Leading International Marathi News Daily
मंगळवार, २८ एप्रिल २००९
विविध

लाखोंना यमसदनी धाडणाऱ्या क्रूरकर्मा हिटलरच्या छळछावण्या बघून राष्ट्रपती पाटील स्तंभित!
सुनील चावके
ऑस्विट्झ (पोलंड), २७ एप्रिल

जगातील सर्वात विदारक वंशसंहाराचे प्रतीक ठरलेल्या ऑसविट्झ-बिर्केनौ छळछावण्यांना रविवारी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी भेट दिली तेव्हा जर्मनीचा क्रूरकर्मा हुकूमशहा अडॉल्फ हिटलरने दुसऱ्या महायुद्धादरम्यान गाठलेल्या क्रौर्याची परिसीमा पुन्हा ताजी झाली. राष्ट्रपती आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्वच पाहुण्यांना सात दशकांपूर्वी असे काही घडले असेल यावर प्रत्यक्ष डोळ्यांनी बघूनही विश्वास बसत नव्हता. या छळछावण्यांनी उभ्या केलेल्या हिटलरच्या सैतानी मानसिकतेचा चालताबोलता इतिहासाने राष्ट्रपती पाटील स्तंभित झाल्या.

एलटीटीई बंडखोरांवरची कारवाई संपल्याची श्रीलंकेची घोषणा
शस्त्रसंधी नसल्याचा खुलासा
कोलंबो २७ एप्रिल/पीटीआय
श्रीलंकेत तामिळ बंडखोरांविरुद्ध सुरू केलेली कारवाई आता संपली असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. यापुढे युद्धक्षेत्रात हवाई हल्ले थांबवण्यात येत असून कुठलीही जास्त संहारक शस्त्रे वापरली जाणार नाहीत, असे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान एलटीटीई बरोबर सध्या सुरू असलेल्या संघर्षांत दोन्ही बाजूंनी एकप्रकारे समेटाची भूमिका घेतली आहे व आता हल्ले थांबवण्यात येतील असा याचा अर्थ असल्याचे भारताने एका निवेदनात म्हटले आहे. श्रीलंका सरकारने मात्र हा शस्त्रसंधी आहे असा समज करून घेऊ नये असे स्पष्ट केले आहे. दरम्यान भारत सरकारने श्रीलंका संघर्षांमुळे विस्थापित झालेल्या तामिळी नागरिकांच्या पुनर्वसनासाठी १०० कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे.

शिरच्छेद केलेल्या पोलंडच्या भूगर्भशास्त्रज्ञाचा मृतदेह
पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या हवाली..
इस्लामाबाद, २७ एप्रिल/पीटीआय
सुमारे चार महिने ओलिस ठेवण्यात आलेले पोलंडचे भूगर्भशास्त्रज्ञ पिओत्र स्टॅनझाक यांचे शिर धडावेगळे केलेला मृतदेह तालिबानी अतिरेक्यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या हवाली केला. पाकिस्तानातील सार्वजनिक क्षेत्रातल्या तेलकंपनीच्या कामासाठी पोलंड येथील जिओफिजिकिया या कंपनीतर्फे ४२ वर्षीय स्टॅनझाक हे पाकिस्तानात आले असताना त्यांचे पंजाब प्रांतातील अटक येथून गेल्या सप्टेंबर महिन्यात तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण केले होते.

पंतप्रधानांना निवडणूक आयोगाची क्लीन चिट
नवी दिल्ली, २७ एप्रिल/पीटीआय

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेली निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाने फेटाळून लावली. मतांसाठी मुस्लिमांचे तुष्टीकरण करून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार महेश जेठमलानी यांनी दाखल केली होती. निवडणूक उपायुक्त जे.पी. प्रकाश म्हणाले की, पंतप्रधानांच्या भाषणाच्या सीडीमध्ये आयोगाला आक्षेपार्ह असे काही आढळले नाही. महेश जेठमलानी उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. पंतप्रधान डॉ. सिंग यांनी आपल्या मुंबईतील प्रचारसभेत देशातील साधनसामुग्रीवर मुस्लिमांचा पहिला हक्क असल्याचे वक्तव्य केले होते. त्या विरोधात जेठमलानी यांनी तक्रार दाखल केली होती.

डॉक्टरने पत्नी व मेव्हण्याचे हात छाटले
अमृतसर, २७ एप्रिल/पीटीआय

एका डॉक्टरने आपली पत्नी आणि मेव्हण्याचे हात छाटल्याची खळबळजनक घटना अमृतसर जिल्ह्य़ातील पट्टी गावात घडली. हुंडय़ाच्या मुद्दय़ावरून झालेल्या वादानंतर डॉक्टरने या दोघांचे हात छाटले. गुरसाहिब सिंग याचा १० महिन्यांपूर्वी कुलबीर कौरशी विवाह झाला होता. तो आणखी हुंडा मिळावा यासाठी पत्नीचा छळ करत होता. पण हुंडा न मिळाल्याने त्याने शनिवारी आपल्या पत्नीला घराबाहेर नेऊन तिचे हात कापले. त्यानंतर त्याने घरी परत येऊन तेथे असलेल्या आपल्या मेव्हण्याचेही हात छाटले. या दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या सहसचिवांना अटक
चिकमंगळूर, २७ एप्रिल/ पी.टी.आय.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांचे सह सचिव नंदकुमार यांना निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. नंदकुमार यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही पोलिसांनी सांगितले. काँग्रेस, जनता दल (संयुक्त) आणि मार्क्‍सवादी पक्षाने नंदकुमार यांच्याविरुध्द दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नंदकुमार हे उडुप्पी-चिकमगळूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व प्रदेशाध्यक्ष सदानंद गौडा यांना अधिकाधिक मते मिळावीत यासाठी प्रयत्न करत आहेत.

रेल्वेतून फेकल्याने एकाचा मृत्यू
मुझ्झफरनगर, २७ एप्रिल / पी.टी.आय.
धावत्या रेल्वेतून फेकल्याने एका दलित युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बोधपूर रेल्वे स्थानकानजीक रविवारी रात्री घडली. सतीश कुमार असे या युवकाचे नाव असून तो आपल्या बहिणीची भेट घेऊन दिल्ली -सहारनपूर रेल्वेने बधावत जिल्ह्यातील आपल्या गावी परत येत होता. सतीश कुमारला रेल्वेतून फेकणारे कोण होते व हा प्रकार कशामुळे घडला याचा तपास पोलीस करीत आहेत. रेल्वे रुळानजीक पडलेला सतीश कुमारचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी तो पाठविण्यात आला.