Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

अंबानी हेलिकॉप्टर कट : साक्षीदाराचा गूढ मृत्यू
मुंबई, २८ एप्रिल / प्रतिनिधी

 

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमधील इंधन टाकीत चिखल आणि दगड भरले आहेत, ही बाब उघडकीस आणणारा ‘एअर वर्क्‍स इंडिया इंजिनिअरींग प्रा. लि.’ कंपनीचा तंत्रज्ञ भरत बोरगे याचा मृतदेह आज सकाळी विलेपार्ले रेल्वे फाटकात आढळून आला. प्रथमदर्शनी हा अपघाती मृत्यू असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी त्याचा मृत्यू ही हत्या, आत्महत्या की अपघात याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्याने या मृत्यूचे गूढ अधिकाधिक गडद होत चालले आहे. बोरगे हा अंबानी हेलिकॉप्टर प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या या खळबळजनक प्रकाराला बोरगे याच्या गूढ मृत्यूमुळे वेगळे वळण मिळाले आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी आठच्या सुमारास विलेपार्ले-सांताक्रुझ दरम्यानच्या फाटक क्रमांक २१ मध्ये अंधेरीहून चर्चगेटला येणाऱ्या जलद लोकलने बोरगे याला धडक दिली. या धडकेने तो जवळपास १०० मीटपर्यंत फरफटत गेला. त्यानंतर बोरगेला कूपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अंधेरी रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंदविला आहे. बोरगेजवळून एक चिठ्ठी सापडल्याने त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत अंधेरी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला असता त्याच्या खिशातून चिठ्ठी सापडल्याच्या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख यांनी दुजोरा दिला. मात्र चिठ्ठीतील मजकूर सांगण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. मात्र त्यातील मजकूर अन्य सूत्रांकडून प्रसार माध्यमांना उपलब्ध झाला.
गेल्या २३ एप्रिल रोजी अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमधील इंधन टाकीत दगड आढळून आल्याची बाब बोरगे याने उघडकीस आणली होती. त्यानंतर या प्रकारामागे घातपात घडविण्याचा अंबानी यांच्या विरोधकांचा कट असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्याच दिशेने तपास सुरू होऊन तपासाची सूत्रे मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आली. बोरगेने ही बाब उघडकीस आणल्याने या प्रकरणी तो मुख्य साक्षीदार होता. त्यामुळे तपासादरम्यान त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने प्रकरणाला निराळीच कलाटणी मिळाली आहे.
भरत बोरगेची चिठ्ठी!
बोरगेने ही चिठ्ठी गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्याच्या नावे लिहिली असून त्यात, ‘मी कुठल्याही प्रकारचे असले घाणेरडे कृत्य केलेले नाही. माझ्या आईवडिलांनी मला असे शिकवले नाही. काल तुम्ही परत गेल्यानंतर रिलायन्सचे काही लोक तेथे आले होते व मला विचारत होते. मी त्यांना काहीही सांगितले नाही. त्यातल्या एकाने माझा नंबर घेतला आहे. नंबर घेऊन सांगितले की, उद्या आपण बसून बोलू. यावरून मला संशय आला की, ते लोक माझा वापर करत आहेत. मी रात्री आपणास बोलणार होतो. तेथे असणाऱ्या एका आरोपीचा मार पाहून माझी वाचाच बंद झाली. रात्रभर विचार करून, मी हे पत्र आपणास लिहित आहे. कारण याचा जास्त परिणाम माझ्यावरच उलटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तुमचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. त्यातून सत्य बाहेर येईल, ही अपेक्षा.