Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कसाब ‘बच्चा’ नाही!
मुंबई, २८ एप्रिल / प्रतिनिधी

 

पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याने अल्पवयीन असल्याचा केलेला दावा त्याच्या दातांच्या आणि हाडांच्या घेण्यात आलेल्या चाचणी अहवालाने सपशेल फोल ठरविला. दात आणि हाडांच्या चाचणीतून कसाबचे वय २० वर्षांपेक्षा जास्त असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले असून हा अहवाल आज अभियोग पक्षाने विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांच्याकडे सादर केला. आपण साडेसतरा वर्षांचे असून आपल्यावर चालविण्यात येणारा खटला ‘ज्युविनाईल’ न्यायालयात वर्ग करावा, अशी मागणी कसाबने त्याच्यासाठी वकील नियुक्त केल्यावर लगेचच करून खटल्याला वेगळे वळण दिले होते. परंतु न्यायालयाने ‘तो २० वर्षांपेक्षा कमी वयाचा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नाही’, असे सांगून त्याची मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर अभियोग पक्षाने कसाबच्या वयाचा मुद्दा कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी त्याच्या दात आणि हाडांच्या चाचणी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. ही मागणी न्यायालयाने मान्य होती. त्यानुसार २७ एप्रिल रोजी रेडिओलॉजिस्ट आणि न्यायवैद्यक दंतचिकित्सकांकडून त्याच्या दात आणि हाडांची चाचणी करण्यात आली. आज त्याचा अहवाल अभियोग पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात सादर केला. जे. जे. रुग्णालयाच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमधील न्यायवैद्यक औषध विभागाचे डॉ. एस. डी. नंदनकर यांच्या नेतृत्त्वाखाली चार डॉक्टर्सनी कसाबची शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी केली. अहवालात नमूद केल्याप्रमाणे त्याच्या दातांच्या चाचणीत दातांची, खालच्या जबडय़ाची आणि त्याला अक्कलदाढा आल्या आहेत की नाही याची चाचणी करण्यात आली. त्याचबरबरोबर त्याचे कोपर, छाती आणि खांद्याचे एक्स-रे काढून त्याच्या हाडांची वाढ कितपत झाली आहे याची तपासणी केली गेली. या चाचणींनुसार त्याची हाडे पूर्णपणे विकसित झालेली असून तीन अक्कलदाढा आल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या दोन्ही चाचण्यांच्या आधारेच डॉ. नंदनकर आणि त्यांच्या सहाकाऱ्यांनी अहवालात कसाबचे वय हे २० वर्षांपेक्षा जास्त असल्याचे नमूद केले आहे. तत्पूर्वी, अभियोग पक्षातर्फे आर्थर रोड तुरूंग अधीक्षक स्वाती साठे आणि कसाबची पहिल्यांदा वैद्यकीय तपासणी करणारे नायर रुग्णालयाचे निवासी डॉक्टर वेंकटरमण मूर्ती यांची साक्ष आज नोंदविण्यात आली. या वेळी स्वाती साठे यांनी कसाबला आर्थर रोड तुरूंगात दाखल करण्यात आल्यावर त्याने दिलेल्या माहितीचा तपशील न्यायालयासमोर सादर केला. त्या म्हणाल्या की, कसाबला आर्थर रोड तुरूंगात दाखल करतेवेळी त्याने त्याचे वय २१ वर्षे असल्याचे तसेच त्याचा जन्म १३ सप्टेंबर १९८७ साली झाल्याचे सांगितले होते. तशी नोंदही तुरूंग नियमांप्रमाणे करण्यात आल्याची कागदपत्रे न्यायालयात सादर केली. तर डॉ. मूर्ती यांनी साक्षीमध्ये, २६/११च्या मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कसाबला रुग्णालयात आणले होते. त्याच्या दोन्ही हातांना गोळी लागली होती. पण त्याही स्थितीत तो शुद्धीत आणि बोलण्याच्या स्थितीत होता. त्याच्यावर उपचार केल्यानंतर दोन तासांनी रुग्णविषयक कागदपत्रे भरताना त्याने त्याचे नाव मोहम्मद अजमल अमीर कसाब, तर वय २१ वर्षे असल्याचे सांगितल्याचे डॉ. मूर्ती यांनी न्यायालयाला सांगितले.
दरम्यान, उद्या डॉ. नंदनकर यांच्यासह नायर रुग्णालयाच्या दोन डॉक्टरची साक्ष नोंदविण्यात येणार आहे.