Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९

देवल क्लबची कीर्ती आता इंटरनेटवर!
कोल्हापूर, २८ एप्रिल / विशेष प्रतिनिधी
गेली १२५ वर्षे संगीत, नृत्य, नाटय़ क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत असणाऱ्या कोल्हापूरच्या सांस्कृतिक जीवनाचे अविभाज्य अंग असणाऱ्या गायन समाज देवल क्लबची सुरेल, सांगीतिक कीर्ती आता वेबसाईटच्या माध्यमातून जगभर पसरणार आहे. क्लबच्या आजवरच्या वाटचालीवर आधारित www.devalclub.org या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. अक्षयतृतीयेच्या पूर्वसंध्येला अजिझुद्दीन खाँसाहेब यांच्या हस्ते या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले.

इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटच्या तारदाळमधील जमीन संपादनास मान्यता
इचलकरंजी, २८ एप्रिल/वार्ताहर

सर्वोच्च न्यायालयाने इचलकरंजी इंडस्ट्रियल को-ऑप. इस्टेटला तारदाळ गावातील ८२ एकर जागा संपादनास आडकाठी केलेली नाही. न्यायालयाने जमीन संपादनाचा दावा मुंबई उच्च न्यायालयात फेरसुनावणीसाठी घेण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती या संस्थेचे अध्यक्ष प्रकाश खंजिरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या निकालाबाबत संस्थेचे हितशत्रू व जमीन खरेदी-विक्रीतील दलाल द्वेषबुद्धीने सभासदांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. पण येत्या तीन महिन्यांत न्यायालयीन व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन संस्थेकडे या जागेचा ताबा येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अहल्या रांगणेकर या क्रांतिकारी समतेच्या भोक्तया - आडम
सोलापूर, २८ एप्रिल/प्रतिनिधी

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी अहल्या रांगणेकर यांनी स्वातंत्र्यलढय़ाबरोबरच विविध मोठय़ा आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. त्या क्रांतिकारी समतेच्या भोक्तया होत्या. त्यांच्या कार्याचा वारसा कार्यकर्त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे माकपचे आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी सांगितले.

दादर-हैदराबाद
एक्स्प्रेसमधील तिघा प्रवाशांना कुर्डूवाडीजवळ लुटले
सोलापूर, २८ एप्रिल/प्रतिनिधी
दादर-हैदराबाद एक्स्प्रेस या हॉलिडे गाडीत प्रवाशांना लुटण्याचा प्रकार कुर्डूवाडीजवळ भाळवणी येथे घडला. यात चोरटय़ांनी तिघा प्रवाशांच्या ताब्यातील सुमारे ९५ हजारांचा ऐवज लांबविल्याचे सांगण्यात आले. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या गुन्ह्य़ाबाबत प्रांजली धनंजय अंबिके (वय २५, रा. भोसरी, पुणे) यांनी सोलापूर रेल्वे पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली असून नंतर हा गुन्हा कुर्डूवाडी रेल्वे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

सांगली महापालिकेच्या तीन प्रभाग सभापतींची बिनविरोध निवड
सांगली, २८ एप्रिल / प्रतिनिधी

सांगली महापालिकेच्या प्रभाग समिती एक वगळता अन्य तीन प्रभाग समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड झाली. याबाबतची औपचारिक घोषणा दि. ३० एप्रिल रोजी होणार आहे. प्रभाग समिती एकमध्ये विरोधी काँग्रेसने अर्ज दाखल केला असला तरी सत्ताधारी विकास महाआघाडीचे संख्याबळ पाहता या समितीच्या सभापतीपदीही सत्ताधारी गटाचीच वर्णी लागणार आहे.

जीवनशांती उद्योग समूहाच्या सात महिला एजंटांना अटक
इचलकरंजी, २८ एप्रिल / वार्ताहर

सोनपरी डॉल फसवणूक प्रकरणी जीवनशांती महिला उद्योग समूहाच्या येथील गंगा गौरी शाखेच्या सात महिला एजंटांना आज गावभाग पोलिसांनी अटक केली.सिंधुताई राजाराम बुरसे (वय ३३), स्वाती प्रकाश वेठे (वय ३४), छाया बबन रानभरे (३८), जयश्री महादेव भदरगे (३५), छाया रामनाथ बुरसे ( वय २८), सरीत रमेश मेस्त्री (वय ३५ व माधवी दिलीप कदम (वय २६ सर्व रा.विकासनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना २ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश येथील प्रथमवर्ग न्यायालयाने दिले आहेत.सव्वाशे महिलांची एकूण पाच लाख पंधरा हजार रूपयांची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर दोन दिवसांपूर्वी गुन्हा नोंद करण्यात आला होता. याबाबत मेघा आनंदा बडवे (वय २४ रा.वर्धमान चौक) यांनी तक्रार दिली होती. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याने फसवणुकीला बळी पडलेल्या महिलांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून आत्मदहनाचा इशारा दिला होता. जीवनशांती महिला उद्योग समूहाचा सर्वेसर्वा आनंद मलगुंडे याच्यावरही याच पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

कराडनजीक दोन गटात धुमश्चक्री;१८ जखमी, २२ अटकेत
कराड, २८ एप्रिल/वार्ताहर
शिवजयंती मिरवणुकीदरम्यान प्रार्थनास्थळासमोर डॉल्बी वाजवू नये, या किरकोळ कारणावरून वाघेरी (ता. कराड) येथे दोन गटात झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे पर्यवसान काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तुंबळ हाणामारीत झाले. लाठय़ा-काठय़ा, लोखंडी गज व दगडफेकीच्या साह्य़ाने झालेल्या या एक तासाच्या धुमश्चक्रीत दोन्ही बाजूचे १८ जण जखमी झाले आहेत.या प्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, दोन्ही गटातील ७४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या २२ जणांना अटक केली आहे.गंगाराम शिवाजी डांगे (वय ३१) यांनी ३४ जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे, तर अल्ली पटेल यांनी ४० जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

लग्नाच्या जेवणातून ४७ जणांना विषबाधा
सातारा, २८ एप्रिल/प्रतिनिधी
कोयना खोऱ्यातील दुर्गम भागातील आंधारी (ता. जावली) येथील लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने ४७ ग्रामस्थांना उलटय़ा- जुलाब झाल्याने त्यांच्यावर बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्र व सातारा येथील डॉ. प्रशांत पन्हाळकर यांच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.आंधारी गावचे रघुनाथ शेलार यांचे चिरंजीव नवनाथ यांचे अलवडी येथील वैशाली नामदेव सुर्वे या मुलीशी विवाह झाला. लग्नात भात-शिरा, बटाटा भाजीचे जेवण होते. ते खाल्ल्यानंतर वऱ्हाड आंधारी येथे परत आल्यानंतर त्यातील ४७ जणांना थंडी-ताप जुलाब, उलटय़ा सुरू झाल्याने त्यांना तातडीने कोयना शिवसागर जलाशयाच्या काठी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ३५ तर श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते डॉ. प्रशांत पन्हाळकर यांच्या सातारा येथील रुग्णालयात १२ बाधितांना दाखल करण्यात आले आहे.

१ मे पासून १० दिवसांसाठी ‘सोलापूर मेला-२००९’
सोलापूर, २८ एप्रिल/प्रतिनिधी

उन्हाळी सुट्टीनिमित्त सोलापुरात १ मे ते १० मेपर्यंत नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर ‘सोलापूर मेला-२००९’ चे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध वस्तू व साहित्याच्या प्रदर्शन व विक्रीसह सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत स्पर्धा होणार आहेत. या मेळ्यामध्ये अनेक ग्राहकोपयोगी वस्तू व साहित्य प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध होणार असून यात इलेक्रॉनिक्स उपकरणे, रेडिमेड गारमेंट्स, ड्रेस मटेरियल, इमिनेशन ज्वेलरी, हेल्थ प्रॉडक्ट्स,अन्न पदार्थ, चायना माल, बांधकाम साहित्य, शेती अवजारे, शैक्षणिक साहित्य आदींचा समावेश राहणार आहे. याबाबतची माहिती संयोजक राज दावरे व जहूर अहमद इंडीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रदर्शनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यापारी व उद्योजकांनी राज दावरे (९८५००९९४९७), जहूर इंडीकर (९९६०३४५२८५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

साताऱ्यात ५ मेपासून वन्यप्राणी प्रगणना अभयारण्य पर्यटनास बंदी
सातारा, २८ एप्रिल/प्रतिनिधी
यावर्षी येत्या ५ ते ९ मे या कालावधीत वन्यप्राणी व व्याघ्र गणना देशपातळीवर राबविण्यात येणार आहे. त्याकरिता या कालावधीमध्ये सर्व वनक्षेत्रे, अभयारण्ये व व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. वन्य प्राणी गणना मोहिमेतील लोकांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तींना प्रवेश बंदी असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक प्रदीप पाटणकर यांनी दिली.कोयना अभयारण्यातील (कोयना व बामणोली परिक्षेत्र) वन्यप्राणी गणनेसाठी ४ ते १० मे पर्यंत सलगरित्या योगदान देऊ इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. इच्छुकांनी १ मे पूर्वी भ्रमणध्वनी क्रमांक ९४२२०३९४८३ अथवा वनक्षेत्रपाल कोयना क्र. ९४२२६०७३३३ वर संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्रदीप पाटणकर यांनी केले आहे. कोयना अभयारण्यातील कोयना, बामणोली, मेटइंदवली, वासोटा नागेश्वर या पर्यटन क्षेत्रात ४ मे रोजी सूर्योदयापासून १० मे रोजी सूर्यास्तापर्यंत नागरिकांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. वन्यप्राणी व व्याघ्र प्रगणना कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक नागरिक व पर्यटन व्यावसायिकांनी आपले अभयारण्यातील पर्यटन व प्रवेशासंबंधीचे सर्व व्यवहार बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन कोयना अभयारण्य प्रशासनाने केले आहे.

शाहूवाडी तालुक्यात केळी उत्पादनावर भर
शाहूवाडी, २८ एप्रिल / वार्ताहर
शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर-पश्चिम भागात केळी उत्पादनाकडे शेतकरी मोठय़ा प्रमाणात वळल्याचे चित्र असून इतर पिकांच्या तुलनेत केळी पीक अधिक उत्पादन देत असल्यानेच शेतकरी वर्गास या पिकाने भुरळ घातली आहे. शाहूवाडी तालुक्यात वारणा, कानसा, खोरा वगळता बारमाही पाण्याची व्यवस्था नाही. जवळपास अर्धाअधिक तालुका पाण्यापासून वंचित आहे. शेतीसाठी सोडाच पण येथे पिण्याच्या पाण्याचीही मोठी भ्रांत आहे. वारणा व कानसा खोऱ्यातील सोंडोली, गोंडोली, शित्तूरतर्फ वारूण, विरळे, जांबूर, कांडवण, आदी गावातील शेतकरी केळी पिकाकडे वळल्याचे चित्र आहे. खरे तर ऊस आणि भात हीच दोन पारंपारिक पिके या परिसरात घेतली जातात पण अलीकडील दोन वर्षांत प्रायोगिक तत्वावरील शेती याही परिसरात करण्यात येवू लागली आहे. ऊस पिकाची, दराची अनिश्चितता यामुळे पर्यायी चार पैसे अधिक मिळवून देणारे पीक म्हणून केळीकडे शेतकरीवर्ग वळला आहे.

डॉ. थोरात यांच्या संशोधनास ११ लाखांचे अनुदान मंजूर
सोलापूर, २८ एप्रिल/प्रतिनिधी
बार्शी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रपाठक डॉ. प्रकाश थोरात यांच्या संशोधन प्रकल्पासाठी नवी दिल्ली केंद्रीय विद्यापीठ आयोगाकडून ११ लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे. सोलापूर विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागासाठी आतापर्यंत मिळालेल्या अनुदानामध्ये डॉ. थोरात यांना मिळालेले हे सर्वाधिक अनुदान समजले जाते. कापड गिरण्यांमधून बाहेर पडणाऱ्या रंगीत व प्रदूषित पाण्यातील विविध जीवाणू वापरुन विघटन करण्याबाबत डॉ. थोरात यांनी संशोधन प्रकल्प हाती घेतला असून त्यासाठी विद्यापीठ आयोगाने ११ लाखांचे अनुदान मंजूर केले आहे. कापड गिरण्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे निर्माण होणारे प्रदूषण टाळण्यासाठी डॉ. थोरात यांचा संशोधन प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

‘बीएआय’ सोलापूर शाखेच्या अध्यक्षपदी अजय अन्नलदास
सोलापूर, २८ एप्रिल/प्रतिनिधी

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) सोलापूर शाखेच्या अध्यक्षपदाची सूत्रे अजय अन्नलदास यांनी तर मानद सचिवपदाची सूत्रे अरविंद जाधव यांनी स्वीकारली. न्यू रेल्वे ऑडिटोरिअममध्ये पुणे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार आणि बीएआयचे सरचिटणीस आनंद गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे मावळते अध्यक्ष टी. एस. नय्यर यांनी स्वागत केले. अविनाश बच्चुवार यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. या सोहळ्यात शिरीष गोडबोले (उपाध्यक्ष), व्यंकटेश कोटा (सहसचिव), कांतिलाल नय्यर (कोषाध्यक्ष) व अन्य पदाधिकाऱ्यांनी पदग्रहण केले. यावेळी पवार, गुप्ता यांच्यासह मल्लेश कावळे यांनी शुभेच्छापर भाषणे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे. जे. कुलकर्णी यांनी तर आभारप्रदर्शन गोडबोले यांनी केले. या कार्यक्रमास दत्ता सुरवसे, किशोर चंडक, पी. एम. हर्षे, अशोक गांधी, बाबूभाई मेहता, विलास पाटील आदी उपस्थित होते.