Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
क्रीडा

डेक्कन चार्जर्सचा ‘चौकार’
चेन्नई सुपर किंग्जवर सहा विकेट्सनी मात
दरबान, २७ एप्रिल/वृत्तसंस्था
कर्णधार अ‍ॅडॅम गिलख्रिस्टची धुवांधार फलंदाजी (१९ चेंडूंत ४४) व हर्षेल गिब्जच्या ५६ चेंडूंतील ६९ धावा याच्या जोरावर डेक्कन चार्जर्सने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा आज येथे झालेल्या लढतीत सहा विकेट्सनी पराभव केला. डेक्कन चार्जर्सने चार सामन्यांमध्ये चार विजय नोंदवून आपली गुणसंख्या आठवर नेली आहे. डेक्कनने गुणतक्त्यात पहिले स्थानही कायम ठेवले आहे.चेन्नई सुपर किंग्जने डेक्कन चार्जर्सपुढे विजयासाठी १६६ धावांचे उद्दिष्ट ठेवले होते. डेक्कन चार्जर्स संघाने हे उद्दिष्ट १९.२ षटकांत चार गडय़ांच्या मोबदल्यात पार केले.

मुंबई इंडियन्सपुढे कोलकात्याची सपशेल शरणागती
पोर्ट एलिझाबेथ, २७ एप्रिल / वृत्तसंस्था

सचिन तेंडुलकर (६८) व सनथ जयसूर्या (५२) यांनी पहिल्या विकेटसाठी केलेली इंडियन प्रीमियर लीगमधील पहिलीच शतकी भागीदारी आणि झंझावाती फलंदाजी या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने कोलकाता नाइट रायडर्स संघावर ९२ धावांनी मोठा विजय मिळविला. या विजयामुळे मुंबईच्या खात्यात ५ गुण जमा झाले असून संघाने तिसऱ्या क्रमांकावर झेपही घेतली आहे.

अमेरिका, इटली अंतिम फेरीत
फेडरेशन टेनिस

लंडन, २६ एप्रिल/पीटीआय

अमेरिका व इटली यांनी फेडरेशन चषक टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज प्रवेश केला. अंतिम सामना इटलीमध्ये ७ व ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत १७ वेळा विजेतेपद मिळविणाऱ्या अमेरिकेने उपांत्य फेरीत चेक प्रजासत्ताकचा ब्रुनो येथे ३-२ असा पराभव केला. या तुलनेत इटलीने सोपा विजय नोंदविताना रशियावर ४-१ अशी मात केली. गेल्या पाच वर्षांत रशियाने चार वेळा विजेतेपद पटकाविले होते. इटलीने २००६ मध्ये अजिंक्यपद मिळविले होते.

विजेतपदासाठी प्रमुख फलंदाजांनी जबाबदारीने खेळायला हवे- वॉर्न
केपटाऊन, २७ एप्रिल/वृत्तसंस्था

राजस्थान रॉयल्स संघाला विजेतेपद राखायचे असेल तर प्रमुख फलंदाजांनी जबाबदारीने खेळ करायला हवा, असे मत राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार शेन वॉर्न याने व्यक्त केले आहे. किंग्ज पंजाब इलेव्हन संघाकडून रविवारी रात्री २७ धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर पत्रकारांशी बोलताना वॉर्न म्हणाला की, आमच्या प्रमुख फलंदाजांच्या अपयशामुळेच आम्ही किंग्ज पंजाब संघाकडून पराभूत झालो.

पाकिस्तानातले विश्वचषकाचे सामने दुबईमध्ये हलवावेत
कराची, २७ एप्रिल/ पीटीआय

सुरक्षेच्या कारणास्तव २०११ विश्वचषकाचे सामने पाकिस्तानात खेळविण्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नापसंती दर्शविल्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाने हा प्रश्न सोडविण्यासाठी एक नवीन फंडा काढला आहे. पाकि स्तानात होणारे विश्वचषकाचे सामने दुबईमध्ये हलविण्यात यावेत,असा प्रस्ताव पीसीबी आयसीसीपुढे मांडणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे.

दिल्लीचा विजय रथ रोखण्यासाठी राजस्थान रॉयल्स प्रयत्नशील
प्रेटोरिया, २७ एप्रिल/ पीटीआय

गतविजेत्या राजस्थान रॉयल्सला या सत्रात हवे तसे यश मिळालेले दिसत नसून दिल्लीचा विजय रथ रोखण्यासाठी प्रयत्नशील असून विजय साकारल्यास त्यांना सातव्या स्थानावरून चौथ्या क्रमांकावर जाण्याची नामी संधी असेल. विरेंद्र सेहवागच्या नेत्तृत्वाखाली दिल्लीच्या संघाने सर्वच्या सर्व सामने जिंकले असून या सामन्यातही विजयी घौडदौड कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

विश्वचषक संयोजन समितीच्या पुनर्रचनेसाठी आज मुंबईत बैठक; लॉरगॅट यांची उपस्थिती
मुंबई, २७ एप्रिल / क्री. प्र.

२०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या संयोजन समितीच्या महत्त्वाच्या बैठकीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरून लॉरगॅट उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर लॉरगॅट यांची पत्रकार परिषदही होणार आहे. २०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या संयोजन समितीची बैठक भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या स्पर्धेच्या संयोजनातून पाकिस्तानला बाहेर काढण्यात आल्यानंतर या समितीची पुनर्रचना करण्यासाठी ही बैठक होत आहे.एकदिवसाच्या या बैठकीत पाकिस्तानमधील संयोजन समितीच्या मुख्यालयाऐवजी नवे मुख्यालय कुठे असावे, याचीही चर्चा केली जाणार आहे.भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले की, संयोजन समितीची पुनर्रचना व नवे मुख्यालय याविषयी या बैठकीत चर्चा होणार आहे. दोन वर्षांपूर्वी जेव्हा संयोजन समितीची स्थापना झाली तेव्हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रतिनिधीची या समितीचे निमंत्रक म्हणून निवड झाली होती. तसेच मुख्यालय म्हणून लाहोरची निवड करण्यात आली होती.पाकिस्तानात श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून विश्वचषक स्पर्धेचे सहयजमानपद काढून घेण्यात आले होते. त्यामुळे आता २०११चे यजमान म्हणून भारत, श्रीलंका व बांगलादेश हे तीन देश आहेत.

न्यू इंडियाला कॉर्पोरेट ट्वेण्टी-२० चे विजेतेपद
मुंबई, २७ एप्रिल / क्री. प्र.
प्रशांत दळवी, मंगेश दरेकर, फैझल बलवा यांची अष्टपैलू कामगिरी आणि योगेश जानवलेकरची अचूक गोलंदाजी (२३/३) या बळावर न्यू इंडियाने काऊंटी क्रिकेट क्लब आयोजित निमंत्रितांच्या कॉर्पोरेट ट्वेण्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन संघाचे कडवे आव्हान मोडून काढत तीन विकेटस्ने विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनने १३ षटकांत ५ बाद ७८ अशा नाजूक अवस्थेनंतर विष्णू कालरा (२३) व जयंत गुप्ता (२९) यांच्या सहाव्या विकेटसाठी केलेल्या ७३ धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे पाच बाद १४१ धावांची मजल मारली. हे आव्हान स्वीकारून मैदानात उतरलेल्या न्यू इंडियाने कल्पेश सावंत (१६) व फैझल बलवा (२७) यांच्या तिसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची भागी व प्रशांत दळवी (नाबाद २९) व दरेकर (१९) यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या झटपट ३६ धावांच्या भागीने संघाचा विजय निश्चित झाला. स्पर्थेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून न्यू इंडियाच्या फैझल बलवाची (१४९ धावा व ११ बळी) निवड करण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाजीचे पारितोषिक स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेच्या हर्ष आचार्यने (२२२ धावा) तर गोलंदाजीचे पारितोषिक जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या महेश साळवीने (१२ बळी) पटकावले.

कबड्डी: अमरहिंद आणि शिवशक्ती अजिंक्य
मुंबई, २७ एप्रिल / क्री. प्र.
श्री मावळी आयोजित ५८ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात अमरहिंद मंडळाने व महिला गटात मुंबईच्या शिवशक्ती क्रीडा मंडळाने अंतिम विजेतेपद मिळविले. महिला गटात शिवशक्ती क्रीडा मंडळाने विश्वशांती क्रीडा मंडळाचा १६-१२ अशा ४ गुणांनी मात करून अंतिम विजयाचा मान मिळविला. शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या रक्षा नारकरने आपल्या पहिल्या चढाईत गुण मिळवून आपल्या संघाचे खाते उघडले. त्यानंतर गौरी वाडेकर व तेजस्वी शिंदे यांनी अष्टपैलू खेळ करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढविली आणि मध्यंतराला १०-५ अशी पाच गुणांची आघाडी घेतली. मध्यंतरानंतर विश्वशांती क्रीडा मंडळाच्या माधुरी वैतीने एकाच चढाईत तीन गुण मिळवून सामन्यात रंगत निर्माण केली; परंतु अटीतटीच्या प्रसंगी न डगमगता शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या रक्षा नारकर व गौरी वाडेकरने शिस्तबद्ध खेळ करीत आपल्या संघासाठी एक एक गुणांची कमाई करीत शेवटच्या मिनिटापर्यंत आघाडी टिकवून अंतिम विजेतेपद मिळविले.

महापौर चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ १ मेपासून
मुंबई, २७ एप्रिल / क्री. प्र.
बृहन्मुंबई महानगरपालिका पुरस्कृत द्वितीय महापौर चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा एक मे २००९ पासून गोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये विनस चेस अ‍ॅकॅडमीच्या माध्यमाने आयोजित केली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही गोरेगाव स्पोर्ट्स क्लब या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत एकूण १० देशातील ग्रॅण्ड मास्टर, ३५ महिला ग्रॅण्ड मास्टर व आंतरराष्ट्रीय मास्टर सहभागी होत आहेत. १२ लाख रोख रकमेची बक्षिसे असलेली ही देशातील पहिली स्पर्धा आहे. या स्पर्धेची पहिले पारितोषिक पावणेतीन लाखांचे आहे. आतापर्यंत या स्पर्धेत भारत, श्रीलंका, नेपाळ, युक्रेन, अर्मेनिया, रशिया, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, बांगलादेश, तुर्कमेनिस्तान या देशांनी सहभाग घेतला आहे.

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्रेग मॅथ्यूजला शिक्षा
मेलबर्न, २७ एप्रिल/पीटीआय
तिसऱ्यांदा मद्यपानाच्या नशेत मोटार चालविल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ग्रेग मॅथ्यूज याचा वाहन चालविण्याचा परवाना एक वर्षांकरिता रद्द करण्यात आला आहे, तसेच त्याला ७३ डॉलर्स दंड ठोठावण्यात आला आहे. या शिक्षेखेरीज २०० तास सार्वजनिक सेवेकरिता देण्याची शिक्षाही त्याला देण्यात आली असून, त्यामध्ये वाहन चालविण्याच्या २० तासांच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे.