुक्ती झाली आहे. महापारेषणच्या मुख्य कार्यालयातून याबाबतचा आदेश त्यांना नुकताच प्राप्त झाला.

प्रौढ नागरिक मंडळातर्फे वसंत व्याख्यानमाला
नाशिक / प्रतिनिधी
येथील कॉलेजरोडवरील डिसुझा कॉलनीतील प्रौढ नागरिक मित्रमंडळातर्फे एक ते सहा मे या कालावधीत वसंत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आल्याची माहिती मंडळाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख चारूदत्त दीक्षित व अध्यक्ष अनंत साळी यांनी दिली. समाजमंदिरात सायंकाळी सहाला सर्व व्याख्याने होतील. एक मे रोजी महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश पाटील यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन होईल. यावेळी सकाळ न्यूज नेटवर्कचे संपादक उत्तम कांबळे यांचे ‘दहशतवाद व सामान्य माणूस’ या विषयावर व्याख्यान होईल. दोन मे रोजी प्रा. वृंदा भार्गवे यांचे ‘मला आवडलेले पुस्तक’, तीन मे रोजी डॉ. राजेंद्र नेहेते यांचे ‘वैद्यकीय जीवनातील अनुभव’ चार मे रोजी माजी प्राचार्य भगवान जोशी यांचे ‘प्रयोग मन:शांतीचे’, पाच मे रोजी डॉ. विजय घाटगे यांचे ‘जगू या आनंदाने’ या विषयावर व्याख्यान होईल. सहा मे रोजी बागेश्री निर्मित ‘अशी मी जयश्री’ हा जयश्री गडकर यांच्या गाजलेल्या मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारित कार्यक्रम होईल. सोनल अधिकारी, ऐश्वर्या मुळे व ज्योती कुलकर्णी हे सादरकर्ते असून चारूदत्त दीक्षित व दीपक दीक्षित यांचे संगीत संयोजन असणार आहे. परिसरातील सर्वानी व्याख्यानमालेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्य़ातील प्राचार्यासाठी संगणक प्रणालीविषयी कार्यशाळा
नाशिक / प्रतिनिधी
नाशिक जिल्हा समाजकल्याण विभाग व क. का. वाघ शिक्षण संस्थेतर्फे २९ एप्रिल रोजी दुपारी बाराला जिल्ह्य़ातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यासाठी संगणक प्रणाली विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. क. का. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्थेतील कुसुमाग्रज ग्रंथालयात हा कार्यक्रम होणार असून समाजकल्याण विभागातर्फे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती संदर्भात शासकीय कार्यालयीन कामकाजात सुरळीतपणा येण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यानी कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी तसेच संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी केले आहे.

‘भोसला’ च्या साहसी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप
नाशिक / प्रतिनिधी
मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाच्या भोसला अ‍ॅडव्हेंचर फाऊंडेशनतर्फे आयोजित उन्हाळी साहसी क्रीडा प्रशिक्षण मुलींच्या शिबिराचा समारोप कार्यवाह प्रा. दिलीप बेलगावकर व अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच झाला. शिबिरातंर्गत रॉक क्लायम्बिंग, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसींग, जुमारिंग, ट्रेकिंग, राफ्टींग, कयाकिंग, पॅरासेलिंग, मॅपरिडींग, रायफल फायरिंग या साहसी क्रीडा प्रकारांचे एकूण ५१ मुलींना प्रशिक्षण देण्यात आले. समारोपास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सरकार्यवाह प्रकाश पाठक उपस्थित होते. विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी समन्वयक नितीन जोशी उपस्थित होते.

भिक्खू महासंघातर्फे आंतरराष्ट्रीय बुध्द जयंती सोहळा
नाशिक / प्रतिनिधी

अखिल भारतीय भिक्खू महासंघ आणि बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीच्या वतीने त्रिपावन वैशाख बुध्दपोर्णिमेनिमित्त बुध्दगयेतील कालचक्र मैदान येथे आठ ते १० मे या कालावधीत सायंकाळी सहापासून एकविसाव्या त्रिदिवसीय आंतरराष्ट्रीय बुध्द जयंती सोहळ्याचे आयोजन भदंत आनंदबोधी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आल्याची माहिती बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीचे मुख्य राष्ट्रीय महासचिव तथा अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे राष्ट्रीय संघटक भदंत हर्षबोधी यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्रिदिवसीय बुध्द जयंती सोहळ्याचे उद्घाटन आठ मे रोजी सायंकाळी सहाला भदंत आनंददेव महास्थाविर संघनायक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उपस्थितांना रात्री बारापर्यंत भिक्खु संघाकडून मार्गदर्शन करण्यात येईल. मार्गदर्शनानंतर रात्री बारा ते सकाळी सहापर्यंत बुध्द , भीमगीतांचा कार्यक्रम होईल. नऊ मे रोजी सकाळी सहा वाजता भिक्खु महासंघाची व उपासकांची विश्वमैत्री सद्भावना धम्म रॅली काढून बोधीवृक्षाखाली बुध्दवंदना , धम्मवंदना , संघवंदना व बुध्दपूजा करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात येईल. या सोहळ्याचे सूत्रसंचालन कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भदंत आनंद महास्थवीर हे करणार आहेत. या सोहळ्यात देशविदेशातील बौध्द धम्मगुरू हजारोंच्या संख्येने सहभाग घेणार आहेत. नाशिक जिल्ह्य़ातील बौध्द उपासकांनीही मोठय़ा संख्येने बुध्दगया येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. सोहळ्यास अर्थसहाय्य करू इच्छिणाऱ्यांनी या संदर्भातील अधिक माहितीसाठी ९३७०२३१४०० या क्रमांकावर संपर्क साधावा , अशीही सूचना करण्यात आली.