Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९

रस्ते व अतिक्रमण प्रश्नी पालिका आयुक्तांविरोधात नाराजी
वार्ताहर / जळगाव

शहरातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था व त्याकडे महापालिका प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष तसेच अतिक्रमण हटविण्याची अचानक थंडावलेली मोहीम यामुळे आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्याबद्दल शहर वासियांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील बहुसंख्य रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत गंभीर म्हणावी अशीच आहे. काही प्रमुख मार्ग वगळता शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांना मोठे खड्डे आहेत. शहरातील खराब रस्त्यांमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो आहे. महापालिकेने गेल्या चार वर्षांत तीन वेळा शहरातील प्रमुख १९ रस्त्यांची यादी जाहीर करून ते रस्ते लवकरच चकचकीत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

जादूटोणाविरोधी कायदा निर्मितीप्रक्रियेस वेग देण्याची मागणी
वार्ताहर / धुळे

जादूटोणाविरोधी विधेयक सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या नाकर्तेपणामुळेच गेली दोन वर्षे संयुक्त चिकित्सा समितीकडे पडून आहे, असा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. हंडोरे यांनी आता तरी आपली कार्यक्षमता दाखवून मे महिन्यात संयुक्त चिकित्सा समितीचे काम संपवून अहवाल तातडीने विधीमंडळ अधिवेशनात मांडावा आणि संमत करण्याचा निर्धार दाखवावा, असी मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जादूटोणाविरोधी कायदा विधेयक गेल्या दोन वर्षांपासून अक्षरश: पडून आहे. संयुक्त चिकीत्सा समितीकडे असलेले हे विधेयक अर्थात समितीचा अहवाल विधीमंडळासमोर गेला नाही तर कायदा होण्याचा मार्गच बंद होतो. याबाबत तीव्र नाराजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे.

लाखोंच्या फसवणूक प्रकरणी पतसंस्था अध्यक्षास अटक
वार्ताहर / जळगाव

कर्ज घेतलेले नसताना ते मंजूर दाखवून कर्जदाराची चाळीस लाख रुपयांना फसवणूक केल्याच्या आरोपावरुन येथील बी. एच. आर. अर्थात भाईचंद हिराचंद रायसोनी या जिल्ह्य़ातील एकमेव मल्टी शेडय़ूल्ड व राज्यभर तसेच मध्य प्रदेशातही शाखा असलेल्या पतसंस्थेच्या अध्यक्षांसह एका संचालकाला अटक झाल्याने सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव व नाशिकसह इतरत्र अगोदरच पतसंस्था व सहकारी बँकांबाबत संशयाचे वातावरण असताना या प्रकाराने त्यात भर पडली आहे.

‘विषमतेची चीड असल्याने आंबेडकर समतेसाठी आग्रही’
धुळे / वार्ताहर

बालवयापासून ज्ञानार्जनाचा निसर्गदत्त विलक्षण ध्यास, सामाजिक विषमतेविषयी आत्यंतिक चीड असल्यामुळेच सर्वप्रकारच्या मुक्तीसाठी शिक्षणाची कास धरण्याचा आग्रह करीत डॉ. बाबासाहेब आंबेडरांनी जीवनभर स्वत:ला अस्पृश्यता निवारणार्थ वाहून घेतले. पैगंबरांप्रमाणे सर्वजातीधर्माच्या नागरिकांना समान अधिकार प्रदान करून सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेतून समस्त भारतीयांचे कल्याण साधण्याचे आवाहन त्यांनी केले, असे प्रतिपादन डॉ. इलियास सिद्दीकी यांनी केले.

बेलगंगा साखर कारखान्याच्या तीन संचालकांना अटक
चाळीसगाव / वार्ताहर

गैरव्यवहारांच्या विविध प्रकारांमुळे गाजणाऱ्या येथील बेलगंगा सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या अपहार प्रकरणी पोलिसांनी तीन संचालकांना अटक केली आहे. पोलीस ठाण्यात संपूर्ण संचालक मंडळाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने पोलीस ठाण्यात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे लवकरच विधी विभाग
मनमाड / वार्ताहर

बनावट नोटांच्या संदर्भात रिझव्‍‌र्ह बँकेने ग्राहक आणि व्यापारी यांना बनावट नोट कशी ओळखावी याबाबत सूचना द्याव्यात अशी मागणी करून याबाबत रिझव्‍‌र्ह बँखेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांनी दिले. व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी चेंबर्सतर्फे विधी विभाग सुरू करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.

दिंडोरीतील राजकीय पटलावर आकडेमोडीचा खेळ
वणी / वार्ताहर

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदारांची उदासीनता, मित्रपक्षांची अलिप्तता व उन्हाच्या तीव्रतेमुळे घसरलेली मतदानाची टक्केवारी कोणास किती तारक व मारक ठरेल याबाबत राजकीय पटलावर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून आकडेमोड करण्यात येत असून कोणत्या भागात किती मतदान झाले, त्यानुसार प्रत्येक राजकीय पक्ष निकालाविषयी आपआपला अंदाज वर्तवित आहे.

मनसेच्या नकारात्मक मतांमुळे मतदानाची टक्केवारी कमी; प्रदेश सरचिटणीसांचा दावा
जळगाव / वार्ताहर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्ह्य़ात प्रथमच नकारात्मक मतदानाचा अधिकार वापरला, त्यामुळेच जिल्ह्य़ातील दोन्ही लोकसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी घसरली, असे सांगतानाच निवडणूक आयोगाने यापुढे नकारात्मक मतदान नोंदविण्याची व्यवस्था मतदान यंत्रावरच करून द्यावी अशी मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी केली आहे. बाविस्कर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार मराठी संस्कृती, मराठी अस्मिता व मराठी बेरोजगार तरुणांच्या हितांसाठी कोणत्याच राजकीय पक्षाच्या उमेदवाराने आश्वासन दिले नाही. जिल्ह्य़ातील पतसंस्थांमध्ये गोरगरीब जनतेचे कोटय़वधी रुपये अडकलेले असताना मनसेशिवाय कोणत्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी ठेवीदारांना मदत केली नाही. याचा विरोध म्हणून मनसेच्या जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी प्रथमच येथे नकारात्मक मतदान केल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्य़ातील ज्या गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले होते, त्यांनी बहिष्कार न टाकता नकारात्मक मतदान करण्याचे आवाहन मनसेतर्फे करण्यात आले होते. त्यालाही लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे बाविस्कर यांनी पत्रकात म्हटले आहे.