Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सर्वसामान्यांना रिव्हॉल्व्हरचा परवाना देण्याची मागणी
नाशिक / प्रतिनिधी

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि स्वतच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी

 

व्यावसायिक, शेतकरी व सर्वसामान्यांना रिव्हॉल्व्हरचे परवाने देण्याची मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी सुरेंद्रनाथ बुरड यांनी केली आहे.
या बाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि पोलीस महासंचालकांना पाठविले आहे. नाशिकसह संपूर्ण राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वर्गणीच्या नावाखाली रस्त्यावर प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवून खंडणीची मागणी केली जाते. दरोडे, चोरी, लूटमार अशा घटना घडत असल्या तरी ग्रामीण व शहरी पोलीस दलात कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. त्यातही त्यांच्या कामात मोठय़ा प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याने ही यंत्रणा ठोस कारवाई करू शकत नाही, असे बुरड यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडल्यास पोलीस बघ्याची भूमिका घेतात, असा आरोपही त्यांनी केला.
पिंपळगाव बसवंत येथील व्यापारी प्रदीप छाजेड यांची हत्या अलिकडेच लूटमारीच्या उद्देशातून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. व्यावसायिक कामासाठी ते नियमित सुरगाण्याला जात असत. गुन्हेगारांनी पाळत ठेवून त्यांची हत्या केली. या घटनेचा सर्वानी निषेध केला आहे. पण केवळ निषेध करून उपयोग होणार नाही तर त्यापासून धडा घेवून अशा घटनांना रोखण्यासाठी काय उपाय करता येतील, यासंदर्भात ठोस पावले उचलली जाणे गरजेचे असल्याचे मत बुरड यांनी व्यक्त केले. लूटमारी व खंडणीसाठी असे प्रकार घडत राहिले तर बाजारपेठेतील व्यवहार ठप्प पडतील. पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. तसेच मालमत्ता व स्वतच्या रक्षणासाठी सर्वसामान्यांना रिव्हॉल्व्हरचा परवाना देणे आवश्यक आहे. असे परवाना दिल्यास पोलीस दलासही मदत होणार आहे. कोणतीही अप्रिय घटना घडल्यास पोलीस दलास पोहोचण्यास विलंब होतो. तोपर्यंत गुन्हेगार गायब झालेला असतो. त्यामुळे नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने अशा परवान्याचे वितरण करणे आवश्यक आहे, याकडे बुरड यांनी लक्ष वेधले.