Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९

धूमधमाल ‘अप्पू अस्वल्या करी गुदगुल्या’
सुधा करमरकर यांच्या ‘बालरंगभूमी’नं एकेकाळी बालकलाकार व बालप्रेक्षकांच्या काही पिढय़ा घडविल्या. त्यांच्यावर आदर्श संस्कार केले. त्यातून घडलेली आणि आज काका-मामा, आजी-आजोबांच्या पिढीत पदार्पण केलेली प्रौढ मंडळी आपली नातवंडं, पुतणे मंडळी आणि भाचर यांना आपल्या काळातील अप्रतिम बालनाटय़ांची जादू अनुभवायला मिळायला हवी होती, म्हणून उसासत होती. त्यांची ही इच्छा पूर्ण करण्याचं दादरच्या अमर हिंद मंडळानं ठरवलं आणि विनोद हडप लिखित व संतोष पवार दिग्दर्शित ‘अप्पू अस्वल्या करी गुदगुल्या’ या दोन अंकी बालनाटय़ाची व्यावसायिक मूल्यांशी कुठलीही तडजोड न करता पुनश्च एकदा निर्मिती केली आहे. आजच्या मुलांच्या गाणी व नृत्याच्या बदललेल्या आवडीनुसार त्यात काही बदल करण्यात आलेले असले, तरी नाटकाचा मूळ गाभा मात्र कायम ठेवण्यात आलेला आहे. संतोष पवार यांनीही मुलांची मानसिकता ओळखून त्यांच्यातल्या सुप्त गुणांना उठाव देत ‘अप्पू’ची हाताळणी केली आहे. अप्पू नावाचं अस्वल आपला छळ करणाऱ्या मदाऱ्याचा डोळा चुकवून एका घरात शिरतं आणि ते त्या घरातील मुलांचंच नव्हे, तर त्यांच्या आई-वडिलांचं आणि कडक झिम्माकाकूंचंही मन जिंकतं. मदारी त्याला शोधत तिथं येतो तेव्हा ते त्याला दुसरं काम देऊन अप्पूला आपल्या घरातच ठेवून घेतात. त्यानंतर अप्पूच्या नाना करामतींनी जी धमाल उडते, ते म्हणजे हे नाटक होय! मुलांच्या भावविश्वाचा त्यांच्या मानसिकतेत जाऊन यात विचार केलेला आहे. हास्य-विनोदांची बरसात करत नाटक पुढे सरकत असल्यानं बच्चेकंपनी तर त्यात गुंततेच, पण त्यांचे आई-वडीलही नाटकात रंगून जातात. हल्ली बालनाटय़ाच्या नावाखाली सादर होणाऱ्या भंपक बालनाटय़ांच्या पाश्र्वभूमीवर ‘अप्पू अस्वल्या’सारखं एक उत्तम दर्जेदार बालनाटय़ मुलांना उपलब्ध करून दिल्याबद्दल अमर हिंद मंडळाला द्यावेत तितके धन्यवाद कमीच आहेत. यातली मुलं आपल्या वयानुसारच वागता-बोलतात, हे जास्त महत्त्वाचं. दिग्दर्शक संतोष पवार यांनी प्रथमच बालनाटय़ दिग्दर्शित करताना याचं भान राखलेलं आहे. कलाकारांमध्ये सळसळत्या ऊर्जेचा प्रत्यय देण्याची त्यांची खासियत इथंही जाणवते. नेपथ्यासह कुठल्याच बाबतींत बालनाटकात काटकसर केली गेलेली नाही. सिद्धेश काकडे (जक्कू), जुई सावंत (श्रद्धा), चंदन जमदाडे (अप्पू अस्वल), प्रगती रूपजी (झिम्माकाकू), मृणाल चेंबूरकर (आई), पंकज चेंबूरकर (बाबा), अनिकेत वायदंडे (अस्वलवाला), दत्ता सावंत (मंत्रीकाका व जादूगार) यांच्यासह सर्वच कलावंतांची सुंदर कामं केली आहेत. बच्चे कंपनी तर अप्पू अस्वलाच्या चक्क प्रेमातच पडतील. लहानथोर सर्वानीच अवश्य पाहावं असं हे बालनाटय़ आहे.रवींद्र पाथरे