Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नाशिकमध्ये ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात
प्रतिनिधी / नाशिक

अक्षय्य तृतीयेचे औचित्य साधून बच्चूमल केवलराम आलठक्कर आणि श्री लालसाई सिंधी

 

सेवा मंडळ यांच्यातर्फे आयोजित सामुदायिक सोहळ्यात सोमवारी विविध जाती धर्मातील ४३ तर नाशिक माहेश्वरी समाजातर्फे आयोजित सोहळ्यात आठ जोडप्यांचे विवाह उत्साहाच्या वातावरणात झाले. याप्रसंगी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, ज्येष्ठ समाजसेवक पां. भा. करंजकर, तुकाराम दिघोळे, मुद्रांक जिल्हाधिकारी बी. जी. मनगटे आदी उपस्थित होते.
मुलीच्या लग्नाचा खर्च अनेक पालकांना परवडणारा नसतो. त्यामुळे हा खर्च भागविण्यासाठी कर्ज काढावे लागते. नाजूक आर्थिक स्थितीमुळे या कर्जाची परतफेड करणे अशक्य बनते आणि पालक अडचणीत सापडतात, असा अनुभव आहे. या पाश्र्वभूमीवर, लग्नासाठी होणारा नाहक खर्च टळावा म्हणून सामुदायिक विवाह हा सर्वात चांगला पर्याय असल्याचे मत यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले. सामुदायिक विवाहासाठी केवळ मुलींच्या कुटुंबियांनीच नव्हे तर मुलांकडील मंडळींनीही सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. उभयतांनी असा विचार केल्यास सामुदायिक विवाहाच्या माध्यमातून खर्चात मोठी बचत करता येईल. पुढील काळात सामुदायिक विवाह सोहळ्यांना मोठ्या प्रमाणावर चालना देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. बच्चूमल केवलराम आलठक्कर आणि श्री लालसाई सिंधी सेवा मंडळातर्फे मागील १३ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती प्रास्तविकात कन्हैयालाल आलठक्कर यांनी दिली. सोहळ्यासाठी शिंदे-पळसे येथील तिरूपती मंगल कार्यालयात जय्यत तयारी करण्यात आली होती. सकाळपासून वधुवरांचे कुटुंबिय व नातेवाईकांची गर्दी होवू लागली. दुपापर्यंत परिसरात वऱ्हाडी मंडळींची प्रचंड गर्दी झाली. हिंदू रुढीप्रमाणे हा सोहळा पार पडला. यावेळी कन्यादानात संयोजकांकडून प्रत्येक जोडप्यास संसारोपयोगी वस्तू व भांडी भेट म्हणून देण्यात आल्या. भोजनासाठी गर्दी होवू नये म्हणून खास व्यवस्था करण्यात आली होती.
दुसरा सामुदायिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम आडगाव नाका येथील श्री स्वामी नारायण मंदिरात पार पडला. नाशिक माहेश्वरी
समाज संस्थेच्यावतीने आयोजित या सोहळ्यात आठ वधू-वर विवाहबद्ध झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माहेश्वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण सोमाणी व महेश सेवा निधीचे अध्यक्ष राधाकिसन चांडक उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत सुशील राठी व हेमंत मालपाणी यांनी केले. श्री विनायक पूजन, वरपूजा, अक्षता, पाणीग्रहण संस्कार असे विविध कार्यक्रम यावेळी झाले. सोहळ्यासाठी संयोजकांनी वेगवेगळ्या समितींची नेमणूक केली होती. व्यवस्थापन, नोंदणी, निवास, भोजन, पूजा (विधी), सांस्कृतिक, प्रसिद्धी अशा समित्यांचा त्यात समावेश असल्याचे सांगण्यात आले.