Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

पाकिस्तानी नागरिकांना भारतीयांनी मदत करावी
‘सेंटर फॉर डायलॉग अ‍ॅण्ड रिकन्सिलिएशन’चे आवाहन
मुंबई, २८ एप्रिल / प्रतिनिधी

 

पाकिस्तानात सुरू असलेल्या अराजकाच्या काळात भारतीयांनी पाकिस्तानी नागरिकांना पूर्ण मदत देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘सेंटर फॉर डायलॉग अ‍ॅण्ड रिकन्सिलिएशन’ या संस्थेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या निवदेनाद्वारे करण्यात आले आहे. केवळ आपल्या शेजारील राष्ट्राला बसलेली झळ असे म्हणून पाकिस्तानातील परिस्थितीकडे पाहून थंड बसू नये कारण हे सारे भारतापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही या परिस्थितीचे धोके संभवतात, असे या निवेदनात म्हटले आहे. माजी पंतप्रधान इंदरकुमार गुजराल, बी. जी देशमुख, राजिंदर सचर, सलमान हैदर, सइदा हमीद, सुशोभा बर्वे, अमित सिंग चढ्ढा, राजमोहन गांधी, कुलदीप नायर, फली नरिमन, वजाहत हबिबुल्ला, प्रेम शंकर झा, अरुणा रॉय आणि तिस्ता सेटलवाड आदी मान्यवरांच्या सह्या या निवेदनावर आहेत.
पाकिस्तानात सुरू असलेल्या गोंधळाच्या परिस्थितीत भारतीयांनी केवळ मूक साक्षीदाराची भूमिका घेऊ नये, अशी भूमिका या संस्थेतर्फे मांडण्यात आली आहे. सध्या पाकिस्तानातील कित्येक भागांत शाळा-महाविद्यालये किंवा कार्यालयात जाणेही जीवाला अपायकारक ठरू लागले आहे. त्यामुळे विद्यार्थीही घरीच थांबतात. तेथील नागरिकांचा शासन आणि सुरक्षा यंत्रणेवरील विश्वास कमालीच्या वेगाने खालावू लागला आहे.
पाकिस्तानपुढील परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी भारतीय नागरिक आणि भारत सरकार यांनी शक्य ते प्रयत्न करावेत, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. सध्या भारतात निवडणुकांचा माहोल असला आणि पाकिस्तान सरकार, अशासकीय यंत्रणा, इतर काही सामाजिक घटक यांच्याबद्दल भारतीयांच्या तक्रारी असल्या तरी सध्याच्या भीषण परिस्थितीत भारत आणि भारतीयांनी पाकिस्तानी नागरिकांना मदत करावी, असे आवाहन या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.