Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९

अंबानी हेलिकॉप्टर कट : साक्षीदाराचा गूढ मृत्यू
मुंबई, २८ एप्रिल / प्रतिनिधी

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमधील इंधन टाकीत चिखल आणि दगड भरले आहेत, ही बाब उघडकीस आणणारा ‘एअर वर्क्‍स इंडिया इंजिनिअरींग प्रा. लि.’ कंपनीचा तंत्रज्ञ भरत बोरगे याचा मृतदेह आज सकाळी विलेपार्ले रेल्वे फाटकात आढळून आला. प्रथमदर्शनी हा अपघाती मृत्यू असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी त्याचा मृत्यू ही हत्या, आत्महत्या की अपघात याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्याने या मृत्यूचे गूढ अधिकाधिक गडद होत चालले आहे. बोरगे हा अंबानी हेलिकॉप्टर प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या या खळबळजनक प्रकाराला बोरगे याच्या गूढ मृत्यूमुळे वेगळे वळण मिळाले आहे.

कसाब ‘बच्चा’ नाही!
मुंबई, २८ एप्रिल / प्रतिनिधी
पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याने अल्पवयीन असल्याचा केलेला दावा त्याच्या दातांच्या आणि हाडांच्या घेण्यात आलेल्या चाचणी अहवालाने सपशेल फोल ठरविला. दात आणि हाडांच्या चाचणीतून कसाबचे वय २० वर्षांपेक्षा जास्त असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले असून हा अहवाल आज अभियोग पक्षाने विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांच्याकडे सादर केला. आपण साडेसतरा वर्षांचे असून आपल्यावर चालविण्यात येणारा खटला ‘ज्युविनाईल’ न्यायालयात वर्ग करावा, अशी मागणी कसाबने त्याच्यासाठी वकील नियुक्त केल्यावर लगेचच करून खटल्याला वेगळे वळण दिले होते. परंतु न्यायालयाने ‘तो २० वर्षांपेक्षा कमी वयाचा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नाही’, असे सांगून त्याची मागणी फेटाळून लावली होती.

‘स्वाइन फ्लू’च्या साथीमुळे मेक्सिकोत १४९ जणांचा मृत्यू
मेक्सिको सिटी, २८ एप्रिल/ए.पी.

मेक्सिको देशामध्ये ‘स्वाइन फ्ल्यू’ या नव्या रोगाचा प्रादुर्भाव आणि साथीमुळे हाहा:कार उडाला असून या साथीमध्ये आतापर्यंत १४९ जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या साथीची दखल घेतली असून गेल्या ४० वर्षांंमधील ही फ्ल्यू रोगाची सर्वाधिक भीषण साथ असल्याचे म्हटले आहे. मात्र जागतिक स्तरावर अद्याप रेड अॅलर्टची घोषणा या संघटनेकडून झालेली नाही. अमेरिका आणि युरोप तसेच ऑस्ट्रेलियामध्येही स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण मोठय़ा प्रमाणावर आढळले असून जपानने आपल्या नागरिकांसाठी मेक्सिकोमध्ये न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. गोव्यामध्येही ५०० ब्रिटिश नागरिकांची या रोगाच्या लागणीसंदर्भात चाचणी घेण्यात आली.

तालिबानविरोधात पाकिस्तानी लष्कराची धडक कारवाई; ७० अतिरेकी ठार
इस्लामाबाद, २८ एप्रिल/पीटीआय

पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तान सरहद्दीलगतच्या भागात तालिबानी अतिरेक्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून त्यात ७० अतिरेकी ठार झाले आहेत. बुनेर व अन्य भागांवरील आपला कब्जा तालिबान्यांनी सोडावा अन्यथा त्यांना अधिक कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशाराही लष्कराने दिला आहे.
पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रेहमान मलिक यांनी सांगितले की, मूठभर अतिरेक्यांनी दिलेले आव्हान आम्ही खपवून घेणार नाही. शरियत लागू करण्यावरून तालिबान्यांपुढे नमते घेणाऱ्या सरकारने जागतिक दबाव व विशेषत: अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर हा कठोर पवित्रा घेतला आहे.

प्रचाराला पूर्णविराम!
मुंबई,२८ एप्रिल/ खास प्रतिनिधी
मुंबई, ठाणे आणि कोकणात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार आज सायंकाळी पाच वाजता पूर्णविराम घेता झाला. मात्र त्यापूर्वी दहा लोकसभा मतदारसंघात आपले नशिब आजमावत असलेल्या विविध पक्षांच्या उमेदवारांनी रोड शो, पदयात्रांचा अखेरचा धडाका उडवून देत मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. दादरमध्ये आज राज ठाकरे यांचा रोड शो गाजला. दक्षिण मध्य मुंबईतील मनसेच्या उमेदवार श्वेता परुळकर यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे दुपारी माहीम ते वरळीपर्यंत काढण्यात आलेल्या जंगी रॅलीत सामील झाले होते. जवळपास ३०० मोटरबाईक, ६० गाडय़ा आणि हजारो कार्यकर्ते राज यांच्या दक्षिण मध्य मुंबईतील रॅलीमध्ये सामील झाले होते. मनसेखेरीज शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार आणि नेत्यांनी शहरभरात रॅली काढल्या. बसपाचे उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार भाईजान यांच्या प्रचारासाठी ‘हत्तीं’ची रॅली काढण्यात आली. कृत्रिम हत्तींच्या या मिरवणुकीला कुर्ला बैलबाजार, जरीमरी आदी सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला.उत्तर मुंबई मतदारसंघात राम नाईक यांच्यापुढे आव्हान उभे केलेले मनसेचे उमेदवार शिरीष पारकर यांना डबेवाला संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. पारकर यांना चित्रपट व साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पाठिंबा जाहीर करणारी पत्रके काढली आहेत. अभिनेता संजय मोने, संजय नार्वेकर, भरत जाधव, सचिन खेडेकर, स्वप्नील बांदोडकर, आदेश बांदेकर, पंडित उपेंद्र भट, उत्तरा केळकर आणि पद्मजा फेणाणी यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनसेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मुंबईतील वडार समाजाची संख्या सुमारे साडेचार लाख एवढी असून अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेने लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

अमेरिकेत पुन्हा घबराट
वॉशिंग्टन, २८ एप्रिल / पी.टी.आय.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या ताफ्यातील एक विमान संरक्षण कवचासह घोंघावत न्यूयॉर्क शहरावरुन कमी उंचीवरुन गेल्याने सर्वत्र एकच घबराट उडाली. मोठा आवाज करीत तीन विमाने एकाचवेळी शहारवरुन घोंघावत गेल्याने ९-११ सारखी परिस्थीती निर्माण झाली की काय अशी घबराट नागरिकांमध्ये काही काळ पसरली. दरम्यान या घटनेची तातडीने दखल घेत व्हाईट हाऊसने या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली. व्हाईट हाऊसमधील लष्करी अधिकाऱ्यांचे प्रवक्ते लुईस क्लारेडा यांनी या घडनेबाबत खुलासा करताना सांगितले की अध्यक्षांच्या ताफ्यातील हे विमान न्यूयॉर्क तसेच न्यूजर्सी या दोन शहरांवरुन कमी उंचीवरुन नेण्यात आले. या विमानासोबत त्याचे संरक्षण करणारी दोन विमाने होती. या दोन्ही शहरांची काही छायाचित्रे यावेळी काढण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव ही छायाचित्रे काढण्यात येणार होती. पण याची पूर्वकल्पना या दोन्ही राज्यात देण्यात आली नव्हती. अशी घटना भविष्यात घडणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असेही क्लारेडा यांनी सांगितले.

‘स्वाईन फ्लू’ : प्रवाशांची विमानतळावर तपासणी
मुंबई, २८ एप्रिल / प्रतिनिधी

अमेरिका, कॅनडा व मेक्सिकोखेरीज जगभरातील आणखी काही देशांमध्ये घातक ‘स्वाईन फ्लू’च्या साथीने धुमाकूळ घातला आहे. या पाश्र्वभूमीवर परदेशांतून येणाऱ्या मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या सर्व प्रवाशांची आजपासून वैद्यकीय तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. विदेशातून आलेल्या प्रवाशांची विमानतळावरून बाहेर पडण्यापूर्वी तपासणी करण्यात येणार आहे. विमानतळाच्या आरोग्य कार्यालयाने त्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे. एखाद्या रुग्णाला स्वाईन फ्लूचा संसर्ग झाल्याचे आढळून आल्यास, त्याला या रुममध्ये हलविले जाईल. तेथे एक रुग्णवाहिका तैनात ठेवली असून, तिच्यातून संसर्ग झालेल्या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात हलविले जाईल, अशी माहिती ‘एमएआयएल’चे प्रवक्ते मनिष कलगट्टी यांनी दिली.

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या दिशेने चप्पल भिरकावली
चेन्नारायापटना, २८ एप्रिल/पीटीआय
कर्नाटकचे मुख्यमंत्री व भाजपनेते बी.एस.येडीयुरप्पा यांच्या प्रचारसभेत आज एकाने त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावली, पण ती त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. पोलिसांनी सांगितले की, चंद्रशेखर नावाच्या व्यक्तीने हे कृत्य केले. त्याला लगेचच अटक करण्यात आली. येडीयुरप्पा हे त्यांच्या सभेत जनता दल सेक्युलरचे प्रमुख एच.डी.देवेगौडा यांनी भाजपला सत्ता हस्तांतरित न करता कसा विश्वासघात केला याबाबत टीका करीत असताना चंद्रशेखर याला त्यांचा संताप आला व त्या भरात त्याने येडीयुरप्पा यांच्या दिशेने स्लीपर फेकली, पण ती त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. चंद्रशेखर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो हासन जिल्ह्य़ातील कोडीहळ्ळी गावचा असून, त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. राजकीय नेत्यांच्या दिशेने चपला भिरकावण्याचे हे प्रकार थांबले पाहिजेत, असे सांगून येडीयुरप्पा यांनी या घटनेचा निषेध केला.

नेपाळ सीमेवरील स्फोटात तीन जखमी
काठमांडू, २८ एप्रिल / पीटीआय
भारत-नेपाळ सीमेवर एका सशस्त्र टोळीने अंदाधुंद गोळीबार करीत घडविलेल्या बॉम्बस्फोटात तीन नागरिक जखमी झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. भारत-नेपाळ सीमाभागातील बिरगंज येथील म्हाबिर चौकानजीक ही घटना घडली. येथील नागरी वस्तीवर सशस्त्र टोळीने बॉम्ब हल्ला केला. ही टोळी भारतातून आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
प्रत्येक शुक्रवारी