Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९

मतदानाच्या दिवशी पोलिसांच्या मदतीला एनसीसी कॅडेटस्
ठाणे/प्रतिनिधी - मुंबई व ठाण्यात ३० एप्रिल रोजी होणारे मतदान सुरळीत व्हावे व मतदाराला यासाठी सहकार्य करण्यासाठी पोलिसांबरोबर महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)चे जवान मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत. ३० एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणेवर बराच ताण पडतो. मतदान केंद्र व परिसरातील सुरक्षिततेची, शांततेची मुख्य जबाबदारी पोलिसांवर असते. पोलीस यंत्रणा यात गुंतल्याने मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना मतदानासाठी लागणारी मदत करण्यास, त्यांना योग्य माहिती देण्यास पोलीस व शासकीय यंत्रणेला वेळ मिळत नाही.

मतदारांचा मतदानासाठी!
ठाणेकरांचा ‘रोड शो’

ठाणे/प्रतिनिधी : लोकसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून सेलिब्रेटींच्या आणि बडय़ा नेत्यांच्या ‘रोड शो’चे आयोजन केले जात आहे. परंतु मतदारराजा जागा हो, मतदानाचा हक्क बजाव, असे आवाहन करणारा आणि कोणताही राजकीय रंग नसलेल्या ‘रोड शो’चे रविवारी ठाण्यात आयोजन करण्यात आले होते. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. मतदारांनी मतदान का व कशासाठी करावे, याबाबत कोणताच पक्ष जनजागृती करताना दिसत नाही. परिणामी मतदारांमध्ये असलेल्या निरुत्साहाचा मतदानावर परिणाम होतो.

टेम्पोच्या धडकेने वृद्ध ठार
कल्याण/वार्ताहर : मॉर्निंग वॉकचा व्यायाम करण्यासाठी गेलेल्या परमेश्वरलाल भवरीलाल गुप्ता या ज्येष्ठ नागरिकाला टेम्पोने ठोकर दिल्याने ते जागीच ठार झाले, तर त्याचे सहकारी पंकजभाई कारिया गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना संतोषीमाता रोडवर घडली. रामबागेतील रहिवासी परमेश्वरलाल गुप्ता (६९) व त्याचे सहकारी पंकजभाई कारिया (६५) हे सकाळी फिरायला जात असताना संतोषीमाता रोडवर हिंदी हायस्कूलनजीक मागून येणाऱ्या टेम्पो चालकाने मागून जोरदार धडक दिली. त्यात परमेश्वर गुप्ता जागीच ठार झाले, तर कारिया गंभीर अवस्थेत जखमी झाले. टेम्पोचालक फरारी झाला आहे.

वीज नाही तर मत नाही
कळवावासीयांचा निर्धार

ठाणे/प्रतिनिधी - सततच्या वीज भारनियमनामुळे हैराण झालेल्या कळवावासीयांनी आधी वीज द्या, नाही तर मत नाही असा निर्धार केला आहे. कळवा मनीषानगर परिसरातील नागरिकांनी हा निर्धार केला असून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आवाहन त्यांनी राजकीय पक्षांना केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून कळवावासीय वीज भारनियमनाचा सामना करीत आहेत. रोज सकाळी ८.३० ते ११ व दुपारी ३.३० ते ५.४५ इतका वेळ मनीषानगर परिसरात वीज नसते. कळवा विभाग मुंब्रा परिमंडळाशी जोडलेला असल्याने त्याचा फटका कळवावासीयांना बसत आहे. मुंब्रा परिसरात वीजचोरीचे प्रमाण जास्त असून बिले वेळेवर भरली जात नाहीत. त्यामुळे महसुलात तूट येत असल्याचे वीजमंडळाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. कळवा परिसरातील नागरिक वेळेवर बिले भरत असून वीजचोरीचे प्रमाणही कमी आहे. मात्र मुंब्रा व इतर परिसरात होत असलेल्या वीजचोरीची शिक्षा आम्हाला का देता, असा कळवावासीयांचा सवाल आहे. मुंब्रा परिमंडळातून कळवा उपविभाग वेगळा करावा, अशी येथील नागरिकांची जुनी मागणी आहे. सध्याच्या वीज पुरवठय़ात सुधारणा न झाल्यास ३० एप्रिल रोजी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार कळवावासीयांनी केला आहे.

‘आगरी सेनेने समाजाचा विश्वास गमावला’
भिवंडी/वार्ताहर - नावातच जातीचा उल्लेख असणाऱ्या आगरी सेनेने भिवंडीच्या मतदारसंघात बिगर आगरी उमेदवाराला पाठिंबा देऊन आगऱ्यांचा उरलासुरला विश्वास गमावला आहे. यामुळे आगरी सेनेविषयी आगरी समाजातील लोकांच्या मनातल्या श्रद्धेला तडा गेल्याचे ठाणे जिल्हा आगरी विकास मंचचे कार्याध्यक्ष जी.जी. म्हात्रे यांनी म्हटले आहे. कल्याण येथील ओक बागेतील कार्यालयात संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते. समाजातील भांडणतंटे मिटविण्याचे काम करून समाजात एकता निर्माण करण्याचे काम करणारी आगरी सेना समाजाच्या विरोधात बिगर आगरी नेत्याला पाठिंबा देते, हे आगरी माणूस कसा सहन करेल, असा सवाल करून राजाराम साळवी यांनी कुणा एकावर निष्ठा नसल्यानेच आतापर्यंत त्यांनी सपा, बसपा, भाजप, शिवसेना असा प्रवास केला. मात्र या नेत्यांची एकावर निष्ठा नसल्याने त्यांच्यावर समाज कसा निष्ठा ठेवील. साळवींच्या भिवंडीमधील भूमिकेमुळे आगरी समाजाचा विश्वास त्यांनी गमावला आहे, असे म्हात्रे शेवटी म्हणाले. ठाणे जिल्हा आगरी समाज विकास मंचने यावेळी भाजप-सेनेला पाठिंबा दिल्याचे त्यांनी जाहीर केले.

‘कुणबी समाजाच्या नावाने मताचा जोगवा मागणाऱ्यांना धडा शिकवा’
भिवंडी/वार्ताहर - भिवंडी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी, यासाठी भाजप-सेना युतीचे उंबरठे झिजवूनही उमेदवारी मिळाली नाही. अखेर कुणबी कार्ड पुढे करीत उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले विश्वनाथ पाटील समाजाच्या नावाने मते मागण्याचा अपप्रचार करीत आहेत. कुणबी समाजबांधवांची दिशाभूल करून मताचा जोगवा मागणाऱ्या विश्वनाथ पाटील यांना समाजबांधव धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा आमदार किसन कथोरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. स्वत:ला कुणबी सेनाप्रमुख म्हणवून घेणारे विश्वनाथ पाटील हे भिवंडी मतदारसंघात निवडणूक लढवित असून, मतदारांच्या माहितीसाठी एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यात कुणबी समाज विश्वनाथ पाटील यांच्यासाठी एकवटला असल्याचा खोटा अपप्रचार करण्यात येत असल्याची माहिती कथोरे यांनी दिली. विविध पक्षामध्ये कुणबी समाजाचे लोक काम करीत आहेत. मलाही राष्ट्रवादी काँग्रेसनेच आमदार केले आहे. या निवडणुकीत आम्ही जातीचे राजकारण न करता आघाडीचा धर्म पाळूनच काम करू आणि गुडघ्याला बाशिंग बांधून कुणबी समाजाच्या नावाने निवडणूक लढविणाऱ्यांना धडा शिकवूया, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार म.ना. बरोरा, विद्याताई खाडे, गजानन पाटील, आर.सी. पाटील, योगेश पाटील, विनायक धानके कपिल पाटील, आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे आदी उपस्थित होते.