Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

दोन शेतमजूर तिहेरी खुनातून २५ वर्षांनी निर्दोष मुक्त
मुंबई, २८ एप्रिल/प्रतिनिधी

 

रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील आंबर्ले वडाचा कोंड या गावात २५ वर्षांपूर्वी झालेल्या तिहेरी खुनांच्या खटल्यातून सर्वोच्च न्यायालयाने नथू भाटरे आणि राम पवार या त्याच गावातील दोन शेतमजुरांची निर्दोष मुक्तता केली आहे.कनिष्ठ भूवैज्ञानिक एम. विद्यासागर रेड्डी आणि ओंकार जेरठ हे त्या भागात भूगर्भसर्वेक्षण करण्यासाठी गेलेले दोन सरकारी अधिकारी व त्यांचा वाटाडय़ा लक्ष्मण सोनावणे यांचे कुजलेले मृतदेह २५ फेब्रुवारी १९८५ रोजी आंबर्ले गावाजवळील तामखडा दरीत मिळाले होते. या खुनांबद्दल नथू भाटरे यास अलिबाग सत्र न्यायालयाने आणि राम पवार यास उच्च न्यायालयाने अपिलात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याविरुद्ध या दोघांनी केलेली अपिले सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. अरिजीत पसायत व न्या. लोकेश्वर सिंग-पंत यांच्या खंडपीठाने अलीकडेच मंजूर करून त्यांची निर्दोष मुक्तता केली. सत्र न्यायालयाने २००२ मध्ये निर्दोष सोडलेल्या राम पवारला उच्च न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर म्हणजे खुनानंतर तब्बल २२ वर्षांनी पुन्हा अटक करून तुरुंगात पाठविले गेले होते. नथू भाटरे मूळ खटला व अपील सुरू असताना जामिनावर होता. परंतु सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेप उच्च न्यायालयाने कायम केल्यावर जून २००७ मध्ये पुन्हा त्यालाही पुन्हा गजाआड करण्यात आले होते. मात्र माथीचा खुनांचा कलंक पूर्णपणे धुतला गेल्याने आता हे दोघेही उजळ माथ्याने बाहेर येतील.
मूळ खटल्यात एकूण १५ आरोपी होते. विशेष म्हणजे आरोपी क्र. १ वगळता इतर आरोपींविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याने त्यांना सोडून दिले जावे, असे सरकारी वकिलाने खटल्याच्या सुरुवातीलाच सांगितले होते. तरीही खटला चालविला गेला व सत्र न्यायालयाने आरोपी क्र. १२ नथू भाटरे यास दोषी ठरवून जन्मठेप दिली होती. या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात दोन अपिले केली गेली होती. एक अपील नथू भाटरे याने केले होते. महादेव धोंडू चव्हाण आणि राम पवार या दोन आरोपींना निर्दोष सोडण्याविरुद्ध दुसरे अपील सरकारने केले होते. १३ जून २००७ रोजी उच्च न्यायालयाच्या न्या. जी. जी. देशमुख व न्या. श्रीमती निशिता म्हात्रे यांच्या खंडपीठाने भाटरे याचे अपील फेटाळून त्याची जन्मठेप कायम केली होती. तसेच सरकारचे अपील अंशत: मंजूर करून खालच्या न्यायालयाने निर्दोष सोडलेल्या राम पवार या आरोपीस दोषी ठरवून जन्मठेप दिली होती.
खून झालेल्या तिघांनी जंगलात असलेल्या एका महिलेकडे प्यायला पाणी मागितले होते. त्यांच्या वेषभूशेवरून तिला ते चोर वाटले व तिने आरडाओरड केल्यावर जवळपास असलेले लोक धावून आले होते. त्यांनी मारहाण करून तिघांचा खून केला, असे अभियोग पक्षाचे कथानक होते. हा प्रसंग घडला तेव्हा जवळच असलेल्या लाकूडतोडय़ा नारायण घुंगरे या साक्षीदाराची साक्ष विश्वासार्ह मानून उच्च न्यायालयाने नथू व राम यांना दोषी ठरविले होते. जागोजागी विरोधाभास असलेली नारायणची साक्ष ग्राह्य धरण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय अनाकलनीय व असमर्थनीय आहे, असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने नोंदविला.