Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

‘एवढे असुरक्षित वाटत असेल तर कसाबचा खटला जंगलात चालवा’
मुंबई, २८ एप्रिल/प्रतिनिधी

 

ऑर्थर रोड तुरुंगातील न्यायालयात चालविल्या जाणाऱ्या कसाबवरील खटल्यात काही अतिरेकी हल्ला करून व्यत्यय आणतील, या शक्यतेमुळे न्यायालयाबाहेरून जाणाऱ्या साने गुरुजी मार्गावरील एका दिशेकडील वाहतूक बंद करण्याएवढे असुरक्षित वाटत असेल तर हा खटला दूर कुठे तरी निर्जन जंगलात चालवावा, असे भाष्य मुंबई उच्च न्यायालयाने आज केले.
अर्धा साने गुरुजी मार्ग बंद करण्याविरुद्ध ‘गुजरात सव्र्हिस सेंटर’ या पेट्रोल पंपासह त्या भागातील व्यापाऱ्यांनी केलेल्या जनहित याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत सरकारी वकील धैर्यशील नलावडे यांनी सरकारने योजलेल्या उपायांचे सुरक्षेच्या कारणावरून समर्थन केले तेव्हा न्या. बिलाल नाझकी यांनी हे भाष्य केले. रस्त्याचा दुभाजक काही फुटाने तुरुंगाच्या बाजूला सरकविल्यास राहिलेल्या रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरु ठेवता येऊ शकेल, असे खंडपीठावरील दुसऱ्या न्यायाधीश न्या. श्रीमती विजया कापसे-ताहिलरामाणी यांनी सुचविले. मात्र असे करणे शक्य होणार नाही. तसे करून वाहतुकीची कोंडी झाली तर सर्व सुरक्षा व्यवस्थाच कोलमडून पडेल, असे नलावडे यांनी सांगितल्यावर पुढील सुनावणी उद्या ठेवली गेली.
हे सुरक्षेचे उपाय केवळ कसाबच्या सुरक्षिततेसाठी योजलेले नाहीत. खटला सुरू असताना हल्ला करून संपूर्ण न्यायप्रक्रियाच उधळून लावायची आणि भारत सुरक्षित नाही, असे चित्र जगापुढे उभे करायचे, असे मनसुबे रचून काही अतिरेकी हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, अशा स्वरूपाची निश्चित गुप्त माहिती मिळाल्याने हे उपाय केले आहेत. अशी गुप्त माहिती मिळालेली असताना गाफील राहता येणार नाही, असे नलावडे यांचे म्हणणे होते. तुरुंगाभोवती उंच भिंत आहे. पण आधुनिक शस्त्रे व तंत्रज्ञान वापरून तरीही न्यायालयावर हल्ला होऊ शकतो हेही लक्षात घ्यायला हवे, असे ते म्हणाले.
हे ऐकून न्या. नाझकी सरकारी वकिलांना म्हणाले : जय्यत तयारीत असणे आणि घाबरगुंडी उडणे यातील फरकाची रेषा अगदी पुसट असते.. आपण तयारीत असलेच पाहिजे, पण आपण घाबरून गेलो आहोत, असे चित्र योजलेल्या उपायांवरून जगापुढे निर्माण होता नये.. खटला सुरू आहे म्हणून न्यायालयाबाहेरचा संपूर्ण रस्ताच वाहतुकीस बंद करून खरे तर जगात आपण स्वत:चे हसे करून घेत आहोत.. जेथे हल्ला होईल या अपेक्षेने आपण तयारी ठेवतो त्या ठिकाणी अतिरेकी कधीच हल्ला करीत नाहीत, हे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला माहीत असते.. मी माझ्या स्वत:च्या अनुभवावरून हे सांगतो कारण मी स्वत: याआधी अतिरेक्यांचे लक्ष्य ठरलेलो आहे..मुंबईत जे काही झाले (२६/११ चा हल्ला) त्यावरून आपण तयारीत नव्हतो हेच दिसून आले.. देव करो आणि पुन्हा तसे न घडो.. तुरुंगात असलेल्या आरोपींनाही आपण सुरक्षित ठेवू शकत नाही, असे चित्र योजलेल्या उपायांनी निर्माण होता नये..
आपला देश १०० कोटी लोकांचा आहे. काहीही झाले तरी सामान्य परिस्थितीत आपण खटला चालवायला हवा, असे नमूद करून न्यायमूर्ती म्हणाले की, एका खटल्यासाठी एखाद्या भागातील रहिवाशांची एवढी गैरसोय करणे आम्हाला पटत नाही.
१०० मीटर परिसरातील स्फोटके हुडकू शकेल, असे सात कोटी रुपयांचे वाहन संबंधित उत्पादक कंपनीने मुंबई पोलिसांना दान दिले आहे, असे सांगून अर्जदारांचे वकील अॅड. एम. के. जैन यांनी त्या वाहनाचे छाचाचित्र न्यायालयास दाखविले. संपूर्ण रस्ता वाहतुकीस बंद करण्याऐवजी या वाहनाचा उपयोग करून तेच इप्सित साध्य केले जाऊ शकते, असे त्यांचे म्हणणे होते.