Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘स्वाइन फ्लू’च्या साथीमुळे मेक्सिकोत १४९ जणांचा मृत्यू
मेक्सिको सिटी, २८ एप्रिल/ए.पी.

 

मेक्सिको देशामध्ये ‘स्वाइन फ्ल्यू’ या नव्या रोगाचा प्रादुर्भाव आणि साथीमुळे हाहा:कार उडाला असून या साथीमध्ये आतापर्यंत १४९ जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या साथीची दखल घेतली असून गेल्या ४० वर्षांंमधील ही फ्ल्यू रोगाची सर्वाधिक भीषण साथ असल्याचे म्हटले आहे. मात्र जागतिक स्तरावर अद्याप रेड अॅलर्टची घोषणा या संघटनेकडून झालेली नाही. अमेरिका आणि युरोप तसेच ऑस्ट्रेलियामध्येही स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण मोठय़ा प्रमाणावर आढळले असून जपानने आपल्या नागरिकांसाठी मेक्सिकोमध्ये न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. गोव्यामध्येही ५०० ब्रिटिश नागरिकांची या रोगाच्या लागणीसंदर्भात चाचणी घेण्यात आली.
आतापर्यंत मेक्सिको या देशामध्येच या रोगाचे बळी पडले असले तरी अमेरिकेतही या रोगाचे ४० रुग्ण आढळून आले असून न्यूयॉर्क शहरात २० रुग्ण सापडले आहेत. न्यूयॉर्कच्या शाळेत या रोगाचे आठ रुग्ण आढळून आले. डुकरापासून बनविण्यात आलेल्या मांसाचे सेवन केल्यामुळे स्वाइन फ्ल्यूची लागण होत नसली तरी अनेक देशांनी अमेरिकेमधून आयात करण्यात येणाऱ्या डुकराच्या मांसावर बंदी लागू केली आहे. मेक्सिकोचा पर्यटन व्यवसायही प्रचंड अडचणीत आला असून अनेकांनी तेथील विमान कंपन्यांची तिकीटे रद्द करावयास सुरुवात केली आहे. मेक्सिको सिटी या राजधानीच्या शहरातील येशु ख्रिस्ताच्या पुतळ्यासमोर अनेक नागरिकांनी प्रार्थना करून आपल्याला या महाभयंकर साथीपासून संरक्षण देण्याची प्रार्थना केली आहे.
युरोपमध्ये स्पेन हा स्पाइन फ्ल्यूचा रुग्ण सापडणारा पहिला देश ठरला. मेक्सिकोच्या दौऱ्यावरून तेथे आलेल्या एका प्रवाशाच्या शरीरात या रोगाचे जंतू आढळले. मेक्सिकोच्या सीमेनजीकच्या अमेरिकेतील टेक्सास या राज्याच्या आरोग्य विभागानेही तेथील शाळेत स्वाइन फ्ल्यूचा तिसरा रुग्ण सापडल्याचे जाहीर केले. कॅलिफोर्निया राज्यानेही ११ रुग्ण सापडल्याचे म्हटले आहे. मेक्सिकोचे आरोग्य मंत्री जोस अॅन्गेल कोडरेवा यांनी या रोगाच्या साथीत १४९ नागरिक दगावल्याचे मान्य केले असून आणखी काही बळी पडण्याची भीती व्यक्त केली आहे. जे नागरिक मरण पावले आहेत ते २० ते ५० या वयोगटातील आहेत. स्पाइन फ्ल्यूचा विषाणू श्वसनयंत्रणेद्वारे हवेत पसरतो आणि अ जातीचा हा विषाणू डुकरांमध्ये अधिकतर आढळतो. माणसाचे खोकणे व शिंकणे यातून पुन्हा तो वेगाने पसरतो. मानवी शरीरात स्पाइन फ्ल्यूचे विषाणू वेगाने पसरत असून त्यावर अद्याप औषध न सापडल्याने जागतिक स्तरावर येत्या काही दिवसांत या साथीमुळे मोठी खळबळ उडण्याचा धोका आहे.

आढळलेले रुग्ण
मेक्सिको : २००, अमेरिका : ४० स्पेन : १ , कॅनडा : ६
ब्रिटन : २ इस्राइल, पेरू, ब्राझील, ऑस्ट्रेलिया कोरियात संशयित रुग्ण.

काय आहे स्वाइन फ्लू ?
बर्ड फ्लू पसरवणाऱ्या H5N1 गटातील H1N1 विषाणू. श्वसनयंत्रणेद्वारे हवेत तो पसरतो . डुकरांमध्ये अधिकतर आढळतो. खोकणे व शिंकणे यातून वेगाने पसरतो.

जगापुढील आव्हान
या साथीने मेक्सिकोत २० ते ५० वयोगटातील १४९ नागरिक दगावले . यावर औषध नसल्याने काही दिवसांत जगात खळबळ उडण्याचा धोका आहे.