Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९

मुहूर्त साधून सोन्याची लूट !
सराफी बाजारात उत्सवी वातावरण; सोन्याच्या दरातही वाढ

पुणे, २७ एप्रिल/ प्रतिनिधी

साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षयतृतीयेला आज पुणेकरांनी शतकानुशतके चालू असलेल्या प्रथा-परंपरेनुसार मुहूर्तावर सोने खरेदी केली. सराफ बाजारात सायंकाळच्या वेळात एकच गर्दी झाली होती. २४ कॅरेट सोन्याचा दराने (१० ग्रॅमसाठी) १५ हजाराचा टप्पा आज पार केला असला तरी ग्राहकांनी त्याची पर्वा न करता सोने खरेदी केली. ग्राहकांमध्ये उत्साह जाणवत असला तरी मंदीचा थोडा परिणाम खरेदीवर दिसून आला.

‘उच्चशिक्षितांची उदासीनता हा अधिक चिंतेचा विषय’
मतदारराजा का रुसला ?

मतदान कमी झाले हा चिंतेचा मुद्दा आहेच; पण सुशिक्षित, उच्चशिक्षित मतदारांचे मतदानाचे प्रमाण सातत्याने घटत आहे हा अधिक चिंतेचा विषय आहे, असे मला वाटते. मतदानाच्या दिवशी माझ्या भागातील मतदार मतदानासाठी घराबाहेर पडतील यासाठीची कार्यकर्त्यांची यंत्रणा मी अतिशय प्रभावीरीत्या राबवली आणि त्याचा परिणाम म्हणून माझ्या भागात समाधानकारक मतदान झाले. पण गुंठेवारीने झालेली घरे आणि झोपडपट्टय़ा या भागातील मतदारच मतदानासाठी बाहेर पडले, हा अनुभव आला. सुशिक्षित, उच्चशिक्षित, सोसायटय़ातील मतदार अजिबात घराबाहेर पडले नाहीत. त्यांचे मतदानाचे प्रमाण वीस ते पंचवीस टक्के इतकेच राहिले.

मतदारांना आवाहन
पुणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल हा जेवढा औत्सुक्याचा आणि चर्चेचा विषय झाला आहे, तेवढाच पुण्यातील मतदानाचे घटते प्रमाण हाही चर्चेचा विषय ठरला आहे. ‘विद्येच्या माहेरघरा’तील केवळ ४० टक्के मतदारांनाच मतदानाचा हक्क बजावावासा वाटला, ही राजकीय पक्षांसाठी धोक्याचीच घंटा म्हणावी लागेल. मतदारांमध्ये हे औदासीन्य का आले आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘लोकसत्ता’ करत आहे. ज्या मतदारांनी मतदान केले वा ज्यांनी काही ना काही कारणाने केले नाही वा ज्यांना मतदान करता आले नाही, अशांनी त्यांचे मत सुमारे दीडशे शब्दांत लिहून ‘लोकसत्ता’ कार्यालयाकडे पाठवावे. आपला अनुभव/आपले परखड मत वा आपल्या सूचना असे लेखन ४ मे पर्यंत पुढील पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
निवासी संपादक,
दै. लोकसत्ता, ३/११ अरोरा टॉवर्स, मोलेदिना पथ, पुणे- ४११ ००१.

फ्रेंड्स म्युझिक सेंटरचे संस्थापक बाळासाहेब केतकर यांचे निधन
पुणे, २७ एप्रिल/प्रतिनिधी
फ्रेंड्स म्युझिक सेंटरचे संस्थापक प्रभाकर गोपाळ ऊर्फ बाळासाहेब केतकर (वय ७९) यांचे काल रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. केतकर यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. केतकर यांचा जन्म बार्शीमधला. बार्शी आणि विदर्भातील एलिचपूर येथे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पुण्यात आले. येथील कुसरो वाडिया आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्यांनी वायरलेस तंत्रज्ञान, विद्युत उपकरणे, तसेच रेडिओ देखभाल आणि दुरुस्तीविषयक अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर १९५२ मध्ये त्यांनी फ्रेंड्स म्युझिक सेंटर हे दुकान सुरू केले.

ऐन उन्हाळ्यात विजेचा खेळखंडोबा
पुणे, २७ एप्रिल/ प्रतिनिधी

मागील आठवडय़ापासून ‘महावितरण’च्या वीज वितरण व्यवस्थेत निर्माण होत असलेल्या बिघाडामुळे शहरातील विविध भागामध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. आजही शहरातील दोन उपकेंद्रांमध्ये बिघाड झाल्याने शहरातील बहुतांश भागातील वीजयंत्रणा कोलमडून पडली होती. ऐन उन्हाळ्यात वीजकपातीबरोबरच यंत्रणेतील बिघाडामुळे वीज गायब होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. काही भागामध्ये रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा होऊ शकला नाही.

सांस्कृतिक वैभवाचं संचित
मुकुंद संगोराम

बाळासाहेब केतकरांनी १९५२ साली टिळक रस्त्यावर फ्रेंड्स म्युझिक सेंटर सुरू केलं, तेव्हा आकाशवाणीचं पुणे केंद्रही सुरू झालेलं नव्हतं. संगीत ही तेव्हा एक अप्रूप असणारी गोष्ट होती. ट्रान्झिस्टर यायचे होते आणि घरोघरी रेडिओही फार संख्येनं नव्हते. घरात ग्रामोफोन किंवा रेकॉर्ड प्लेअर हे यंत्र असणं म्हणजे आपण श्रीमंत आहोत, हे सिद्ध करण्यासारखं होतं. संगीताचं व्यवसायात रूपांतर होण्याच्या काही काळ आधीच बाळासाहेबांना त्याची कुणकुण लागली होती आणि त्यांनी तेव्हाच आपलं दुकान थाटलं. दिसायला हे दुकान होतं संगीताचं दुकान.

पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करणाऱ्या तरुणाला अटक
पुणे, २७ एप्रिल/प्रतिनिधी

शिवाजीनगर गोदामातील मतपेटय़ांच्या सुरक्षिततेकरिता नेमण्यात आलेल्या बंदोबस्तातील पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी एका तरूणाला अटक करण्यात आली. जुना तोफखाना येथे काल पहाटे एकच्या सुमारास ही घटना घडली. सतीश भिमा काळे (वय ३२, रा. राजीव गांधीनगर झोपडपट्टी, जुना तोफखाना) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे.

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर आंबा खरेदी
मंचर, २७ एप्रिल/वार्ताहर

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांनी आज आंब्याची खरेदी केली. १४० ते १७५ रुपये डझन असा आंब्यास बाजारभाव असल्याने आंबा खरेदी करणे सर्वसामान्य नागरिकांच्या काहीसे आवाक्याबाहेर दिसत होते. पंधरा दिवसांपूर्वी आंबा बाजारात विक्रीसाठी आला आहे. सुरुवातीपासून आंब्याचे बाजारभाव कडाडलेले होते. अक्षयतृतीयेनिमित्त नागरिकांनी आंब्याची खरेदी केली. देवगड, राजापुरी, रत्नागिरी हापूस आदी जातींचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. एक डझन आंबे खरेदी करण्यासाठी १४० ते १७५ रुपये ग्राहकांना मोजावे लागत होते, त्यामुळे आंबे खरेदी करणे सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर होते.

जादूटोणाविरोधी कायद्यासाठी मुख्यमंत्र्यांना आवाहन
पुणे, २७ एप्रिल/प्रतिनिधी
एक जून रोजी सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्य सरकारने जादूटोणाविरोधी कायदा सम्मत करावा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केले आहे. दाभोळकर म्हणाले की, सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडारे यांच्या नाकर्तेपणामुळे जादूटोणाविरोधी कायद्याचे विधेयक संयुक्त चिकीत्सा समितीकडे दोन वर्षे पडून आहे. समितीचा अहवाल विधीमंडळासमोर गेला नाही, तर कायदा होण्याचा मार्गच बंद होईल. यानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शिष्टमंडळ व मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली आहे.

‘जाणता राजा’ची लोणावळ्यात तयारी सुरू
लोणावळा, २७ एप्रिल/वार्ताहर
लोणावळ्यातील ‘शिवदुर्ग मित्र’ ट्रेकिंग अँड अ‍ॅडव्हेंचर क्लब यांच्या वतीने दि. ७ ते १२ मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘जामता राजा’ या महानाटय़ासाठी रंगमंच बैठक व्यवस्थेच्या उभारणीचा प्रारंभ शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते आज करणत आला. या महानाटय़ासाठी लोणावळ्यात रेल्वे ग्राऊंड येथे साधारण पन्नास हजार चौरस फूट आकाराचा बंदस्त मंडप व दहा हजार चौरस फूट आकाराचा रंगमंच उभारण्यात येत आहे.
‘जाणता राजा’विषयी सर्वामध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, खोपोली तसेच मावळ तालुक्यातून प्रवेशिका व सन्मानिकांसाठी मोठी मागणी येत आहे.

विजय फटके यांचे निधन
पुणे, २७ एप्रिल/ प्रतिनिधी

नामदेव शिंपी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते व सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी विजय पितांबर फटके (वय ६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन कन्या असा परिवार आहे.

टोल वसुली त्वरित थांबवण्याची मागणी
पुणे, २७ एप्रिल/प्रतिनिधी
राज्यात सर्वत्र खासगी बांधकाम व्यावसायिकांकडून ‘बांधा, कमवा’ या धोरणांतर्गत रस्ते, पूल बांधले जातात. यासाठी वाहनचालक नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून टोलच्या रूपाने भरमसाठ पैसा वसूल केला जात आहे. ही अन्यायकारक टोल वसुली त्वरित थांबवावी, अन्यथा रोड टॅक्सचे पैसे परत करावे, अशी मागणी ऑल इंडिया अ‍ॅन्टी करप्शन कमिटीच्या नॅशनल कनविनर साधना तुरखिया यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. कमिटीच्या वतीने पाठविलेल्या निवेदनात वाहन खरेदीच्या वेळीच १५ वर्षांसाठी रोड टॅक्स वसूल केला जात असल्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे, असे असतानाही टोल टॅक्स घेतला जात आहे. एकाच कारणासाठी दोन प्रकारे पैसे वसूल करून शासन जनतेची लूट करीत आहे, असे मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवृत्त टपाल अधिकारी गोविंद जोशी यांचे निधन
पुणे, २७ एप्रिल/प्रतिनिधी
निवृत्त वरिष्ठ टपाल अधिकारी गोविंद दत्तात्रय जोशी (वय ७१) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
जोशी यांनी बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेतले होते. ते गोखलेनगर हास्यक्लबचे अध्यक्ष होते.

यात्रेसाठी गेलेल्या दाम्पत्याला रेल्वे प्रवासात लुटले
पुणे, २७ एप्रिल/विशेष प्रतिनिधी

‘आमच्या रेल्वेने कुर्डूवाडी सोडले आणि थोडय़ा वेळातच आमची गाडी मध्येच थांबली. आमच्या डब्याच्या खिडक्या उघडय़ा होत्या. बाहेरून अचानक दहा-पंधरा जण आले आणि त्यांनी लुटालूट चालू केली.’ पुण्याहून हैदराबादला यात्रेसाठी खास रेल्वेने जाणारे धनंजय अंबिके सांगत होते. अंबिके आणि त्यांच्या पत्नी प्रांजली हे दोघेजण काल रात्री सव्वानऊच्या सुमारास निघाले. त्यांची रेल्वे कुर्डूवाडीच्या पुढे गेली आणि थोडा वेळ तेथे थांबली. अचानक अंधारातून काहीजण तेथे आले आणि त्यांनी डब्यातील प्रवाशांच्या चीजवस्तू लुटण्यास सुरुवात केली. प्रांजली यांचे दागिने, तसेच पर्समधील तीन हजार रुपये चोरटय़ांच्या हाती लागले.

हुबळी ते सोलापूर विशेष रेल्वे सेवा
पुणे, २७ एप्रिल/प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या वतीने उन्हाळ्यानिमित्त हुबळी ते सोलापूर ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे.मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी वाय. आर. सिंग यांनी पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे

‘बीजे’चे माजी प्राध्यापक डोईफोडे यांचे निधन
पुणे, २७ एप्रिल/खास प्रतिनिधी
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयामधील बायोकेमिस्ट्री विभागातील माजी प्राध्यापक नरहरी गणेश डोईफोडे (वय ८३) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ते असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी ३६ हून अधिक वर्षे काम केले. बायोकेमिस्ट्री शाखेचा विस्तार करण्याच्या कार्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

कामगार मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल नाही
पिंपरी, २७ एप्रिल / प्रतिनिधी

पिंपरी भाटनगर येथील हिंदू स्मशानभूमीची टाकी साफ करताना पडलेल्या कामगाराच्या मृत्यूप्रकरणी आज कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. याप्रकरणी कोणी तक्रारच केली नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. संजय गंगाधर तुरुकमारे (वय ३०, रा. बौद्धनगर, पिंपरी) हा कामगार काल दुपारी पाण्याची टाकी साफ करताना चाळीस फुटावरुन पडून मृत्युमुखी पडला. पाण्याच्या टाकीपर्यंत जाण्याकरिता कोणत्याही उपाययोजना नव्हत्या, तरीदेखील जीव धोक्यामध्ये टाकून तुरुकमारे व त्याचा साथीदार मिलींद डोळस हे इमारतीवर चढल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले होते. मात्र, आज एकही जण तक्रार देण्यास पोलीस ठाण्यात आले नाही. तुरुकमारे यांचे नातेवाईक व ठेकेदार यांच्यामध्ये आर्थिक हितगुज झाल्याने गुन्हा दाखल होण्याची शक्यता नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पाण्यातून वाहात आलेल्या मृत अर्भकाची विल्हेवाट
बेल्हे, २७ एप्रिल/वार्ताहर
आळे (ता. जुन्नर) येथे ज्ञानेश्वरवस्तीकडे जाणाऱ्या परीटधुणी ओढय़ावर कालव्याच्या पाण्यातून वाहात आलेल्या मृत अर्भकाची आळेफाटा पोलिसांनी विल्हेवाट लावली. याबाबत समजलेली माहिती अशी, की शुक्रवारी (दि. २४) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव जोगे कालव्यातून येणाऱ्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांना हे अर्भक दिसले. रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांनी ही माहिती सरपंच दीपक कुऱ्हाडे यांना दिली. त्यांनी ती माहिती आळेफाटा पोलीस मदत केंद्रातील पोलिसांना दिली. त्या वेळी घटनास्थळी भेट देऊन पाण्यात वाहत आलेले मृत अर्भक पोलिसांनी ताब्यात घेतले. अज्ञात व्यक्तीने कालव्याच्या पाण्यात हे अपूर्ण वाढ झालेले अर्भक सोडून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

स्पर्धा परीक्षा आवश्यक
नारायणगाव, २७ एप्रिल/वार्ताहर
ग्रामीण विद्यार्थ्यांची प्रज्ञा शोधण्यासाठी स्पर्धा परीक्षा भावी जीवनाला दिशा देणारी असल्याचे मत जुन्नर तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष प्रा. रतिलाल बाबेल यांनी व्यक्त केले. प्रा. बाबेल म्हणाले की, मानद संचालक प्रा. जी. सी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी जुन्नर तालुक्यात नारायणगाव, जुन्नर, बेल्हे, ओतूर, आळे या केंद्रांवर १०५० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.