Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ एप्रिल २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

मध्य व पश्चिम रेल्वेतर्फे उद्या पहाटे निवडणूक स्पेशल गाडय़ा
मुंबई, २८ एप्रिल / प्रतिनिधी

 

निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मध्य व पश्चिम रेल्वेने गुरुवारी पहाटे चौदा विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मध्य रेल्वेवर आठ, तर पश्चिम रेल्वेवर सहा निवडणूक विशेष लोकल चालविल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेवर सीएसटी-आसनगाव, सीएसटी-बदलापूर, सीएसटी-पनवेल आणि ठाणे-वाशी या मार्गावर प्रत्येकी दोन लोकल चालविण्यात येणार आहेत. सीएसटी-आसनगाव (२.३० वा.), आसनगाव-सीएसटी (२.३० वा.), सीएसटी-बदलापूर (३.०० वा.), बदलापूर-सीएसटी (२.४५ वा.), सीएसटी-पनवेल (३.०० वा.), पनवेल-सीएसटी (३.०० वा.), ठाणे-वाशी (३.०० वा.), वाशी-ठाणे (३.३५ वा.) या लोकल सुटणार आहेत. ‘निवडणूक आयोगाने केलेल्या सुचनेआधारे ३० एप्रिल रोजी पहाटे या विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’, अशी माहिती मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने दिली. याखेरीज त्या दिवशी पश्चिम रेल्वेवरसुद्धा सहा विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. आधी केवळ चार लोकल चालविण्याची घोषणा पश्चिम रेल्वेने केली होती. आज त्यात आखणी दोन लोकलची भर घालण्यात आली. त्यामुळे आता चर्चगेट-विरारदरम्यान चार आणि चर्चगेट-बोरिवलीदरम्यान दोन लोकल चालविण्यात येणार आहेत. चर्चगेट आणि विरारहून धावणाऱ्या लोकल अनुक्रमे २.०० आणि ३.०० वाजता सुटतील. याखेरीज चर्चगेट-बोरिवली आणि बोरिवली-चर्चगेट या लोकल पहाटे ३.३० वाजता निघतील. पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या सर्व निवडणूक विशेष लोकल बारा डब्यांच्या असतील, असे पश्चिम रेल्वेने कळविले आहेत.