Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

व्यापाऱ्याच्या हत्येच्या निषेधार्थ आज पिंपळगाव बंद
प्रतिनिधी / नाशिक

पिंपळगाव बसवंत येथील व्यापारी प्रदीप छाजेड यांच्या हत्या प्रकरणातील संशयितांचा शोध

 

घेऊन त्यांना कठोर शासन करावे या मागणीसाठी स्थानिक व्यापारी संघटनेने उद्या, मंगळवारी पिंपळगाव शहर बंदचे आयोजन केले आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी व्यापाऱ्यांच्यावतीने पोलीस ठाण्यावर मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे.
प्रसिद्ध व्यापारी प्रदीप छाजेड यांच्या हत्या प्रकरणातील कुठलेही धागेदोरे अद्याप पोलीस यंत्रणेच्या हाती लागू शकलेले नाहीत. या घटनेमुळे व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या शुक्रवारी सुरगाणा येथील व्यापाऱ्यांकडे नेहमीप्रमाणे किराणा मालाची वसुली करून छाजेड हे सायंकाळी खासगी वाहनाने पिंपळगाव बसवंतकडे रवाना झाले होते. तथापि, रात्री बारापर्यंत ते घरी न पोहोचल्याने कुटुंबियांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, भ्रमणध्वनी बंद असल्याने संपर्क होवू शकला नाही. त्यानंतर सुरगाणा येथील व्यापाऱ्यांशी संपर्क साधून छाजेड घरी आले नसल्याबाबत माहिती देण्यात आली. सुरगाणा येथील आठ ते दहा व्यापाऱ्यांनी रात्रभर त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. दरम्यानच्या काळात कोठुळा-अलंगूण रस्त्यावर खड्डय़ात एक मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पिंपळगाव बसवंत येथे सोमवारी सकाळी छाजेड यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. छाजेड यांना अन्यत्र मारहाण करून मृतदेह रस्त्यावरील झाडीझुडपात आणल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. निफाड तालुक्याच्या इतिहासात पैशासाठी अपहरण करून व्यापाऱ्याची हत्या करण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.
दरम्यान, छाजेड यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी मंगळवारी दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणातील संशयितांचा तातडीने शोध घ्यावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी म्हसोबा चौकापासून व्यापारी वर्गातर्फे पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढला जाणार आहे. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर, पिंपळगाव बसवंत येथे महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.