Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९

एक खासदार घरी बसणार
संदीप प्रधान

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात संगीत खुर्चीची एक अनोखी स्पर्धा लागली आहे. दिल्लीत जाण्याकरिता एक खुर्ची ठेवली आहे. त्याकरिता संसदेत पाच वेळा मतदारांनी धाडलेले मोहन रावले आणि मुरली देवरा यांची राजकीय विरासत सांभाळणारे मििलद देवरा संगीताच्या सुरावटीच्या तालावर फेरे घेत आहेत. रावले यांच्या एका पायात दोरी बांधली असून त्याचे दुसरे टोक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या पायाला बांधलेले आहे. मििलद देवरा यांच्याही एका पायाला दोरी बांधली असून त्याचे दुसरे टोक बहुजन समाज पार्टीचे उमेदवार महंमद अली यांच्या पायाला बांधलेले आहे. देवरा यांच्या पायाची दोरी खेचण्याकरिता डॉ. मोना शहा, बँकींग क्षेत्रातील हस्ती मीरा सन्याल याही प्रयत्नशील आहेत. रावले यांना उताणे पाडण्याकरिता बाळा नांदगावकर यांच्याप्रमाणेच अ. भा. सेनेचे अरुण गवळी हेही पडद्याआडून ‘एक धक्का और दो’ असे म्हणत आहेत. अशी ही संगीत खुर्ची मोहन रावले किंवा मििलद देवरा यांच्यापैकी एकाने जिंकली की दुसऱ्या खासदाराला थेट घरी बसावे लागणार आहे.

गायकवाडांपुढचे आव्हान ‘गंभीर’ नाही..
केदार दामले

लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी काँग्रेस पक्षातील तिकिटवाटपाच्या अंतर्गत घडामोडींमुळे दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला होता. विद्यमान खासदार एकनाथ गायकवाड यांनी या मतदारसंघावर दावा केला आणि त्याचवेळी ईशान्य मुंबईतील खासदार गुरुदास कामत यांनीही त्याच मतदारसंघावर दावा केला. या मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी दिल्लीत नेत्यांची आणि समर्थकांची चांगलीच जुंपली होती. अखेर एकनाथ गायकवाड यांनी बाजी मारली. पूर्वीच्या उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात एकच उमेदवार सलग दुसऱ्यांदा निवडून आलेला नाही, अशी या मतदारसंघाची ख्याती होती. हा इतिहास असला तरी आता या मतदारसंघाचा भूगोल बदलला आहे. आता या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचे एकनाथ गायकवाड, शिवसेना-भाजपचे सुरेश गंभीर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या श्वेता परुळकर अशी तिरंगी लढत होणार आहे.

‘माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे?’
केदार शिंदे

आईशप्पथ! परवा रात्री मी हाच विचार पहाटेपर्यंत करीत होतो. माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे?
माझ्या मताला अगदी जन्मापासूनच किंमत शून्य!!
माझ्या मते मी खरंतर टाटा-बिर्ला यांच्या घराण्यात जन्म घ्यायला हवा होता. पण नेम धरून मला लालबाग-परळच्या दहा बाय दहाच्या खोलीत एका मिल कामगाराच्या घरी ब्रह्मदेवाने टाकला. मैदानी खेळांमध्ये ‘गोटय़ा’ खेळताना, त्या रिंगणातली एक बरोबर नेम धरून आपलीशी केल्याचा आनंद तेव्हा ब्रह्मदेवाला झाला असेल. त्या दिवसापासून माझ्या मताला कुत्रंही विचारीत नाही. कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण घ्यावंसं वाटताना, परिस्थितीने म्युनिसिपालटीत टाकलं. कॉलेजमध्ये ती चूक सुधारावी, असं वाटत असताना एका यथातथा कॉलेजमध्ये जावं लागलं. म्हणजे माझ्या मते मी खरं तर पॉश महाविद्यालयात अ‍ॅडमिशन घ्यायला हवं होतं.

दिल्लीच्या राष्ट्रीय निवडणुकीत स्थानिक मुद्देच वरचढ
सुनील चावके

दिल्ली देशाची राजधानी असली तरी येत्या ७ मे रोजी दिल्लीत होणाऱ्या सात लोकसभा मतदारसंघांतील निवडणुकांमध्ये राष्ट्रीय नव्हे तर स्थानिक मुद्देच वरचढ ठरत आहेत. जणुकाही देशाची नव्हे तर महापालिकेची निवडणूक असावी, असा माहोल तयार होत आहे. अनधिकृत वस्त्यांचा विकास, सुमार पायाभूत सुविधा, सीिलगच्या कारवाईविरुद्धचा रोष, वीज व पाणीटंचाई, शाळांमधील भरमसाठ फी वाढ अशा मुद्यांवर सत्ताधारी काँग्रेसला भंडावून सोडण्याची रणनिती भाजपने आखली आहे. स्थानिक मुद्यांवर लढून राजकारणात नाव कमावणाऱ्या उमेदवारांनाच यावेळी भाजपने मैदानात उतरविले आहे. त्यांना राष्ट्रीय मुद्यांवर खेचून नेताना काँग्रेसच्या उमेदवारांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. मुस्लीम आणि दलित मतांवर डोळा ठेवून बसपनेही कोटय़वधींची संपत्ती असलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे.

राष्ट्रवादीची मनसेला आर्थिक मदत
गडकरी यांचा आरोप

मुंबई, २८ एप्रिल/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीतील प्रमुख लढत शिवसेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी यांच्यात आहे. परंतु युतीची मते खराब करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आर्थिक मदत केलेली आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यातील मतदारांनी या सापळ्यात अडकू नये, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज पत्रकार परिषदेत केले. राज्यात युतीला ३५ जागा प्राप्त होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

२६/११ हल्ल्यातील शहीद जवानांचे राष्ट्रीय स्मारक होणार
मुंबई, २८ एप्रिल/प्रतिनिधी

मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर व एनएसजीचा कमांडो संदीप उन्नीकृष्णन यांचे बलिदान भारतीय जनता कदापि विसरू शकणार नाही. मात्र या शहिदांचे मुंबईमध्येच राष्ट्रीय स्तरावर स्मारक होणार असून खा. मिलिंद देवरा यांनी याबाबत केंद्रातील प्रमुख नेत्यांशी सविस्तर चर्चा केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसला विरोध असल्यास मंत्रिपद सोडा
विनय कोरे यांना मुख्यमंत्र्यांनी खडसावले
मुंबई, २८ एप्रिल / खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेल्या चार मतदारसंघांमध्ये जनसुराज्य पक्षाचे उमेदवार उभे करण्याबरोबरच दक्षिण मुंबई मतदारसंघात मनसेला पाठिंबा देण्याच्या अपारंपारिक ऊर्जामंत्री विनय कोरे यांच्या भूमिकेबद्दल मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. मंत्रिपदी राहायचे असल्यास सरकारच्या भूमिकेशी सहमत राहावेच लागेल. अन्यथा मंत्रिमंडळातून बाहेर पडावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. नांदेड व लातूरसह काँग्रेसचे उमेदवार असलेल्या चार मतदारसंघांमध्ये कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत.

अखेर मुख्यमंत्र्यांनी चढविला मोदींवर हल्ला!
मुंबई, २८ एप्रिल / खास प्रतिनिधी

गेले महिनाभर राज्यात ठिकठिकाणी प्रचार सभांमध्ये महाराष्ट्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करून काँग्रेस आघाडीला लक्ष्य करणाऱ्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर देताना जोरदार हल्ला चढविला. विजेचा प्रश्न तसेच गुंतवणुकीबाबत गुजरात सरकार दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. गुजरातमध्ये पुरेशी वीज उपलब्ध असल्याचे मोदी हे वारंवार राज्यातील प्रचार सभांमध्ये सांगतात. मात्र गुजरातमध्ये शेतीला दिवसा फक्त सहा तासच वीज मिळते, असे चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत निदर्शनास आणून दिले. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ चव्हाण यांनी कालच बडोदा व आणंदचा दौरा केला. या पाश्र्वभूमीवर गुजरातमध्ये अखंड वीजपुरवठा होतो, हा मोदी यांचा दावा फोल असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

राणे शिवसेनेवर कडाडले
मुंबई, २८ एप्रिल/प्रतिनिधी

रक्तलांच्छित धनुष्यबाणाला मते देऊन ती व्यर्थ घालवण्यापेक्षा विकास आणि प्रगतीपथावर आरुढ होण्यासाठी हाताच्या पंजाला मते द्या, असे आवाहन उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले. मुंबई उत्तर - पश्चिम मतदारसंघातील मालाडच्या अप्पापाडा येथे झालेल्या जाहीर सभेत राणे यांनी शिवसेनेवर तुफान हल्ला चढविला.ज्यांच्याकडे विकासाचा कोणताही कार्यक्रम नाही, ज्यांना दिल्लीत गेल्यावर गल्लीत वळून बघायचे नाही, त्यांना मतदारांनी का म्हणून निवडून द्यावे, असा सवाल करून राणे म्हणाले की, शिवसेना-भाजपला निवडून द्याल तर मतदार रस्त्यावर येतील. चाकरमानी कोकणवासीयांच्या दिंडोशी भागात आजही अनेक समस्या आहेत. येथे आजही नियमित बससेवा नाही, रस्त्यावर दिवा-बत्तीच्या सोयी नाहीत, सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत, असे सांगून राणे यांनी शिवसेना आमदार कीर्तिकरांनी गेल्या २० वर्षांत दिंडोशीसाठी काय काम केले, असा सवाल केला. काँग्रेसचे उमेदवार गुरुदास कामत यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढत राणे म्हणाले की, चार वेळा ईशान्य मुंबईतून खासदार म्हणून निवडून आलेल्या गुरुदास कामत यांनी ईशान्य मुंबईचा कायापालट घडवून आणला आहे. मुंबईच्या विकासासाठी अनेक प्रकल्प कार्यान्वित करण्यात कामत यांचा सिंहाचा वाटा आहे, असेही राणे म्हणाले.