Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

केशवराव कोठावळे पारितोषिकाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त होणार
श्री. बा. जोशी यांचा ‘ग्रंथोपासक गौरव पुरस्कारा’ने सन्मान
मुंबई, २८ एप्रिल / प्रतिनिधी

 

मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे देण्यात येणाऱ्या केशवराव कोठावळे पारितोषिकाला यंदा २५ वर्षे पूर्ण होत असून त्या निमित्ताने मुंबईत येत्या ५ मे रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बडोद्याचे ज्येष्ठ वाङ्मयसेवक श्री. बा. जोशी यांना ग्रंथोपासक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच त्यांना सन्माननिधीही अर्पण केला जाणार आहे. जोशी यांनी आजवर केलेल्या वाङ्मयसेवेचे महत्व जाणून त्यांना हा पुरस्कार व सन्माननिधी देण्यात येणार असून या सन्माननिधीसाठी मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे २५ हजार रुपये देण्यात आले आहेत.
ग्रंथविश्व, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रात जोशी यांचे भरघोस योगदान असून मुळचे मुंबईकर असलेल्या जोशी यांचे पुढील आयुष्य कोलकोता येथे गेले. तेथील राष्ट्रीय ग्रंथालयाच्या मराठी विभागाचे ते प्रमुख होते. निवृत्तीनंतर आता ते बडोद्याला असतात. कोलकोता येथील नोकरीच्या काळात त्यांनी मराठी ग्रंथांच्या सूचीचे कार्य, अनुवाद, विविध दैनिकात स्तंभलेखन, नियतकालिके आणि दिवाळी अंक यामधून संदर्भमूल्य असलेले लेखन करून आपल्याकडील सांस्कृतिक संचित समाजापुढे खुले केले. निगर्वी आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांच्याविषयी रसिकांच्या मनात आदर आहे. जोशी यांच्या ‘गंगाजळी’चे खंड ही त्यांच्या कर्तबगारीची ठसठशीत साक्ष आहे.
कृतज्ञता सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार आणि एशियाटिक लायब्ररीचे अध्यक्ष डॉ. अरुण टिकेकर, डॉ. सु. रा. चुनेकर, विजय कुवळेकर, डॉ. विलास खोले आदी सहभागी होणार आहेत.