Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
व्यक्तिवेध

मराठी चित्रपटांचे आणि चित्रपटसृष्टीचेही स्वरूप झपाटय़ाने बदलत आहे. कॉर्पोरेट कार्यशैलीचा मराठी चित्रपटसृष्टीतही प्रवेश झाला आहे आणि निर्मिती खर्चाचे आकडे कोटींची वेस ओलांडू लागले आहेत. चित्रपटसृष्टीचा व्यवहार अधिकाधिक व्यवसायाभिमुख होणे ही काळाची गरज असली तरी या प्रक्रियेत अनेकदा ओलावा संपून जातो आणि औपचारिक नातेसंबंधांचे जाळे तयार होते. संकलक एन. एस. वैद्य यांचे निधन म्हणजे जणू चित्रपटसृष्टीच्या एकेकाळच्या कौटुंबिक

 

वातावरणाचा अखेरचा दुवा निखळणेच म्हणावे लागेल. चित्रपटसृष्टी म्हणजे जणू छक्के पंजे करणाऱ्या बनेल लोकांचा गोतावळा असा गैरसमज अनेकांचा असतो. परंतु जेव्हा एन. एस. वैद्य यांच्यासारखी व्यक्ती समोर येते तेव्हा चित्रपटसृष्टीचा एक सज्जन आणि मायाळू चेहरा डोळ्यांपुढे येतो. आपल्या कामात निष्णात असूनही त्याचा गर्व न बाळगता, कोणाला वेठीला न धरता समजूतदारपणे वागणारी माणसे कलेच्या क्षेत्रात क्वचित आढळतात. एन. एस. हे अशांपैकी एक होते. संकलनाच्या जुन्या पद्धतीत त्यांच्या तोडीचा कलावंत सापडणे कठीण आहे. दिग्दर्शकाने चित्रित केलेल्या पसाऱ्यामधून नेमका चित्रपट आकाराला आणण्याची अवघड कामगिरी ते कौशल्याने पार पाडत. अतिशय कमी बोलणारे, शांत स्वभावाचे वैद्य, त्यांच्यासमोर ‘पसरलेल्या’ चित्रपटात कायम बुडून गेलेले असायचे. रामदास फुटाणे यांच्या ‘सामना’ या पहिल्याच चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांचे होते. पटेल यांचाही हा पहिलाच चित्रपट. त्या वेळी जवळपास ५० ते ६० हजार फुटांची फिल्म चित्रित झाली होती. त्यातून सुसंगत अशी १५ हजार फुटांची फिल्म ‘काढण्या’ची जबाबदारी फुटाण्यांनी वैद्यांकडे सोपविली. फुटाणे हे दादा कोंडके यांच्या ‘सोंगाडय़ा’चे निर्मिती व्यवस्थापक होते तेव्हा त्यांनी वैद्यांचे काम पाहिले होते. अर्थातच एन. एस. वैद्यांनीही फुटाणे यांचा विश्वास सार्थ ठरविला आणि ‘सामना’मध्ये लेखक-दिग्दर्शकाला अपेक्षित असलेला प्रभाव आपल्या संकलनातून अधोरेखित केला. निर्माता हा ‘बळीचा बकरा’ आहे, असे समजून उधळपट्टी करणारे, अडवणूक करणारे अनेक जण असतात. वैद्य मात्र सतत दक्ष राहून निर्मात्याचा पैसा कुठे आणि कसा वाचेल याची काळजी घेत असत. संकलनाकडून ते दिग्दर्शनाकडे वळले तेव्हाही त्यांची ही वृत्ती कायम होती. कॅमेऱ्यातून चित्रपट पाहणारे छायाचित्रकार आणि संकलनातून चित्रपटाला आकार देणारे संकलक यांना अनेकदा दिग्दर्शनाचे आव्हान खुणावत असते. वैद्यांनी अण्णासाहेब देऊळगावकरांच्या ‘लेक चालली सासरला’ या चित्रपटाच्या निमित्ताने ते स्वीकारले आणि यशस्वीरीत्या पेलून दाखविले. या चित्रपटाने शशिकलाला दुसऱ्या ‘इनिंग’मध्ये लोकप्रियतेची चव चाखण्याची संधी मिळवून दिली. त्यानंतर वैद्यांनी छगन भुजबळनिर्मित ‘मायबाप’, ‘धाकटी सून’ असे काही इतर चित्रपटही दिग्दर्शित केले. तेही बऱ्यापैकी चालले; परंतु दिग्दर्शक म्हणून कलाटणी देणारा एखादा नवा प्रवाह निर्माण व्हावा इतपत हे चित्रपट प्रभावी नव्हते. वैद्यांनी त्यांच्या चित्रपटांमधून नितीश भारद्वाज, वर्षां उसगावकर असे नवे कलावंत चित्रपटसृष्टीला दिले, तरीही त्यांची खरी ओळख राहिली ती संकलक म्हणूनच. दिग्दर्शक म्हणून ते काम करू लागले त्यानंतरही ते स्वत:ला संकलकाच्या भूमिकेतच प्रामुख्याने पाहत असत. वैद्यांच्या उमेदीचा काळ हा मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चढउतार पाहणारा काळ होता. दादा कोंडकेंचे यश, कौटुंबिक चित्रपटांची लाट, त्यानंतर अशोक सराफ-लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीच्या चित्रपटांचे अतिरेकी पीक. संकलक म्हणून असे सर्व प्रकृतीचे चित्रपट सारख्याच कौशल्याने करीत असताना दिग्दर्शक म्हणून मात्र वैद्य यांनी कायम कौटुंबिक विषय हाताळण्यालाच प्राधान्य दिले. संकलक म्हणून त्यांनी आपल्या मार्गदर्शनात नवे संकलक तयार होतील याचीही खबरदारी घेतली. तंत्र आणि आशयाच्या बाबतीत मराठी चित्रपट आज नव्या वाटेने जाण्याची धडपड करीत असताना जुन्या वाटेवरील वैद्यांसारखे सहकारी अनेकांच्या स्मरणात राहतील. कारण, कला आणि व्यवसायाच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारी माणसे त्या त्या क्षेत्रातला जिव्हाळा राखणारे एक अदृश्य दुवे असतात.