Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मतदान करा- राज ठाकरे
मुंबई, २८ एप्रिल/ खास प्रतिनिधी

 

मुंबईत येऊन उत्तर भारतीय व बिहारी आपले मतदारसंघ बांधत आहेत. लालूप्रसादसारखे नेते एकजूट दाखविण्याचे आवाहन करत आहेत. आज जर तुम्ही सावध झाला नाहीत तर उद्याची पिढी तुम्हाला माफ करणार नाही, असे सांगत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मतदान करण्याचे आवाहन केले.
उत्तर- मध्य मुंबईतील मनसेच्या उमेदवार शिल्पा सरपोतदार यांच्या प्रचारासाठी खार येथे आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दुपारी आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलताना भाजपवर घणाघाती टीका करून यांनी जाहीरनाम्यांमध्ये दिलेली कोणती वचने यांनी आजपर्यंत पूर्ण केली असा सवाल केला. काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचा आणि मतदारसंघतील प्रश्नांचा कधी संबंधच आलेला नाही. प्रिया दत्त यांना गेल्या काही वर्षांमध्ये कार्यकर्त्यांना भेटण्यासाठीही वेळ मिळालेला नाही. मात्र वांद्रे पुलाच्या येथे असलेल्या बांगलादेशींच्या अनधिकृत झोपडपट्टय़ा जळाल्यानंतर त्यांनी तात्काळ या बांगलादेशींसाठी घरे बांधून दिली. मराठी बेरोजगारांसाठी आणि मराठी अस्मितेसाठी मात्र काँग्रेस व भाजपच्या एकाही उमेदवाकडे वेळ नाही.
मराठी लोक समुद्रकिनारी राहत असल्यामुळे त्यांचे मेंदू सडके असतात असे विधान संसदेत उत्तरेतील नेत्यांनी केल्यानंतरही राज्यातील एकही खासदार पेटून उठला नाही. मराठीच्या प्रश्नावरून मी केलेल्या आंदोलनानंतर उत्तर प्रदेश व बिहारमधील खासदारांनी संसद डोक्यावर घेतली तेव्हाही हे खासदार गप्प बसून होते. अशा लोकांना तुम्ही निवडून देणार का, असा सवाल राज यांनी केला. उत्तर प्रदेश व बिहारमधून येथे येणारे लोंढे आज झोपडय़ा बांधतात, उद्या यांची पक्की घरे होतात, मग हेच आमच्या छाताडावर नाचतात, असे सांगून राज म्हणाले हे आता सहन केले जाणार नाही. अनधिकृत झोपडय़ा बांधणाऱ्या परप्रांतीयांना मोफत ३०० चौरस फुटांची घरे दिली जातात आणि अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलिसांना घराशिवाय राहावे लागत आहे. येथे कोण येते कोण जाते या सरकारला पत्ता नाही मग अतिरेकी येणार नाहीत तर काय होईल, असा सवालही त्यांनी केला. करदात्यांना सुविधा नाहीत आणि अनधिकृत झोपडय़ांमध्ये राहणाऱ्यांना सुविधा पुरविण्याचे धंदे येथे केले जातात. मराठी लोकांना तर सारेच गृहीत धरतात म्हणूनच तुम्हाला मतदानासाठी कोणी विचारत नाहीत. उत्तर मध्य मुंबईत ४९ हजार बोगस मतदार असून यांची नावे मतदार याद्यांमध्ये आहेत. याची माहिती निवडणूक आयोगाला दिल्यानंतरही त्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. या प्रकरणी आपण गप्प बसणार नाही असे सांगत निवडणूक झाल्यानंतर याप्रकरणी आपण न्यायालयात जाणार असल्याचे राज म्हणाले.