Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू निष्काळजीपणाचा कुटुंबियांचा आरोप
मुंबई, २८ एप्रिल / प्रतिनिधी

 

वांद्रे येथील पाली रुग्णालय आणि नर्सिग होममध्ये सोमवारी रात्री एका महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. मात्र या मृत्यूला रुग्णालयातील परिचारिका जबाबदार असून तिने दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित महिलेच्या शवविच्छेदन अहवालानंतरच या प्रकरणी पुढील पाऊल उचलण्यात येईल, असे वांद्रे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फराह अक्रम खान (३९) असे या महिलेचे नाव असून २६ एप्रिल रोजी ती पाली रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाली होती. २७ एप्रिल रोजी सकाळी तिचे सिझेरीन करण्यात आले व तिला मुलगी झाली. त्यानंतर परिचारिका माया मोहिते हिने तिला इंजेक्शन दिले. परंतु या इंजेक्शनमुळे फराहची तब्येत बिघडली आणि तिच्यावर उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला, असा आरोप फराहच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. याबाबत त्यांनी वांद्रे पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. मात्र या प्रकरणी फराहचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूमागील कारण समजू शकेल आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश जॉर्ज यांनी सांगितले.