Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

तालिबानविरोधात पाकिस्तानी लष्कराची धडक कारवाई; ७० अतिरेकी ठार
इस्लामाबाद, २८ एप्रिल/पीटीआय

 

पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तान सरहद्दीलगतच्या भागात तालिबानी अतिरेक्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून त्यात ७० अतिरेकी ठार झाले आहेत. बुनेर व अन्य भागांवरील आपला कब्जा तालिबान्यांनी सोडावा अन्यथा त्यांना अधिक कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशाराही लष्कराने दिला आहे.
पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रेहमान मलिक यांनी सांगितले की, मूठभर अतिरेक्यांनी दिलेले आव्हान आम्ही खपवून घेणार नाही. शरियत लागू करण्यावरून तालिबान्यांपुढे नमते घेणाऱ्या सरकारने जागतिक दबाव व विशेषत: अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर हा कठोर पवित्रा घेतला आहे. इस्लामाबादपासून अवघ्या १०० किलोमीटरवर असलेल्या बुनेरमध्ये तालिबान्यांनी वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर ओबामा प्रशासनाने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. अतिरेक्यांचा हा प्रसार आम्हाला मान्य नाही आणि तो खपवून घेणार नाही, असे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी स्पष्ट केले होते.
विशेष म्हणजे मलिक यांना कालच कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, बुनेर आणि अन्य भागांतून तालिबान्यांना माघार घ्यावीच लागेल. नाहक जीवितहानी होऊ नये यासाठी आजवर आम्ही संयम बाळगून लष्करी कारवाई टाळत होतो मात्र देशाच्या स्थैर्याचा बळी कोणत्याही परिस्थितीत दिला जाणार नाही. ज्या भागांत फुटीर कारवाया सुरू आहेत तिथे पंतप्रधानांनी डायलॉग, डेव्हलपमेंट आणि डिटरन्स (संवाद, विकास आणि लष्करी स्वयंसज्जता) असा ‘थ्री-डी’ कार्यक्रम आखला आहे. बंडखोरांशी संवाद साधावा, विकासाला चालना द्यावी आणि तसे होऊनही फुटीर कारवाया सुरू राहिल्यास लष्करी कारवाईने त्या मोडून काढाव्यात, यावर सरकार ठाम आहे, असे ते म्हणाले.
पाकिस्तानातील आण्विक प्रकल्पांच्या सुरक्षिततेबद्दलची भीती अनाठायी असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पांवर अतिरेकी ताबा मिळवूच शकत नाहीत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
वायव्य सरहद्द प्रांतातील दिर भागात लष्करी कारवाई अधिक व्यापक करण्यात आली आहे. अतिरेक्यांनी दूरध्वनी केंद्र, पोलीस चौक्या व अन्य महत्त्वाच्या स्थानांवर कब्जा केल्यानंतर सरकारने धडक कारवाईचा निर्णय घेतला. काल्पानी आणि अकाखेलदरा पर्वतराजींमध्ये हेलिकॉप्टरमधून अतिरेक्यांच्या अड्डय़ांवर हवाई हल्ले चढवित लष्कराने ७० अतिरेक्यांना टिपून काढले. या अड्डय़ांवरील अद्ययावत शस्त्रसाठा व स्फोटकेही हस्तगत करण्यात आली आहेत.
दिरमधील चकमकींनी उग्र रूप धारण केल्याने अनेक खेडी व गावांतील ३० हजार लोकांनी सुरक्षिततेसाठी राजधानी पेशावर तसेच अन्य शहरांकडे धाव घेतली आहे. तालिबानी आणि सरकारमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावत असलेल्या ‘तहरिक ए निफाज़्‍ा ए शरिया महम्मदी’ या कडव्या संघटनेने या कारवाईचा निषेध म्हणून त्रिपक्षीय चर्चेतून काल अंग काढून घेतले.

ब्राऊन यांच्यावर झरदारींचा बहिष्कार!
ब्रिटनमध्ये एक कथित दहशतवादी कट उधळवून लावत ११ पाकिस्तानी नागरिकांना अटक झाल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी पाकिस्तान दहशतवादाविरोधात पुरेशी कारवाई करीत नसल्याची टीका केली होती. दोन आठवडय़ांच्या चौकशीनंतर मात्र या ११ जणांना आरोपमुक्त करीत सोडण्यात आले. पाकिस्तानने या घडामोडींवर टीका करीत, तपास यंत्रणांनी आधीच योग्य चौकशी केली असती तर ही पाळी आली नसती, अशी टीका केली. या पाश्र्वभूमीवर इस्लामाबादमध्ये होणाऱ्या संयुक्त पत्रकारपरिषदेतून पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी अंग काढून घेतले. झरदारी यांच्या या बहिष्कारामुळे पाकिस्तान दौऱ्यावर असलेले ब्राऊन यांची कोंडी झाली आहे. उभय देशांतील संबंध अधिक बिघडले आहेत. ब्रिटनने पाकिस्तानवर दबाव वाढविला असून, देशाला धोका असल्याच्या संशयावरून कोणाही पाकिस्तानी नागरिकाला मायदेशी पाठविण्याचा ब्रिटनला हक्क असल्याची आठवण करून दिली आहे. उभय देशांत असा समझोता करार पूर्वीच झाला आहे.