Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
भवताल

पावसाच्या अंदाजाचे गौडबंगाल
या वर्षी देशात ९६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेतर्फे जाहीर करण्यात आला. तो कदाचित खरा ठरेलसुद्धा, पण या अंदाजाचा शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरंच अर्थ काय आणि त्याचा उपयोग किती? हा अंदाज खरा ठरला तर देश म्हणून दुष्काळाचे सावट नसेल हे खरे, पण सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या लेखी या अंदाजाचे महत्त्व किती? खरं सांगायचं तर विदर्भातील यवतमाळ जिल्हय़ातील त्रस्त शेतकऱ्यांसाठी, नाशिकच्या सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी किंवा सातारा, सांगली व सोलापूर जिल्हय़ांच्या सीमेवरील माणदेशासारख्या अतिशय कमी पावसाच्या प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी या अंदाजाचा काडीमात्र उपयोग नाही. कारण देशात किती पाऊस पडतो, याच्याशी वेगवेगळय़ा भागांत पडणाऱ्या पावसाचे विशिष्ट असे नाते नाही. त्यामुळेच देशात सरासरीइतका किंवा समाधानकारक पाऊस पडला, तरी तो महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या वेगवेगळय़ा भागांत (जसे उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ, वऱ्हाड- पश्चिम विदर्भ) त्याचे प्रमाण चांगले असेलच असे नाही.

विजेची ‘किंमत’
महाराष्ट्राला कायम भेडसावणारी वीजटंचाईची समस्या सोडविण्यासाठी प्रामुख्याने कोळशावर आधारित औष्णिक वीजप्रकल्प प्रस्तावित आहेत. ग्लोबल वॉर्मिगच्या समस्येवर उपाययोजना म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्यास इतर देश सांगत आहेत. एरवी सर्रास त्यांचे अंधानुकरण करणाऱ्या आम्ही याबाबतीत मात्र नेमके दुसऱ्या टोकाचे पाऊल उचलले आहे! महाराष्ट्राला वीजपुरवठा करण्यासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या केवळ तीन जिल्हय़ांमध्ये १९ हजारांहून अधिक मेगावॉट क्षमतेचे वीजनिर्मिती प्रकल्प सध्या वेगवेगळय़ा टप्प्यांत आहेत. त्यामध्ये जवळपास १५ हजार मेगावॉटचे आठ औष्णिक वीजप्रकल्प, तीन हजार मेगावॉटचा अणुवीज प्रकल्प आणि सुमारे एक हजार मेगावॉटचा गॅसवर आधारित वीजप्रकल्पाचा समावेश आहे.

वणवा आणि जाणिवा
डोंगरदऱ्या, जंगल हे प्रत्येकाचेच सामान्य आकर्षण असते. डोंगरी परिसरातील गावातील जीवन, आदिवासी संस्कृती, जंगलसंपत्ती सर्वकाही भुरळ घालते. उंच कडय़ाकपारीत- शिखरावर दैवत असेल तर मग पाहायलाच नको. पश्चिम घाटातील सहय़ाद्रीच्या रांगा याला अपवाद नाही. अहमदनगर जिल्हय़ातील संगमनेर व अकोले तालुके पश्चिम घाटात मोडतात. महाराष्ट्रातील सर्वोच्च शैल कळसुबाई (समुद्रसपाटीपासून उंची १६४६ मीटर) याच अकोले तालुक्यात. कळसुबाईप्रमाणे अलंग, कुलंग, मलंग, रतन, हरिश्चंद्रगड, तारामती, रोहिदास या दुर्गोत्तमाची शृंखला याच परिसरात आहे. शेखरूसाठीचे मोठे अभयारण्य येथे आहे. हिंदू महादेव कोळी व ठाकर या आदिवासी जमाती येथील दऱ्याखोऱ्यांत मागील कित्येक पिढय़ांपासून गाव-वाडी, वस्तीत राहतात. शेती व जंगलआधारित त्यांची उपजीविका आहे. संगमनेरस्थित लोकपंचायत या सेवाभावी संस्थेने आदिवासी व जंगल या विषयावर समूहांसोबत काम सुरू केले आहे. अकाष्ठ (लाकडाशिवाय) वनउपज आधारित उपजीविका, जंगल आदिवासीसंबंधी विविध कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न, सहभागीय वनसंवर्धन अशा नानाविध मार्गानी काम सुरू आहे. त्यामुळे हा सर्व परिसर जवळून समजून घेता येण्याची अनायासे संधी मिळतच असते.