Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९

संकट पाणीटंचाईचे
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आपत्कालीन कृतिआराखडा
औरंगाबाद, २८ एप्रिल/प्रतिनिधी
शहराला पुढील दोन महिने पुरेसा आणि वेळेवर पाणीपुरवठा व्हावा यासाठी एक आपत्कालीन कृतिआराखडा आज जाहीर करण्यात आला. वेळेवर पाणी मिळावे यासाठी काही भागांना टँकरने पाणी देण्याचे ठरविण्यात आले. कमी मिळेल पण वेळेवर पाणी मिळेल, अशी ग्वाही देण्यात आली असून ‘पाणी मिळेल, ते मिळवा आणि जरा जपूनच वापरा’, असे आवाहन महापौर विजया रहाटकर यांनी केले. शहराच्या पाणीपुरवठय़ामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनागोंदी चालू आहे. काही भागांना दोन दिवसाआड आणि तेही कमी दाबाने पाणी मिळत होते. यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या.

जलसाठे कोरडे, पाणीटंचाईची झळ
परभणी, २८ एप्रिल/वार्ताहर

सर्वाग भाजून काढणाऱ्या उन्हाच्या झळांनी सध्या परभणीकर हैराण असून यंदाचा उन्हाळा अतिशय खडतर असा जात आहे. भर दुपारी तर रस्ते निर्मनुष्य होत असून, उन्हाचा हा असह्य़ तडाखा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बहुतांशी जलसाठे कोरडे पडले असून, पाणीटंचाई वाढत आहे. सकाळी १० वाजताच ऊन्ह तापू लागले आहे. दुपारी वाढत्या उन्हाने डांबरी सडकांवर तर अक्षरश: आगीच्याच ज्वाळा धावत असल्याचा भास होत आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, तो ४४ अंशांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या तीन-चार दिवसांत उन्हाचा तडाखा आणखी वाढला असून यंदाचा उन्हाळा सर्वासाठीच बेचैन करणारा ठरला आहे.

जालना जिल्ह्य़ातील ३०० गावांसमोर
पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न
जालना, २८ एप्रिल/वार्ताहर
जिल्ह्य़ातील जवळपास ३०० गावांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. टँकरने आणि खासगी विहिरी ताब्यात घेऊन या गावांना पाणीपुरवठा करण्याचे काम संबंधित यंत्रणेने सुरू केले आहे. जाफराबाद तालुक्यातील १०२ गावांपैकी बहुतेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. पाच गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कुंभारी, पिंपळखुटा इत्यादी गावांमध्ये महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. परतूर तालुक्यात ब्राह्मणवाडी, सिंगोना, वलखेड, पांडेपोखरी व ढोकमाळ तांडा या पाच गावांत पाण्याची तीव्र टंचाई असून तेथे टँकर सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

निवडणूक प्रचाराचे वादळ
पंधराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. निवडणुकीचे दोन टप्पे यापूर्वीच पूर्ण झालेले असून उर्वरित तीन टप्पे येत्या १३ मे २००९ रोजीपावेतो पूर्ण होणार आहे. पंधराव्या लोकसभा निवडणुकीचे खास वैशिष्टय़ म्हणजे वेगवेगळ्या पक्षांच्या प्रचाराचा दर्जा अतिशय खालच्या पातळीवर पोहोचलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारमोहिमेत सर्वच पक्षांतर्फे अतिशय खालच्या पातळीवरून व्यक्तिगत स्वरूपाची टीका होत असल्याचे दिसून येते. वास्तविक लोकसभा निवडणुकीचा प्रचार देशाची ध्येय-धोरणे आणि राष्ट्रीय प्रश्नांशी संबंधित असणे अपेक्षित आहे.

पोलीस संरक्षण देणे हेतूत: टाळले - ओम राजे
उस्मानाबाद, २८ एप्रिल/वार्ताहर

लोकसभेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वारंवार पोलीस संरक्षणाची मागणी करूनही ते जाणीवपूर्वक दिले जात नसल्याचा आरोप (कै.) पवन राजेनिंबाळकर यांचे चिरंजीव ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आज केला. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘ए. टी. एम.’मधून कालबाह्य़ नोटा?
स्टेट बँकेच्या अरेरावीचा निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला अनुभव
औरंगाबाद, २८ एप्रिल/प्रतिनिधी
भारतीय स्टेट बँकेच्या ‘ऑटोमॅटिक टेलर मशिन’मधून (ए. टी. एम.) कालबाह्य़ नोटा मिळाल्याचा खळबळजनक प्रकार आज समोर आला. या कालबाह्य़ नोटा स्वीकारण्यास नंतर स्टेट बँकेनेच नकार दिला आणि पुन्हा ग्राहकाशी अरेरावीची भाषा केली. निवृत्त अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीनिवास तांदळे यांनाच हा अनुभव आला. श्री. तांदळे यांनी आज सकाळी स्टेट बँकेच्या दशमेशनगर येथील ए. टी. एम. केंद्रातून पैसे काढले.

संजय जोशी अखेर झाले सभापती
सहा प्रभाग सभापतींची निवड
औरंगाबाद, २८ एप्रिल/प्रतिनिधी
औरंगाबाद पालिकेच्या सहा प्रभाग समितीच्या सभापतींची आज निवड झाली. ड प्रभागाचा अपवाद वगळता उर्वरित पाच प्रभागांमध्ये बिनविरोध निवडणूक झाली. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय जोशी यांना पक्षाने फ प्रभागातून उमेदवारी दिली होती. गेल्या दोन निवडणुकीत सभापतिपदाच्या वेळी पराभूत झालेले जोशी यावेळी मात्र बिनविरोध विजयी झाले.

रिक्षा कालव्यात पडून मुलाचा मृत्यू; चौघे बेपत्ता
गेवराई, २८ एप्रिल/वार्ताहर

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन चाललेली रिक्षा जायकवाडी कालव्यात उलटून एक मुलगा मृत्युमुखी पडला. दोन महिला व दोन मुले वाहून गेले असून, त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. सहा प्रवाशांना वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. तालुक्यातील जातेगावजळ आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत युवराज विष्णू चव्हाण याचा बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह रात्री सापडला. गंगूबाई रामेश्वर पवार, आशा विष्णू राठोड यांच्यासह दोन मुले बेपत्ता आहेत. तालुक्यातील खुपटी तांडा येथील काही भाविक तलवाडा येथे देवीच्या दर्शनासाठी गेले होते. तेथून ते रिक्षाने गावी परतत होते. या रिक्षामध्ये एकूण ११ प्रवासी होते, असे सांगण्यात आले. त्यात लहान मुले व महिलांचा समावेश होता. जातेगाव येथील यमाईदेवीच्या मंदिराजवळ जायकवाडीच्या कालव्यात ही रिक्षा उलटली. वाहून गेलेल्या चौघांचा शोध चालू आहे. आजूबाजूच्या गावकऱ्यांनी धावपळ करून सहा जणांना सुखरूप बाहेर काढले.

आणखी एका बालकाचा गॅस्ट्रोने मृत्यू;
४८ जणांना लागण
लोहा, २८ एप्रिल/वार्ताहर
तालुक्यातील शेवडी, शेवडी तांडा व पेनूर येथे गॅस्ट्रोची लागण झालेल्या ४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गॅस्ट्रोमुळे यापूर्वी दोन बालके दगावली तर रविवारी पेनूर येथील आणखी एका बालकाचा मृत्यू झालो. गॅस्ट्रोमुळे आतापर्यंत तीन बालके दगावली आहेत. शीतल शिवप्रसाद आरके (वय ७, पेनूर) याचे रविवारी निधन झाल्याचे आरोग्य खात्याने सांगितले. यापूर्वी सोनू राठोड व बसवेश्वर आरके या बालकांचा गॅस्ट्रोमुळे मृत्यू झाला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एन. एम. बोराडे म्हणाले की, शेवडी येथे २३ तर पेनूर येथे २५ अशा ४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शेवडी, शेवडी तांडा, पेनूर येथे वैद्यकीय पथक तळ ठोकून आहे. रुग्ण येत असले तरी साथ आटोक्यात येत आहे. तसेच जनतेने घाबरू नये आणि उघडय़ावरील अन्नपदार्थ, रस्त्यावरील शीतपेये टाळावीत.

फरारी दरोडेखोर जेरबंद
परभणी, २८ एप्रिल/वार्ताहर
शेतातील आखाडय़ाची लूट करून पाच वर्षांपासून फरारी असलेला अट्टल दरोडेखोर उत्तम सुंदर पवार (वाघाळा) यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने पाथरी येथे सापळा रचून पकडले. पाथरी येथील भास्कर विठोबा चिचाणे यांच्या शेतातील आखाडय़ावर ११ डिसेंबर २००४ रोजी दरोडा पडला. या गुन्ह्य़ातील आरोपी उत्तम पवार फरारी होता. माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी पाथरीतील बांधरवाडा रस्त्यावर असलेल्या पवार याच्या घरावर छापा टाकला. उत्तमने भिंतीवरून उडी मारून पळ काढला. पोलिसांनी त्याचा दोन किलोमीटर पाठलाग करून त्याला पकडले.

रेशनचा गहू मोंढय़ात विक्रीला?
हिंगोली, २८ एप्रिल/वार्ताहर
सेनगाव तालुक्यातील मकोडी येथील एका शेतकऱ्याने चक्क आपल्या गव्हाच्या पोत्यासोबत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील चार पोती गहू मोंढय़ात विक्रीला आणल्याने एकच खळबळ उडाली. नायब तहसीलदार व त्यांचे सहकारी तपासाच्या निमित्ताने मोंढय़ात धावले. उशिरापर्यंत मात्र कारवाई झाली नव्हती. केवळ गव्हाचा नमुना काढून पुढील प्रक्रिया चालू होती. दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना वापरासाठी रेशनच्या दुकानचा गहू मकोडी येथील शेतकरी मधुकर थिटे यांनी आपल्या गव्हाच्या पोत्यासोबत चार पोते मोंढय़ात अाज सेनगावच्या बाजार समितीत आणल्याची माहिती मकोळी येथील काही लोकांनी तहसील कार्यालयात दिली. ही माहिती मिळताच नायब तहसीलदार ए. एस. छडीदार, पुरवठा लिपीक एम. एम. बोथीकर यांनी बाजार समितीला भेट देऊन त्या गव्हाचा नमुना तपासकामासाठी घेतला.

तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
औरंगाबाद, २८ एप्रिल/प्रतिनिधी

कन्नड तालुक्यातील संजय लक्ष्मण मोकासे (३५, रा. शाकीपूर) या तरुण शेतकऱ्याने काल विषप्राशन करून आत्महत्या केली. काल (सोमवारी ) सायंकाळी त्यांनी शेतामध्ये विष प्राशन केले होते. नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांना तातडीने पिशोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. तेथून रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रात्री दहा वाजता त्यांचा मृत्यू झाला.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरही आंब्याचे भाव चढेच
परळी वैजनाथ, २८ एप्रिल/वार्ताहर

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आंब्यांचे वाढलेले भाव नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविणारे ठरले आहेत. आंब्याचे गगनाला भिडलेले भाव यामुळे लोकांना आमरसाशिवाय अक्षय्यतृतीयेचा सण साजरा करावा लागला. दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नागरिक आंब्याचा रस करून सुरुवात करतात; परंतु या वर्षी गावरान आंब्याचे उत्पादनच झाले नसल्याने बाजारात आंबा उपलब्ध झाला नाही. यावर्षी गावरान आंबा बाजारात आलेलाच नाही. जो काही आंबा बाजारात उपलब्ध झाला आहे त्याचे भाव हे केवळ श्रीमंतांनाच परवडणारे आहेत. सर्वसामान्य लोकांना मात्र हे भाव खिश्याला परवडणारे नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांना यावर्षी विना आमरसाची अक्षय्यतृतीया साजरी करावी लागली आहे.गावरान आंब्याचे भाव १५० ते २०० रुपये डझन झाले आहेत. दरवर्षीपेक्षा दसपटीने हे भाव वाढले असून बाजारात गावरान आंबाही फारच कमी प्रमाणात उपलब्ध झाला आहे. त्यामुळे काही लोकांनी संकरित आंब्याचा रस करून अक्षय्यतृतीया सण साजरा केला. यावर्षी अक्षय्यतृतीया आमरसाविनाच साजरी करावी लागली.