Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मंदीतही ग्राहकांनी साधली
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताची संधी
प्रतिनिधी / नाशिक

अक्षय्य तृतीया म्हटल्यावर आंबे आणि सोने यांची आठवण येणे अपरिहार्यच. यंदाही या

 

दोन्हीच्या बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसून आली असली तरी मंदी, महागाई यामुळे त्यात एरवीसारखा उत्साह नव्हता. अर्थात, मंदीमुळे तुलनेने कमी प्रमाणात का होईना, पण अनेकांनी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त सोने खरेदीसाठी साधला. त्यामुळे विविध सराफी पेढय़ांवर ग्राहकांची लगबग सुरू असल्याचे पहावयास मिळाले. तथापि, जळगाव या सोन्याच्या प्रमुख बाजारपेठेसह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक प्रमाणेच इतर शहरांमध्ये नेहमीसारखा जोश मात्र जाणवला नाही. सोन्याचे वधारलेले भाव व आर्थिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर ग्राहकांनी सोन्याची खरेदी केली, पण नेहमीच्या तुलनेत त्याचे प्रमाण अतिशय अल्प राहिल्याचे व्यवसायिकांचे मत आहे. त्यातही या ग्राहकांमध्ये लग्नसराईची खरेदी करणाऱ्यांचा अधिक समावेश होता. वाहन खरेदी अथवा इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या बाजारातही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. टिव्ही, फ्रिज अथवा तत्सम वस्तूंच्या खरेदीत ग्राहकांनी फारसा रस दाखविला नाही.
आर्थिक मंदीमुळे बाजारपेठेतील थंडावलेल्या व्यवहारांना अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्या जोमाने चालना मिळेल अशी व्यवसायिकांची धारणा होती. तथापि, काही अपवाद वगळता बाजारपेठेत नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसले नाही. खरे तर अक्षय्य तृतीया हा सोने खरेदीसाठी अत्यंत चांगला मुहूर्त समजला जातो. त्यातही यंदा सकाळी साडे नऊ ते बारा आणि सायंकाळी चार ते आठ हा मुहूर्त खरेदीसाठी चांगला असल्याचे सांगण्यात आल्याने सराफी व्यवसायिकांनी सकाळपासून आपल्या पेढय़ा उघडल्या होत्या. तथापि, येथील टकले बंधू, बाफना ज्वेलर्स, आडगावकर सराफ अशा काही नामवंत पेढ्यांचा अपवाद वगळता सराफ बाजारात ग्राहकांची फारशी गर्दी दिसून आली नाही. ग्राहकांची गर्दी असली तरी मंदीमुळे खरेदीत जोश जाणवत नसल्याचे मत बाफना ज्वेलर्सचे अमित बाफना यांनी व्यक्त केले. सोमवारी या ठिकाणी सोन्याचा प्रती दहा गॅ्रम १४ हजार ८०० रुपये भाव होता. मुहूर्तावर सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे वधारलेल्या भावाचा परिणाम या खरेदीवर झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे सकाळच्या सत्रात सराफ बाजारात ग्रामीण भागातील ग्राहक अधिक होते. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने अनेकांनी लग्नातील सोने खरेदी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे सराफ बाजारात काहिशी गर्दी दिसत असल्याची माहिती मंगेश वाघ यांनी दिली. निवडक ग्राहक या मुहूर्तावर सोने खरेदी करतात. पण, सोन्याच्या सध्याच्या दरामुळे त्यांनी हात आखडता घेतला आहे. यापूर्वी जो ग्राहक दहा ग्रॅम सोने खरेदी करत होता, त्याने आता मुहूर्तावर खरेदी करायची म्हणून केवळ एक किंवा दोन गॅ्रम सोने खरेदी करण्यात रस दाखविला. अक्षय तृतीयेच्या दिवशी बहुतांश सराफी पेढ्यांमार्फत यापूर्वी ५०० ग्रॅम सोन्याची विक्री केली जात होती. परंतु, आता १०० ग्रॅम सोने विक्री करणेही अवघड बनले आहे. सायंकाळच्या मुहुर्तावर शहरातील ग्राहकांची गर्दी होण्याची अपेक्षा असल्याचे वाघ यांनी सांगितले. सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारातही यासारखीच स्थिती होती. सोन्याचे भाव सद्यस्थितीत १५ हजाराला भिडले आहेत. गेल्या वर्षी हा भाव आठ ते नऊ हजाराच्या आसपास होता. दरातील ही तफावत ग्राहकांना खरेदीसाठी प्रोत्साहन देवू शकली नाही. या बाजारपेठेत सोने खरेदीसाठी बाहेरील ग्राहकही येतात. मात्र, वाढत्या भावामुळे खरेदीवर परिणाम झाल्याचे आर. सी. बाफना ज्वेलर्सतर्फे सांगण्यात आले. दहा ग्रॅम सोने घेणारे एक ग्रॅम खरेदी करून समाधान मानत असल्याचेही त्यांनी सांगितले. सोने खरेदीसाठी दुपारनंतर ग्राहकांची गर्दी होईल, असे राजमल लखीचंद ज्वेलर्सच्यावतीने सांगण्यात आले तर महावीर ज्वेलर्सचे अजय ललवाणी यांनी ग्राहकांना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले.
या मुहुर्तावर नवीन वाहन खरेदीत अनेकांनी रस दाखविला. नाशिकच्या जितेंद्र अ‍ॅटोमोबाईल कॉर्पोरेशनमध्ये वेगवेगळ्या दुचाकी वाहनांसाठी २०० ग्राहकांनी आगाऊ नोंदणी केल्याचे व्यवस्थापक राजेंद्र मुंदडा यांनी सांगितले. वाहन खरेदीत मंदीचा कोणताही परिणाम जाणवला नाही. लग्नसराई असल्याने नागरीक घरच्या कामात गुंतले आहेत. अन्यथा वाहन नोंदणीचा आकडा अजून वाढू शकला असता असेही ते म्हणाले. अक्षयतृतीयेच्या दिवशी चारचाकी वाहनांची विक्री चांगल्या प्रमाणात झाली. टाटा मोटर्स या विक्रेत्याकडे छोटय़ा कारला सर्वाधिक मागणी होती. २५ ते ३० कारची नोंदणी झाल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. वाहन उद्योगात काहिसे समाधानाचे वातावरण असले तरी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारपेठेत मात्र शांतता होती. या दिवसानिमित्त कंपन्यांनी खास योजना जाहीर केल्या नसल्या तरी वस्तूंच्या किंमती अतिशय खाली उतरविल्या आहेत. २९ इंची टिव्ही आज ११ ते १२ हजारात उपलब्ध करून देण्यात आला आहे. अशीच स्थिती इतर इलेक्ट्रॉनिक वस्तुंबाबत आहे. तथापि, ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळाला लाभला नसल्याचे योगेश इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक योगेश वाणी यांनी सांगितले. एरवी अक्षयतृतीयेच्या अगोदर ग्राहक नोंदणी करून साधनांची डिलिव्हरी घेत होता. तथापि, आता आधी नोंदणी केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. धुळे, जळगाव, मालेगाव, नंदुरबार भागातही थोडय़ाफार फरकाने असेच वातावरण होते.
सोने व अन्य वस्तुंप्रमाणेच आंब्याचा बाजारही यंदा फारसा तेजीत नाही. मध्यंतरी कोकणात झालेल्या बिगरमोसमी पावसामुळे आंब्याच्या उत्पादनात घट आली असून पावसामुळे आंब्याच्या दर्जावरही काहिसा परिणाम झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. हापूस आंब्याचे दर डझनासाठी साधारणत: अडीचशे रुपयांच्या घरात असून पायरी व अन्य आंब्यांचे दरही नेहमीपेक्षा काहिसे चढले आहेत. परिणामी, अनेकांना यंदा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नेहमीप्रमाणे मनसोक्त आंबा खरेदीचा आनंद लुटता आला नाही. खान्देश परिसरात आजच्या म्हणजेच आखाजीच्या दिवशी आमरसा सोबत पुरणपोळ्या वा मांडे हा पारंपरिक बेत मात्र तडीस नेण्यावर बहुतेकांचा भर होता.