Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नात्यांतील अत्यंत नाजूक गुंफण!
मुलांचे भावविश्व

आपल्या मुलांच्या वर्तनाविषयी पालक हल्ली अधिक जागरूक होत आहेत. पण, गतिमान

 

जीवनशैलीमुळे अनेकदा इच्छा असूनही त्यांना मुलांशी मोकळेपणाने संवाद साधता येत नाही. त्यामुळे मुलांबाबत केवळ जागरूक राहण्यापेक्षा त्यांचे मित्र बनून मुलांना ‘सकारात्मक’ बनविण्याची खरी गरज आहे. त्या अनुषंगाने, बालरोगतज्ज्ञ व बाल-आहारतज्ज्ञ या नात्याने गेली अनेक वर्षे मुले आणि त्यांचे पालक यांच्या सततच्या संपर्कात असणाऱ्या
डॉ. शामा कुलकर्णी ‘नाशिक वृत्तान्त’च्या माध्यमातून दर मंगळवारी मुलांच्या भावविश्वाचा वेध प्रस्तुत मालिकेतून घेत आहेत..
छोटय़ा रिंकुला रोज अर्धी शाळा बुडवून घरी यावे लागत असे. तो मधल्या सुट्टीनंतर शाळेत एक क्षणही थांबू शकत नसे. त्याचे आई-बाबा या त्याच्या प्रश्नाने गलितगात्र झाले होते. त्याला जबरदस्तीने शाळेत थांबवले तर तो बाकावर झोपून जात असे. तो दहा वर्षांचा मोठा गोड मुलगा. अत्यंत लाघवी. त्याला दोन-तीनदा फीट येवून गेल्यामुळे औषधे चालू होती. पालक, तो औषधांचा परिणाम असेल असे समजून त्याला शाळेतून घरी येवू देत.
त्याचा आय क्यू शंभरच्या पुढेच होता. तो मंद नव्हता, त्याच्या शारीरिक तपासणीतही काहीही व्यंग नव्हते. मग तो का परत येई ?
त्याचे बाबा रात्री दहा वाजता घरी येत. सकाळी सातपासून ते बाहेर असत. त्यांची नोकरी मोठी जोखमीचीच. ते खूपच दमून भागून येत. आल्यावर त्यांना विरंगुळा हवा म्हणून पिक्चर लावित असत. बाबांच्या मांडीवर बसून रिंकू पूर्ण पिक्चर पहात असे. बाबांनाही वाटे दिवसभर भेटत नाही म्हणून मांडीवर बसू द्यावे !
अर्थातच त्याचा हा रात्रीचा पिक्चर बंद झाला आणि त्याचे सर्व प्रश्न मिटले. काऊन्सेलिंगनंतर तो आता टी. व्ही. न बघता शांतपणे झोपी जावू लागला.
टिंकू एका मोठय़ा हुद्यावरच्या प्रतिष्ठित व्यक्तीचा मुलगा. टिंकूचे घरामधील सर्वच नोकरांबरोबर खटके उडत. त्याला सर्वानी अहोजाहो म्हणावे, तो येताच उठून उभे रहावे ही त्याची अपेक्षा तो लहान असताना बाबांबरोबर आला तर हा सर्व मान हा आपला हक्कच आहे. असा त्याचा समज झाला. पुढे तो नववीत गेल्यावर लहान समजून त्याचे होणारे लाड बंद झाले. त्याला एक टय़ुशन होती. तो व्ही. आय. पी. चा मुलगा म्हणून त्या टीचरने त्याची स्पेशन टय़ूशन क्लासऐवजी घरी घेण्यास सुरूवात केली. दोनदा तो न आल्याने टीचरने त्यांना फोन करून त्याला पाठविण्यात सांगितले. नंतर तो अनियमित येताना पाहून टीचरने फोन करणे सोडले. त्याच्या आईने जावून त्या टय़ूशन टीचरला फोन करण्याविषयी जबरदस्त फायरिंग दिले.
आपण सर्वचजण समाजात कोणतेतरी उच्चपद भूषवित असतो. परंतु आपल्या वागण्याबोलण्यात नम्रता हवी. विद्या विनयेन शोभते. आपण उच्चपदस्थ आहोत म्हणून ‘मला मान द्या’ असे म्हटले तर त्यात मजा नाही. Respect is to be commandad & not to be demanded या उदाहरणातील टय़ूशन्च्या सरांनी स्पेशल घरी टय़ूशन घेणे स्वत: फोन करणे हे टिकूंसाठी केलेच होते. परंतु, त्यांनी आपल्याला दिलेला हा मान आहे हा आपला हक्क नाही हे पालकांनी समजून घ्यायला हवे. जी गोष्ट सन्मानाने केली, तो अधिकारच आहे असे समजून त्या सरांनाच फायरिंग करणे हे कितपत योग्य ? यातून त्या मुलावर संस्कार कसे होणार ? त्याला हे नात्यामधील माणसांमधील सूक्ष्म बारकावे कसे समजणार ? असे मूल मोठेपणी त्याच्या सहचराशी कसे वागेल ? आज राग आला तर आरडाओरड करून नोकरांना काढून टाकता येते. पण संसाराची वेळ आली की तो मोडायला मिनिटभरही लागत नाही.
आपल्याकडे मर्सिडीज असेल तरी आपल्या मुलाला बसमध्ये चार मुलांसोबत फिरू द्या. त्याच्या स्वत:च्या कर्तृत्वावर त्याला नाव कमवू द्या. पालकांनो तुम्ही सेलिब्रिटी असाल तरीही तुमचे मूल म्हणून त्याला ओळखण्यापेक्षा त्याचे आईबाबा म्हणून लोक ज्यावेळेस तुम्हाला त्यांच्यातील सद्गुणांसाठी ओळखतील त्यावेळच्या आनंदाची अनुभूती अवर्णनीय आहे. पक्षी सुद्धा पिल्लू मोठे झाल्यावर त्याला घरटय़ातून ढकलून देतात आणि पिल्लाला उडायला शिकवतात. त्याला सर्वच सुखदु:खांची झळ सोसू द्या. कधी कधी तो अभ्यास करेनासा झाला की त्याला असलेल्या सुविधांचा आणि आपल्या बालपणीच्या हालअपेष्टांचा पाढा आपण वाचतो. पण अशारितीने प्रश्न निर्माण झाल्यावर सोडवणे म्हणजे लसीकरण न करता आजार होवू देणे आणि त्यावर निर्थक उपचारांचा व्यर्थ श्रम, पैसा घालविणे होय.
मुलाला मूल म्हणूनच वाढू द्या. पैसा, प्रतिष्ठा, पद हे सारे क्षणभंगूर असते. मुलावर माणूस म्हणून होणारे संस्कार आयुष्यभराची शिदोरी असते. रिटायरमेंटनंतर पद संपुष्टात येते. त्यामुळे आपल्या अधिकाराच्या जोरावर आपण ज्यांना ज्यांना झापलेले असते ते नंतर तोंड फिरवून निघून जातात. अशावेळी जीवनाच्या उत्तरार्धात प्रचंड मानसिक ताणतणांवांना सामोरे जावे लागते.
मी जरी बालरोगतज्ज्ञ असले तरी माझ्या असंख्य पेशंटची पूर्ण कुटुंबे मला जवळून चांगलीच माहीत आहेत. कित्येक वेळा असे प्रश्न मी जवळून पाहिले आहेत. त्याचा त्रास नक्कीच मुलांना होतो. असे तणावग्रस्त आजीआजोबा म्हणून स्वत:चे भविष्यातील चित्र चांगले वाटते का ? जीवनातील सर्वात मोठय़ा निर्भेळ आनंदाचा पाया प्रेमावर आधारित आहे. आम्ही इंटर्नशिपमध्ये खेडोपाडी कँप घेण्यासाठी जात असू. त्यावेळी तेथील एखादी आजी चुलीवर गरम गुळाचा चहा करून देई, तर एखाद्या घरात सर्वाना गरमागरम पिठलं भाकरी दिली जाई. शेणाने सारवलेल्या घरात पत्रावळीवरचे ते अन्न अत्यंत सुग्रास लागत असे, कारण आम्ही सर्वजण त्यामागील प्रेम ओळखत असू. ती अशिक्षित म्हातारी आमच्यासारख्या मेरीटवर शिकलेल्या डॉक्टरला ए-जा करते, खुर्ची न देता जमिनीवर बसवते अशा विचारांनी आम्ही कधीही तो आनंद उपभोगू शकलो नसतो. आपण किती जरी मानाने मोठे असलो तरी वयाचा आदर करायला शिकले पाहिजे. त्याचप्रमाणे दुसऱ्याने प्रेमादराने काही केले तर ते समजण्याची कुवत आपल्यात निर्माण केली पाहिजे. तो हक्क समजून उपयोगी नाही. नेमके पतीपत्नीच्या नात्यात सुद्धा हेच तत्व महत्वाचे ! आज कितीतरी कुटुंबात दहा वीस वर्षांच्या संसारानंतर बेबनाव होतो. याचे मुळच समोरच्याने प्रेमादराने केलेली गोष्ट आपल्याला आपला हक्क वाटू लागते हे आहे.
पत्नी अत्यंत काटेकोरपणे पतिराजांच्या आवडीनिवडी, सवयी, वेळ अगदी घडय़ाळाच्या काटय़ावर जपत असते. हळूहळू त्यातील नाविण्य संपते. पतिराजांना त्याची सवय होते. पंधरा-वीस वर्षांनी पत्नीचीही मेनोपॉज जवळ येते. मुलांच्या जबाबदाऱ्या असतातच. त्या अजून वाढतात. कोठेतरी पतिराज अवतार धारण करतात. पूर्ण कुटुंबाचा तोलच ढासळतो.
त्यातून मुलांच्या अपयशाचे खापर दोघेही एकमेकांवर फोडतात. कोठे जाते ते सहवासाने निर्माण होणारे प्रेम ? अचानक, एकाएकी, एकमेकांचे दोघांच्याही पूर्ण खानदानाचे सात पिढय़ांचे दोषच दोष चोहीकडे दिसू लागतात. या परिस्थितीत असुरक्षित वाटणारे मूल वाईट मित्रांच्या संगतीला न लागले तरच नवल ! अशा अनेक मुलांच्या काऊन्सेलिंगमध्ये फॅमिली काऊन्सेलिंगशिवाय काहीही होवू शकत नाही. कित्येकदा मुलांच्या काऊन्सेलिंगच्या आधीच फक्त पॅरेन्टिंगच्या सेशननंतरच आम्हाला मुलांमध्ये प्रचंड सकारात्मक बदल दिसतो. मुलांच्या यशस्वितेसाठी सर्वच नात्यांची अत्यंत नाजूक गुंफण खूपच महत्वाची असते. चोहीकडून प्रेम मिळणाऱ्या बाळाचा बाळकृष्ण होतो.
०२५३ - २३२२००१
९८२३०५८५२७